वाळके खून ः सुरा जप्त, दोघांना कोठडी

0
302

>> तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे

कृष्णी ज्वेलर्सचे मालक स्वप्निल कृष्णा वाळके यांचा खून करण्यासाठी वापरलेला सुरा काल पोलिसांनी शोधून काढला. स्वप्निल यांचा खून केल्यानंतर मुस्तफा शेख याने तो सुरा झाडीत टाकून दिला होता. कृष्णी ज्वेलर्स दुकानाच्या वरच्या बाजूने दोनशे मीटर अंतरावरील अशोक हॉटेलच्या मागे दाट झाडीत मुस्तफाने तो सुरा फेकून दिला होता. काल शुक्रवारी दुपारी मुस्तफा याला पोलीस घेऊन गेले व झाडीत टाकलेला तो सुरा ताब्यात घेतला. या आधी पोलिसांनी पिस्तुल, रिकामे काडतूस, भरलेली काडतुसे, मुस्तफाचा फाटलेला टी शर्ट हस्तगत केला. तर या घटनेसाठी वापरलेली बोलेरो जीप जप्त केली.

न्यायालयीन कोठडी
काल पोलिसांनी मुस्तफा शेख व ओंकार पाटील या दोन संशयितांना न्यायालयात सादर केल्यानंतर न्यायालयाने विशेष तपासासाठी त्यांची दहा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. या टोळीतील आणखी दोघे सांताक्रुझ, पणजी येथील असून पोलीस त्यांचा तपास करीत आहेत. या टोळीत एकूण पाच जण असल्याचे पोलीस गोटातून सांगण्यात आले.

मुस्तफा व इतरांनी सांताक्रुझ येथून बॉलेरो जीप चोरली होती. ती जीप घटनेच्या दिवशी सकाळीच मडगावात कृष्णी ज्वेलर्सकडे उभी करून ठेवली होती. तिघे या जीपने तर दोघे स्कूटरवरून हेल्मेट घालून आले होते. स्वप्निल यांचा खून केल्यानंतर मुस्तफा वरच्या बाजूने विनाशर्ट पळून गेला व जाताना त्याने सुरा झाडीत फेकून दिला.

दुकानाची टेहळणी
बुधवारी सकाळी एका स्कूटरवरून त्या परिसरात एक व्यक्ती हेल्मेट घालून हेलपाटे घालीत असल्याची फुटेज मडगाव पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी त्या रात्री तेथे गस्त वाढविली होती. खुनानंतर स्कूटरवरून आलेल्या दोघांनी नावेली येथे घरी जावून मुस्तफाचे कपडे आणले होते. तर खुनानंतर दोघे घटनास्थळी जाऊन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करीत होते. हल्लेखोरांनी या दुकानाची आधी पहाणी केली व त्यानंतर दुकान लुटण्यासाठी आले होते.

मुस्तफा याने दुकानात शिरल्याबरोबर पिस्तुलने गोळीबार केला. गुन्हेगारांशी प्रतिकार करून पळण्याचा प्रयत्न स्वप्निल यांनी केला. त्यातून त्यांचा बळी गेला. गोळी स्वप्निल यांच्या छातीच्या डाव्या बाजूस लागून ती आरपार गेल्याचे शवचिकित्सेत समजले. त्यानंतर झालेल्या झटापटीत स्वप्निलवर चाकूने दोन वार केले व त्यात तेे गंभीर जखमी झाले. मात्र मुस्तफा याच्याकडे पिस्तुल व सुरा असल्याने लोकांनी घाबरून त्याला पकडण्याचे सोडून दिले. संशयितांचे ठसे घेण्यात आले असून त्यानुसार कागदपत्र तयार केली जात आहेत.

पुन्हा पत्रकारांना मज्ज्वाव
कालही पुन्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमार यांनी पत्रकारांना भेटण्यास मज्जाव केला. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पत्रकारांना न भेटणार्‍या व माहिती न देणार्‍या पोलीस अधिक्षकांची नेमणूक केली असे ज्येष्ठ पत्रकारांनी सांगितले. याबाबात मुख्यमंत्र्यांकडे व गुजकडे तक्रार करण्याचा पत्रकारांनी निर्णय घेतला आहे.