केरळमधील हिरव्यागार वनश्रीने आणि सृष्टीसौंदर्याने नटलेल्या वायनाडमध्ये काल प्रलयंकारी पावसामुळे जो हाहाकार उडाला तो निसर्गाचे रौद्रभीषण रूप दर्शविणारा आणि मनुष्यमात्रास त्याने चालवलेल्या अनिर्बंध निसर्गनाशापासून परावृत्त होण्याचा निर्वाणीचा इशारा देणारा आहे. वायनाडमधील गावांत पहाटेच्या अंधारात एकापाठोपाठ तीन ठिकाणी मोठ्या दरडी कोसळल्या, तिथल्या छलियार नदीला महापूर आला, त्यात रस्ते वाहून गेले, पूल कोसळले, राहत्या माणसांच्या वस्त्यांच्या वस्त्या मातीच्या ढिगाऱ्यांखाली गेल्या. मोठ्या संख्येने त्याखाली माणसे गाडली गेली. मृतांचा आकडा वाढतच चाललेला आहे. लष्कर, हवाई दल आणि इतर यंत्रणांनी तत्परतेने मदतकार्य हाती घेतले असले, तरी एकूण ह्या परिसराची दुर्गमता लक्षात घेता किती लोक आणि पर्यटक त्याखाली अडकून पडले असतील ह्याची कल्पनाही करवत नाही. वायनाडमधील दुर्घटना ही केवळ प्रातिनिधिक म्हणावी लागेल. आज हवामान अत्यंत बेभरवशाचे बनले आहे. कधी कुठे महापूर येईल, केव्हा ढगफुटी होईल, कोठे आपत्ती कोसळेल सांगता येत नाही अशा प्रकारच्या विलक्षण अनिश्चिततेच्या युगामध्ये आज आपण येऊन पोहोचलो आहोत. नुकताच पुण्यात महापूर येऊन नागरिकांचे भरले संसार बुडाले. गेल्या महिन्यात सिक्कीममध्ये अशाच प्रकारे दरडी कोसळून हाहाकार उडाला होता. हजारो पर्यटक तेथे अडकून पडले होते. हिमाचल प्रदेश, उत्तराखंडसारख्या डोंगराळ राज्यांमध्ये तर सातत्याने अशा दुर्घटना घडत असतात. निसर्गसंपदेने नटलेल्या डोंगराळ भागांमध्ये अनिर्बंध प्रमाणात चाललेले शहरीकरण आणि त्यासाठी वनसंपदेची होणारी कत्तल हे अशा दुर्घटनांचे प्रमुख कारण आहे हे वेळोवेळी तज्ज्ञांनी नजरेस आणून दिलेले आहे. पाऊस कधी एखाद्या ठिकाणी जास्त होणे हे आपल्या हाती जरी नसले, तरी अशा मुसळधार पावसाचे पाणी नद्यानाल्यांतून वाहून जाण्याऐवजी अतिक्रमणांमुळे ठिकठिकाणी अडवले जाते, परिणामी आजूबाजूच्या परिसरांत रोंरावत घुसते. आपल्या मुळांनी जमीन पकडून ठेवणारी झाडेच शेकडोंच्या संख्येने तोडली जात असल्याने माती ठिसूळ बनून दरडी कोसळतात. भुसभुशीत मातीचे लोटच्या लोट खालच्या वस्त्यांवर जाऊन त्यांना आपल्या अक्राळविक्राळ जबड्यात घेतात. महाराष्ट्रातील माळीणसारख्या वस्त्या अशा दुर्घटनांत तेथील रहिवाशांसह गाडल्या गेल्याच्या दुर्घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. तरीही ह्या अशा गोष्टींपासून काही बोध घेतला जाताना दिसत नाही वा दुर्घटना घडून गेल्यानंतर त्यावर चर्चा करण्यापेक्षा अशा दुर्घटना मुळात घडू नयेत यासाठी उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जात नाही. पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या प्रदेशांचा विकास करीत असताना तेथील निसर्गसंपदेची हानी होणार नाही हे पाहणे जरूरीचे असते, परंतु आपल्या देशात त्याची तमा असते कोणाला? अनिर्बंध पद्धतीने होणारी बांधकामे, त्यासाठी कापले जाणारे डोंगर, तोडली जाणारी वनसंपत्ती ह्या सगळ्यातून आपण मानवाने स्वतःच हे संकट आपल्यावर ओढवून घेतलेले आहे. जागतिक हवामान बदलांवर पंचतारांकित परिषदांतून तावातावाने चर्चा होत असते, परंतु त्याची झळ आता सर्वसामान्यांना अशा दुर्घटनांतून बसू लागली आहे. देशात आज एकही प्रमुख शहर नाही जेथे कधी ना कधी महापुराचा तडाखा बसलेला नाही. राजधानी दिल्लीपासून मुंबई, बंगळूर, चेन्नईपर्यंत महापूर येऊन त्या महानगरांची वाताहत करून गेले. नंतर त्यावर माहितीपट बनवले गेले, परंतु त्या दुर्घटनांपासून आपण बोध काय घेतला? मुळामध्ये पर्यावरण संवर्धन ही बाब बेवारस बाळासारखी आहे. त्याबद्दल कळवळा सगळेच दाखवतात, परंतु त्याची जबाबदारी घ्यायला मात्र कोणीही तयार नसते. वायनाड दुर्घटनेनंतर आता अशा दरडी कोसळण्याच्या कारणांची दूरचित्रवाणी वाहिन्यांवर भरभरून चर्चा होईल. वृत्तपत्रांचे रकाने भरतील, परंतु पुन्हा दुसरी मोठी दुर्घटना घडेपर्यंत ही दुर्घटना विस्मरणातही जाईल. विकास आणि विनाश यांच्यामधली सीमारेषा दिवसेंदिवस पुसट होत चाललेली आहे. एखाद्या प्रदेशाचा विकास साधताना त्यातून तो विनाशाकडे तर वाटचाल करीत नाही ना हे पाहिले जाणार नसेल, तर अशा दुर्घटना घडतच राहतील. आज देशातील सर्व डोंगराळ पर्यटनस्थळांवर अनिर्बंध असुरक्षित बांधकामांचा सुळसुळाट दिसतो. कायदेकानून, बांधकाम नियम, पर्यावरणाचे नियम यांची काहीही तमा न बाळगता बेफाट बांधकामे केली जातात. वाढते पर्यटन वाढता अशा स्थळांच्या पर्यावरणावर वाढता ताणही घेऊन येत असते. आजच्या बेभरवशाच्या हवामानात अशा भीषण दुर्घटना घडायला नको असतील तर पर्यावरणाच्या नियमांबाबत अधिक सजगता, जागरूकता अत्यावश्यक असेल हाच वायनाड दुर्घटनेचा धडा आहे.