जमीन घोटाळ्याचा तपास करणाऱ्या गोवा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) वाळपई येथील जमीन हडप प्रकरणामध्ये संशयित आरोपी सिद्दिकी ऊर्फ सुलेमान खान (54) याला काल पुन्हा अटक केली. त्याला चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश वाळपई येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने दिला.
राज्यातील जमीन हडप प्रकरणातील एक मुख्य संशयित आरोपी सुलेमान खान याला म्हापसा येथील एका जमीन हडप प्रकरणाच्या चौकशीसाठी 12 नोव्हेंबरला कर्नाटकात अटक करून गोव्यात आणले होते. सदर प्रकरणानंतर आता एसआयटीने त्याला वाळपई पोलीस स्थानकात नोंद झालेल्या तक्रारीच्या चौकशीसाठी अटक केली आहे.
या जमीन हडप प्रकरणात राफेल लुईस जोस लोबो (बार्देश) याने तक्रार दाखल केली आहे. 30 जून 2021 पूर्वी हे प्रकरण घडले होते. तक्रारदारांच्या वडिलोपार्जित मालमत्ता बेकायदेशीरपणे बनावट कागदपत्रे तयार करून हडप करण्यात आल्या आहेत. सर्व्हे क्र. 36/0 मधील 1,09,500 चौरस मीटर, सर्व्हे क्र. 37/0 मधील 38,325 चौ. मी. आणि सर्व्हे क्र.38/1 मधील 68,250 चौ. मी. जमिनीची बनावट विक्री कागदपत्रे तयार केली. या विक्रीच्या कागदपत्रांमध्ये बनावट स्वाक्षरी केली आणि सब रजिस्ट्रार वाळपई यांच्यासमोर अंमलात आणल्यासारखे खोटे दाखवले आणि तेच अस्सल म्हणून वापरले, असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणात सुलेमान खान याच्यासमवेत गोपाळ दत्ताराम साळगावकर, कल्पना गोपाळ साळगावकर (रा. आंबेडे, सत्तरी), पंकज अनंत चोडणकर आणि पूजा पंकज चोडणकर (शिरोली, सत्तरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक नितीन हर्ळणकर तपास करीत आहेत.
जवळपास दीड वर्षापूर्वी जमीन घोटाळ्याची नवनवी प्रकरणे समोर येऊ लागली होती. या प्रकरणांमध्ये 30 हून अधिक जणांना अटक करण्यात आली होती. जमीन घोटाळ्याची मालिका अद्यापही संपलेली नाही.

