स्थानिक कॉंग्रेस नेत्यांनी आपला छळ चालवला असून विनाकारण आपली युवा कॉंग्रेस अध्यक्षपदावरून जी उचलबांगडी करण्यात आली आहे, त्यातही स्थानिक नेत्यांचाच हात आहे, असा वालंका आलेमांव यांनी जो आरोप केलेला आहे त्या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचे काल प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष जॉन फर्नांडिस यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या होत्या, तेव्हापासून आजतागायत आपण वालंका आलेमांव यांचे तोंडही पाहिले नसल्याचे फर्नांडिस म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार करायचा सोडून वालंका आलेमांव अज्ञातवासात गेल्या होत्या. त्यामुळे त्याची दखल घेऊन केंद्रीय युवा कॉंग्रेस अध्यक्षांनी त्यांची हकालपट्टी केलेली असून त्यात स्थानिक नेत्यांचा कोणताही हात नव्हता असे फर्नांडिस म्हणाले. कोणते स्थानिक कॉंग्रेस नेते आपला छळ करीत आहेत ते वालंका यांनी स्पष्ट करावे, असे फर्नांडिस म्हणाले.