वायनाडमधील भूस्खलन गोव्याला सावध करणारे

0
10

>> मुख्यमंत्री; राज्यातील भूस्खलनाबाबतच्या अहवालाचा फेरआढावा घेणार

वायनाड (केरळ)मधील भूस्खलन आमच्यासाठी डोळे उघडणारे आहे. एजन्सीने तयार केलेल्या गोव्यातील भूस्खलनाबाबतच्या अहवालाचा पुन्हा आढावा घेतला जाणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल विधानसभेत केले. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव व इतर आमदारांच्या एका लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते.

यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, विरेश बोरकर, डॉ. गणेश गावकर यांनी एका लक्षवेधी सूचनेद्वारे वायनाडमध्ये झालेल्या भीषण भूस्खलन घटनेकडे सभागृहाचे लक्ष वेधले. या घटनेमुळे अनेकांचा बळी गेला असून, पर्यावरण, मालमत्तेची हानी झाली आहे. गोव्यात सुध्दा भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागांत अनियोजित विकास सुरू आहे. पश्चिम घाटातील धारबांदोडा किंवा इतर भागात दुर्घटना घडण्याची धोका आहे. दुर्घटना टाळण्यासाठी सरकारने कोणत्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत, अशी विचारणा लक्षवेधी सूचनेद्वारे केली होती.

एजन्सीने तयार केलेल्या अहवालावर चर्चा करण्यासाठी आपण लवकरच बैठक घेणार आहे. विधानसभेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन व संबंधित खात्याची बैठक घेऊन सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. राज्यात डोंगर कापणीबाबत तक्रार करण्यासाठी नवीन व्यवस्था तयार केली जाणार असून, त्यात जिल्हाधिकारी आणि पोलीस खाते एकत्रित काम करतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

विकासासाठी परवानगी आणि परवाने देताना सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा सल्ला राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एसडीएमए) नगरनियोजन खात्यासह सर्व नियोजन आणि विकास प्राधिकरणांना देणार आहे, असे बाबूश मोन्सेरात यांनी सांगितले.

नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर इस्रोने (हैदराबाद) फेब्रुवारी 2023 तयार केलेल्या लँडस्लाईड ॲटलस ऑफ इंडिया या अहवालामध्ये उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्हे अनुक्रमे 111 व्या आणि 121 व्या क्रमांकावर आहेत. या अहलावामध्ये वायनाड जिल्हा 13 व्या क्रमांकावर होता, असे बाबूश मोन्सेरात यांनी सांगितले.