वादळी वारे व खराब हवामानामुळे मासेमारीला वेग नाही ः हळर्णकर

0
4

राज्यात 1 ऑगस्टपासून मच्छीमारी हंगाम सुरू झालेला असला तरी समुद्रात वाहणारे वादळीवारे व वाईट हवामान यामुळे राज्यातील मच्छीमारीला वेग येऊ शकला नसल्याचे मच्छीमारी खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी काल दै. नवप्रभाशी बोलताना सांगितले. मात्र, वादळी वारे व खवळलेला समुद्र शांत होताच मोठ्या संख्येने मच्छीमारी बोटी समुद्रात उतरणार असून नंतर मच्छीमारीला वेग येऊन खऱ्या अर्थाने या हंगामातील मच्छीमारी सुरू होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मच्छीमारी खात्यातील सूत्रांनी यासंबंधी बोलताना सांगितले की, वादळी वाऱ्यामुळे समुद्र तर खवळलेला आहेच. त्याचबरोबर येथील मच्छीमारी बोटींवर काम करणारे कामगार जे मच्छीमारी बंदीच्या काळात गावी गेले होते त्यापैकी बरेच जण अद्याप परतलेले नाहीत. राज्यातील मच्छीमारी बोटींवर काम करणारे बहुसंख्य कामगार हे प्रामुख्याने ओडिसा, कर्नाटक, महाराष्ट्र, छत्तीसगढ, तामिळनाडू आदी राज्यांतील आहेत. दरवर्षी हे कामगार कामावर परत येण्यास विलंब करीत असतात अशी बोट चालकांची तक्रार असल्याचे ते म्हणाले.
मच्छीमारी हंगाम सुरू होऊन तीन दिवस झालेले असताना बाजारात मासळीचे प्रमाण तसे कमीच होते. आणि बाजारात आलेल्या मासळीपैकी बरीच मासळी ही परराज्यांतील होती, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

नारळी पौर्णिमेनंतर मच्छीमारीला वेग

एका मच्छीमाराने यासंबंधी बोलताना नारळी पौर्णिमेनंतरच खऱ्या अर्थाने राज्यातील मच्छीमारीला वेग येणार असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की पूर्वी नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ वाहून राज्यात मच्छीमारी हंगाम सुरू व्हायचा. आताही काही मच्छीमार नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्रात नारळ वाहूनच समुद्रात जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात येत्या शनिवार 9 रोजी नारळी पौर्णिमा साजरा करण्यात येणार आहे.