>> गोळीबारात तरुणाच्या मृत्यूप्रकरणी तपासाला गती
पाटवळ सत्तरी येथे चार दिवसांपूर्वी रानटी जनावराची शिकार करण्यासाठी गेलेल्या तिघांपैकी एकाचा गोळी लागून मृत्यू झाला होता. या प्रकरणी वाळपई पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. संशयितांच्या चिंचमळ येथील घराची व सभोवताली घराची झाडाझडती सुरू केलेली आहे.
गेल्या तीन दिवसांमध्ये शंभरपेक्षा जास्त घरांची झडती घेण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे अनेकांची जबानी नोंद करून घेतली आहे. यातून अनेक महत्त्वाचे धागेदोरे सापडलेले आहेत. यामुळे येणाऱ्या काळात अनेक जणांना या प्रकरणांमध्ये अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलेले आहे. या घरांमध्ये बेकायदी वास्तव्य करणाऱ्या नागरिकांची पडताळणी सुरू केलेली आहे. घरामध्ये बेकायदा वास्तव्य करणाऱ्या घरमालकावर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिलेला आहे.
तीन दिवसापासून झडती
वाळपई पोलिसांनी संशयितांच्या चिंचमळ माऊस या भागामध्ये कोंम्बिंग ऑपरेशन सुरू केलेले आहे. यातून घरांची झाडाझडती घण्यात येत आहे. या भागांमध्ये आक्षेपार्ह वस्तू असल्याचा पोलिसांना सुगावा आहे. यामुळेच सदर प्रकारचे मोहीम हाती घेण्यात आली आहे. घराच्या सभोवताली परिसरामध्ये शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. पोलिसांच्या वेगवेगळ्या तुकड्या वेगवेगळ्या ठिकाणी तपासणी करीत आहेत. ज्या ठिकाणी जंगली जनावरांची शिकार करण्यासाठी बसलेल्या जागेची पाहणी करण्यात आलेली आहे. सदर भाग हा वनखात्याच्या अखत्यारीत येत आहे. यामुळे अधिक तपासासाठी वनखात्याच्या यंत्रणेची मदत घेण्यात येणार आहे.
परप्रांतीयांचे वास्तव्य
सदर भागांमध्ये काही घरांमध्ये परप्रांतीय बेकायदेशीर प्रमाणात वास्तव्य करीत असल्याची माहिती हाती आलेली आहे. अवघ्या वर्षापूर्वी या ठिकाणी परप्रांतीयांची मोजकीच घरे होती. मात्र दोन वर्षात या घरांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे. या घरांना स्थानिक पंचायतीकडून घर क्रमांक देण्यात आलेले आहेत. याबाबतीतही पोलीस पूर्णपणे तपास करीत आहेत. सदर क्रमांक देण्यात येत असताना कायदेशीर सोपस्कार पूर्ण केले आहेत का या संदर्भाची चाचणी येणाऱ्या काळात पोलीस करणार आहेत.