वाळपईतील अपघातात दोघे गंभीर जखमी

0
19

वाळपई परिसरात काल झालेल्या वेगवेगळ्या दोन अपघातांत दोघेजण गंभीर जखमी झाले.
सविस्तर माहितीनुसार, रेडेघाट-सत्तरी येथे दुचाकी व दूध पुरवठा करणाऱ्या बोलेरो जीप यामध्ये झालेल्या अपघातात बोलेरो गाडीने दुचाकीला पाठीमागून धडक देऊन चालक पसार झाला. या अपघातात दुचाकीचालक साईप्रसाद नाईक (मासोर्डे-सत्तरी) हा गंभीर जखमी झाला. यावेळी वाळपई पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. अपघातात पसार झालेल्या वाहनाचा तपास करुन अपघातास कारणीभूत बोलेरो जीप ताब्यात घेण्यात आली. साईप्रसाद हा गंभीर जखमी झाला असून, त्याला अधिक उपचारासाठी गोमॅकोत दाखल करण्यात आले. बोलेरो ही वाळपई येथील खान नामक एका व्यक्तीची असून, ती दुधपुरवठा करते.

नाणूस-वाळपई येथे काल दुसरा अपघात झाला. सेंट्रो कार आणि दुचाकी यांच्या हा अपघात घडला. त्यात दुचाकीचालक गजानन देसाई (22, रा. अडवई सत्तरी) हा गंभीर जखमी झाला. त्याची प्रकृती गंभीर आहे. कारचालक वाळपईतून नाणूस येथे जात होता, तर दुचाकीचालक अडवईहून वाळपईच्या दिशेने जात असताना हा समोरा समोर अपघात झाला. त्यात गजानन हा उसहून कारवर पडला. त्याचे डोके कारच्या समोरील आरशावर आदळले. तसेच पायाला सुध्दा मोठ्या प्रमाणात जखम झाली.
या दोन्ही घटनांचा तपास वाळपई पोलीस निरीक्षक दिनेश गडेकर यांच्यामार्गदर्शनाखाली झिंगू गावकर तपास करत आहेत.