वाळपईत गुरांची कत्तल करून अवशेष वेळूस नदीत फेकले

0
91

२३ गुरांच्या कत्तलीचा संशय : नागरिकांत नाराजी
वाळपईत गुरांची कत्तल करणार्‍यांनी सुमारे २५ गुरांची कत्तल करून त्यांचे अवशेष वेळूस नदीत फेकण्याचा प्रकार केला असून त्यामुळे त्या परिसरात संतापाची लाट पसरली आहे.
वेळूस नदीवर बांधलेल्या बंधार्‍यात गुरांचे अवशेष फेकल्याची माहिती काल वाळपई पोलिसांना दिली असता त्या ठिकाणी ९० पाय, १५ मुंडकी व आतड्या पाण्यात आढळून आल्या. त्यामुळे ईद सणानिमित्त सरकारी कत्तलखान्याव्यतिरिक्त कत्तली करण्यास न्यायालयाची बंदी असताना देखील छुप्या पद्धतीने गुरांची कत्तल करून अवशेष नदीत फेकण्यात आले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या ठिकाणी सोमवारी रात्री काळोखाच्या आडोशात गुरांचे अवशेष नदीत फेकले असल्याची शक्यता असून या संदर्भात वाळपई पोलीस तपास करीत आहेत. वाळपईत गेल्यावर्षी ईद सणावेळी गुरांची कत्तल करतेवेळी गोप्रेमी त्याठिकाणी गेल्यामुळे त्यांना मारहाण झाली होती. त्यामुळे यावर्षी कोणीही बेकायदेशीर गुरांची कत्तल करू नये म्हणून वाळपई शहरात मोठा पोलीसांचा फौजफाटा ठेवण्यात आला होता. तसेच पोलिसांची रात्रीची गस्त वाढविण्यात आली होती. पण गोहत्या करणार्‍यांनी पोलिसांनासुद्धा तुरी देऊन गुरांची कत्तल केली असल्याचे या प्रकारावरून दिसून येते.
वाळपईत प्रथमच मोठ्या प्रमाणात गुरांची कत्तल
जंगलात गुरांची कत्तल करून त्यानंतर नदीत आणून टाकले असल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. कारण त्या दोन दिवसात संशय असणार्‍या सर्व वाहनांची पोलीस तपासणी करीत होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात वाळपईत गुरांची कत्तल प्रथमच झाली आहे. २५ पेक्षा जास्त गुरांची कत्तल केली असल्याचे गुरांचे अवशेष दिसत आहे. विश्‍वेश परोब यांची तक्रार नोंद
वाळपई पोलीस स्थानकात प्रकरणाची तक्रार सत्तरी जागृती मंचचे अध्यक्ष विश्‍वेश परोब यांनी दिली. त्यानंतर गोरक्षण अभियानाचे प्रमुख हनुमंत परब, प्राणीमित्र अमृत सिंग, प्रदीप गंवडळकर त्याठिकाणी उपस्थित होते.
पशुसंवर्धन डॉक्टरांकडून तपासणी
वाळपईत पशुसंवर्धन कार्यालयाच्या डॉक्टरांनी त्या ठिकाणी येऊन या अवशेषांची तपासणी केली. त्यानुसार त्यांनी त्याठिकाणी सापडलेल्या अवशेषावरून २३ गुरे असल्याचा अंदाज वर्तविला.
सीसी कॅमेरावरून धागेदोरे
ज्या ठिकाणी गुरांचे अवशेष टाकण्यात आले आहेत त्या ठिकाणी जाताना एक खाजगी फॉर्महाऊस आहे. त्या फॉर्महाऊसमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे लावण्यात आले असल्याने त्यात रात्री ११ वाजून ३ मिनिटानी एक वाहन जाताना दृष्टीस पडले असून नंतर लगेचच ११ वाजून १५ मिनिटांनी ते परत येत असल्याचे दिसत आहे. त्यावरून वाळपई पोलिसाचा तपास सुरू आहे. गुरांची हत्या करून त्याचे अवशेष नदीत टाकण्याच्या प्रकारामुळे त्या परिसरात नागरिक संताप व्यक्त करीत असून वाळपई पोलिसांनी त्याला लवकरात लवकर अटक करावे अशी मागणी केली आहे.
पाणी प्रदूषित होण्याची भीती
वेळूस नदी जवळच वेळूस गाव वसला असून त्या नदीत कपडे धुण्याबरोबर पिण्यासाठी पाणी वापरीत असतात. मात्र पाणी प्रदूषित होण्याची भीती नागरिक करीत आहेत.