वारी आषाढी एकादशीची!

0
31
  • लक्ष्मण कृष्ण पित्रे

पंढरीची सर्वात महत्त्वाची वारी म्हणजे आषाढ शुद्ध एकादशीची होय. आषाढीच्या वारीस ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून पंढरीस येते. या वाऱ्यांना प्रत्येक वारकरी फडावर दशमी ते पौर्णिमेपर्यंत भजने आणि कीर्तने करण्यात येतात. रात्री हरिजागर केला जातो. पौर्णिमेस सर्व दिंड्या पंढरपुराजवळील गोपाळपुरीस जमतात. तिथे काल्याचा कार्यक्रम होतो. काल्याच्या लाह्या एकमेकांच्या मुखी घालून वारकरी वारीची सांगता करतात. या ठिकाणी स्पृश्यास्पृश्य भेद मुळीच नसतो. यावरून वारकरी संप्रदायात समाजसुधारणेचे केवढे सामर्थ्य आहे हे लक्षात येते.

आषाढ हा आपल्या ऋतुचक्रातील अत्यंत रमणीय महिना. ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ ही ‘मेघदूता’तील पंक्ती मनात घोळवीत प्रतिपदेला आपण कालिदास जयंती साजरी करतो. या महिन्याला ‘शुची’ असेही नाव आहे. या महिन्याच्या पौर्णिमेच्या आसपास पूर्वाषाढा किंवा उत्तराषाढा नक्षत्र येते म्हणूनच त्याला ‘आषाढ’ नाव पडले आहे. या महिन्यात कर्क संक्रांती येते आणि दक्षिणायन सुरू होते. शुद्ध द्वितीयेला कृष्ण, बलराम आणि सुभद्रा यांची रथयात्रा काढली जाते. जगन्नाथपुरीला या दिवशी भव्य रथोत्सव होतो. शुद्ध सप्तमीला ‘वैवस्वत सप्तमी’ म्हणतात. या दिवशी वैवस्वत या नावाने सूर्याची पूजा करतात. अष्टमीला महिषासुरमर्दिनीची आणि दशमीला वरदलक्ष्मीची पूजा केली जाते. आणि मग येते आषाढ शुक्ल एकादशी, जिला ‘शयनी एकादशी’ म्हणतात. कारण या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेषशय्येवर चार महिन्यांसाठी शयन करतात. (पुढे ते चार महिन्यांनी कार्तिक शुद्ध एकादशीला जागे होतात म्हणून तिला ‘प्रबोधिनी एकादशी’ म्हणतात.) या दिवसाचे आणखी एक महत्त्व म्हणजे, या दिवशी लक्षावधी विठ्ठलभक्त वारकरी पंढरपुरी पांडुरंगाचे दर्शन घेऊन धन्य होतात.

महाराष्ट्रातील एक प्रधान देवता विठ्ठल आहे. विष्णूचा अवतार असणारा कृष्ण आणि त्याच्या रूपातील विठ्ठल याची भक्ती महाराष्ट्रात व कर्नाटकात प्राचीन काळापासून रूढ आहे. विष्णूशी संबंधित असणारे एकादशीव्रत विठ्ठलाचे वारकरी निष्ठेने आचारीत असतात. विष्णूला आवडणारी तुळस त्यांनाही अतीव प्रिय आहे. तिच्या काष्ठमण्यांची माळ हे त्यांच्या अभिज्ञानापैकी एक आहे. विष्णूच्या हृदयावरील ‘श्रीवत्सलांछन’ विठ्ठलाच्याही हृदयावर शोभत असते. ‘काला’ हा गोकुळातील बाळकृष्णाचा भोग आहे, आणि पंढरपुरातील विठ्ठलाच्या कोणत्याही वारीची केली जाणारी सांगता काल्याशिवाय होत नाही. असा हा विष्णू-कृष्ण-विठ्ठल यांचा ऐक्यभाव लोकमान्य आहे. (बेंडगिरी, बेळगाव येथील शके 1171 च्या ताम्रपटात विठ्ठलाचा ‘विष्णू’ असा उल्लेख आढळतो.) कृष्णच पंढरीत विठ्ठलरूपाने प्रकटला, असे निवृत्तीनाथ म्हणतात. ज्ञानेश्वरांच्या मतेही श्रीहरीच विठ्ठलरूपाने भीमातीरी आला आणि त्याने सुदर्शनचक्रावर पंढरी वसवली. संत एकनाथांनीही कृष्ण-विठ्ठल ऐक्याचा पुकारा केला आहे. द्वारकेहून आलेला श्रीकृष्णच श्रीविठ्ठल आहे अशी श्रद्धाभावना सर्व वारकऱ्यांत असली तरी विठ्ठलाची ऐतिहासिक प्राचीनता पाहणे अप्रस्तुत ठरणार नाही.

या दृष्टीने विठ्ठलमंदिरातील शके 1159 चा शिलालेख निर्णायक ठरतो. त्याशिवाय विठ्ठलमंदिरातील शके 1195 चा ‘चौऱ्यायशीचा शिलालेख’ही महत्त्वाचा आहे. या लेखात विठ्ठलाच्या पूजेसाठी देणगी देणाऱ्या लोकांची नावे आहेत. त्यात रामदेवराव यादव आणि हेमाडपंत यांची नावे प्रमुख आहेत. कर्नाटक, तेलंगण, महाराष्ट्र येथील देणगीदारांचीही नावे या शिळेवर कोरलेली आहेत. (त्यात गोमंतकीयांचीही नावे आहेत असे डॉ. गुणे यांनी सांगितले आहे.) यावरून इसवी सनाच्या बाराव्या शतकात पंढरपूर हे क्षेत्र विठ्ठलभक्तांचे गाजते भक्तिपीठ होते असे म्हणावयास प्रत्यवाय नाही.

पंढरपुरात, मंदिरात आता जी मूर्ती आहे ती उभ्या स्थितीत असून तिच्या डोक्यावर उंच कंगोरेदार टोपीसारखा मुकुट आहे. कानांमध्ये माशाच्या आकाराची कुंडले आहेत, ती खांद्यावर आडवी आहेत. गळ्यात कौस्तुभमण्यांचा हार आहे. छातीच्या डाव्या बाजूला एक खळगा आहे त्याला ‘श्रीवत्सलांछन’ म्हणतात आणि उजव्या बाजूला एक वर्तुळखंड आहे त्याला ‘श्रीनिकेतन’ म्हणतात. दंडांवर बाजुबंद आणि मनगटांवर मणिबंध आहेत. डाव्या हातात शंख असून उजव्या हातात कमलनाल आहे. कमरेला तिहेरी मेखला आहे. पावले एका चौकोनावर असून तिलाच ‘वीट’ असे म्हणतात. विटेखाली उलटे कमळ आहे. कमरेला वस्त्र स्पष्ट दिसत नाही. या वर्णनावरून या मूर्तीची निर्मिती गुप्त युगात म्हणजे इ.स.च्या पाचव्या-सहाव्या शतकात झाली असावी असे वाटते.
हा विठ्ठल म्हणजे वारकऱ्यांची उपास्यदेवता आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या प्रदेशांमध्ये प्रचलित असलेला हा एक मोठा संप्रदाय आहे. लाखो लोक या संप्रदायाचे अनुयायी आहेत. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम इत्यादी संतश्रेष्ठ या पंथात होऊन गेले.

वारकरी म्हणजे काय? वारी करणारा तो वारकरी. ‘वारी’ या शब्दाच्या अनेक व्युत्पत्ती विद्वानांनी दिलेल्या असल्या तरी या ठिकाणी हा शब्द ‘फेरी’ किंवा ‘खेप’ या अर्थाने अभिप्रेत आहे. प्रतिवर्षी वा प्रतिमास किंवा नियतकाळी एखाद्या पवित्र स्थळाला भेट देण्याची प्रथा हा ‘वारी’ शब्दाचा रूढार्थ आहे. वारकऱ्यांच्या बाबतीत हे पवित्र स्थळ पंढरपूर (आणि आळंदी) हे होय. आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री या पंढरपूरच्या प्रमुख वाऱ्या आहेत.

प्रा. शं. वा. दांडेकर म्हणतात- ‘आषाढी, कार्तिकी, माघी अथवा चैत्री यांच्यापैकी एकातरी शुद्ध एकादशीस गळ्यात तुळशीमाळ घालून जो नियमाने पंढरपुरास जातो, तो पंढरपुराचा वारकरी म्हटला जातो आणि त्याच्या उपासनेचा मार्ग हा वारकरी पंथ होय.’ हे वारकरी कसे असतात, कसे दिसतात, याचे सुंदर वर्णन संत नामदेवांनी केले आहे-
आजी महासुखे। सृष्टी भरली भाग्यवंती।
जालीसे विकृती। पापतापा॥
चालिले देखोनी। वैष्णव जगजेठी।
इथे उभविती। गुढिया देव॥
आले आले रे। हरीचे डिंगर।
वीर वारीकर। पंढरीचे॥
ज्यांची चरणधूली। उधळे गगनपंथे।
ब्रह्मादिकां जेथे। जाली दाटी॥
एकमेकांपुढे। नमविती माथे।
म्हणती आम्ही ते। लागो रज॥
भक्तिप्रेमभाव। भरले ज्यांच्या अंगी।
नाचती हरिरंगी। नेणती लाजूं॥
या पंथाच्या प्रवर्तकाचा मान भक्तश्रेष्ठ पुंडलिकाकडे जातो. तुकाराम म्हणतात-
पुंडलीक भक्तराज। तेणे साधियले काज।
वैकुंठीचे निज। परब्रह्म आणिले॥
महाराष्ट्रातील भक्तिसंप्रदायाचे मंदिर कसे उभारले गेले त्याचे वर्णन तुकारामांनी केले आहे.
ज्ञानदेवे रचिला पाया। उभारिले देवालया।
नामा तयाचा किंकर। तेणे केला हा विस्तार।
जनार्दन एकनाथ। खांब दिला भागवत।
तुका झालासे कळस। भजन करा सावकाश॥
अशा लोकोत्तर संत-महात्म्यांनी घडविलेल्या वारकरी संप्रदायाची, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि तुकोबांची अभंगगाथा ही प्रस्थानत्रयीच आहे. ज्ञानेश्वर हे त्यांच्यातील अग्रणी असल्याने इतर संतांनी त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून ग्रंथरचना केली. वारकरी संप्रदाय शुद्ध भक्तिमार्गी आहे. भक्ती हा मूळ सिद्धांत मानून या संप्रदायाने आपल्या तत्त्वज्ञानाची उभारणी केली आहे. वारकरी संप्रदायात भक्ती हे मोक्षाचे आणि स्वात्मसुखाचे श्रेष्ठ साधन मानले गेले आहे. आपल्या परंपरेत धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत. पहिले तीन साधन आणि चौथा मोक्ष हा साध्यरूप आहे. ज्ञानदेवांनी या साध्याची चिकित्सा करून पुरुषार्थकल्पनेत फरक केला आणि भक्तीला पाचवा पुरुषार्थ मानले. मानवी जीवनाचे अंतिम साध्य मोक्ष नसून भक्ती आहे, आणि भक्तीतच जीवनसाफल्य आहे, असे ज्ञानेश्वर मानतात.

भक्ती ही नुसती वैयक्तिक भावना नाही, ती परमात्म्याच्या मूळ स्वरूपातच आहे, किंबहुना ती त्याचाच गाभा आहे. भक्ती ही सहजस्वभावरूप आहे. परमात्म्याच्या ठिकाणी असलेल्या सहजप्रेमाला परमात्म्याचा सहजप्रकाश असे ज्ञानदेव म्हणतात. भक्ती ही पुरुषार्थांचा मुकुटमणी असून इतर मुक्काम हे अलीकडचे आहेत, असे संत तुकोबांनीही म्हटले आहे-
मोक्ष तुमचा देवा। दुर्लभ तो तुम्ही ठेवा।
मज भक्तीची आवडी। नाही अंतरी ते गोडी॥
वारकरी संप्रदायाची अधिष्ठात्री देवता विठ्ठल असून ती सर्व विश्वाला गवसणी घालणारी अशी देवता आहे. ‘रामकृष्णहरी’ हा या संप्रदायाचा मंत्र आहे. राम म्हणजे हृदयाला रमविणारा, कृष्ण म्हणजे आकर्षित करणारा आणि हरी म्हणजे ऐक्यरूप असणारा विठ्ठलरूप परमात्मा होय. या मंत्राला सोवळे-ओवळे, स्थळ-काळ, जाती-कूळ, गरिबी-श्रीमंती यांचा प्रतिबंध नाही. गळ्यात तुळसीच्या मण्यांची माळ, कपाळी गोपीचंदनाच्या मुद्रा आणि खांद्यावर पताका ही वारकऱ्यांची बोधचिन्हे होत. यांपैकी माळ ही एखाद्या ज्येष्ठ वारकऱ्याकडून घ्यायची असते. माळ स्वीकारताना शिष्याला नियम पाळण्याची शपथ घ्यावी लागते.
खरे बोलणे, परस्त्रीला माता मानणे, निरामिष आहार सेवन करणे, वर्षातून एकदा तरी पंढरीची वारी करणे, एकादशी व्रत पाळणे, ‘रामकृष्णहरी’ या मंत्राचा जपमाळ ओढीत एकशे आठ वेळा तरी जाप करणे, ज्ञानेश्वरीच्या काही ओव्यांचे नियमित पठन करणे आणि प्रापंचिक नित्यकर्मे विठ्ठलस्मरण करीत पार पाडणे, या गोष्टींचा नियमात समावेश होतो.

पंढरीची आणि आळंदीची अशा दोन वाऱ्या वारकरी संप्रदायात चालतात. पंढरीची सर्वात महत्त्वाची वारी म्हणजे आषाढ शुद्ध एकादशीची होय (कार्तिक वद्य एकादशी हा आळंदीवारीचा दिवस असतो). आषाढीच्या वारीस ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून पंढरीस येते. या वाऱ्यांना प्रत्येक वारकरी फडावर दशमी ते पौर्णिमेपर्यंत भजने आणि कीर्तने करण्यात येतात. रात्री हरिजागर केला जातो. पौर्णिमेस सर्व दिंड्या पंढरपुराजवळील गोपाळपुरीस जमतात. तिथे काल्याचा कार्यक्रम होतो. काल्याच्या लाह्या एकमेकांच्या मुखी घालून वारकरी वारीची सांगता करतात. या ठिकाणी स्पृश्यास्पृश्य भेद मुळीच नसतो. वारकरी संप्रदायाचे हेच वैशिष्ट्य आहे. वर्णभेद, जातिभेद लयाला जाऊन केवळ विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म शिल्लक राहून अमंगळ भेदाभेद लयाला जातो. माळेचा स्वीकार करताना घेतल्या जाणाऱ्या नियमपालनाच्या प्रथेचा विचार केला तर वारकरी संप्रदायात समाजसुधारणेचे केवढे सामर्थ्य आहे हे लक्षात येते. गोव्यामधील साखळीचे विठ्ठलमंदिर ही पाचशे वर्षांंपूर्वीच्या गोमंतकीयांच्या पंढरीवारीचीच फलश्रुती आहे. आज हे स्थान प्रतिपंढरपूर मानले जाते. गोव्यातूनही मोठा भक्तसमूह पंढरपुराला वारीसाठी जात असतो. पण ज्यांना पंढरपुराला जाणे शक्य नसते ते येथे साखळीच्या विठ्ठलमंदिराला भेट देतात. सर्व वर्णांचे, सर्व जातींचे भक्त भक्तियुक्त अंतःकरणाने विठ्ठलाचे दर्शन घेऊन पावन होतात आणि हा भक्तीचा फुललेला मळा पाहून कृतकृत्य झालेल्या आपल्या डोळ्यांचे पारणे फिटते!