वादळापूर्वीची शांतता

0
350

भारत आणि चीन यांच्यातील गेल्या काही महिन्यांतील शीतयुद्धाचे रुपांतर प्रत्यक्ष युद्धामध्ये होणार की काय अशी चिंता वाटावी अशी परिस्थिती सध्या भारताच्या उत्तर-पूर्व सीमेवर दिसते आहे. लडाखमधील पँगॉंग सरोवराचा परिसर हा सध्या युद्धभूमीचे स्वरूप धारण करताना दिसतो आहे. सोमवारी संध्याकाळी तेथे भारत आणि चीनच्या सैनिकांदरम्यान प्रत्यक्ष गोळीबाराची घटना घडल्याचे वृत्त आहे. भारताने आपल्या सैनिकांनी गोळीबार केल्याचा इन्कार केला असला तरी दोन्ही देशांदरम्यानच्या या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव वाढत चालला आहे ही वस्तुस्थिती नाकारण्यात अर्थ नाही.
खरे तर गेल्या पंधरा जूनला आपल्या वीस जवानांची ज्या निर्घृणपणे चिनी सैनिकांनी हत्या केली, तेव्हाच दोन्ही देशांदरम्यानचा संघर्ष आता पराकोटीला जाईल अशी चिन्हे दिसत होती. मात्र, भारताने तेव्हा कमालीचा संयम पाळला आणि प्रत्यक्ष युद्धभूमीवर चीनला प्रत्युत्तर देण्याऐवजी वेगळ्या व्यापारी रणभूमीवर चीनला खमके उत्तर देण्यात आले. चिनी कंपन्यांची कंत्राटे रद्द करून, चिनी ऍप्सची हकालपट्टी करून अप्रत्यक्षपणे चीनला हादरे दिले गेले. मात्र, प्रत्यक्षात युद्धाला तोंड फुटू नये या दिशेने प्रयत्न केले गेले आणि लष्करी पातळीवरील वाटाघाटींतूनही चीन माघार घ्यायला तयार नाही असे दिसताच आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी स्वतः जातीने या विषयात बोलणी करून चीनला माघार घेण्यास भाग पाडले.
चीनने तेव्हा माघारीचा आव जरी आणला तरी प्रत्यक्षात ही माघार घेतली गेलेली नाही हे आता पुरेपूर दिसून येते आहे. पँगॉंग सरोवराच्या दक्षिणेच्या परिसरातील उंच ठिकाणांवर आपली ठाणी वसवून भारतीय सैन्याने चीनच्या घुसखोरीच्या प्रयत्नांना सध्या मोठा शह दिलेला आहे. लडाखची ही सगळी भूमी उजाड, वैराण भूमी आहे. त्यामुळे तेथे रणगाड्यांद्वारे युद्ध खेळले जाईल हे हेरून चीनने आपल्या रणगाड्यांची आणि रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रांची जमवाजमव नियंत्रण रेषेजवळ सुरू केलेली आहे. एका परीने भारताला उचकावण्याचा प्रयत्न सतत चीनकडून चाललेला आहे. त्यासाठी कुरापती काढल्या जात आहेत. अरुणाचल प्रदेशमधून पाच भारतीयांचे नुकतेच झालेले अपहरण हा याच कुरापतखोर नीतीचा एक भाग आहे. भारतीय सैनिकांना प्रत्युत्तरास भाग पाडायचे आणि मग त्याचा फायदा उठवत आक्रमक पावले टाकायची अशी चीनची एकूण व्यूहरचना दिसते. परंतु भारताने अद्याप संयमाने हा विषय हाताळलेला आहे. पण हे करीत असताना त्याचा अर्थ आम्ही कमजोर नाही हेही सूचित केले गेले आहे. दक्षिण चीनच्या समुद्रामध्ये आपली युद्धनौका भारताने पाठविल्याची जी माहिती समोर आली आहे, ती पुरेशी बोलकी आहे. चीनची कुरापतखोरी मुकाट सहन केली जाणार नाही हा संदेश भारताने दिलेला आहे.
भारत – पाकिस्तान दरम्यानची नियंत्रण रेषा सतत धगधगत असते, परंतु पूर्वेकडील भारत – चीन दरम्यानची प्रत्यक्ष नियंत्रण रेषा भारत – चीन युद्धानंतर झालेल्या शांततेच्या प्रयत्नांची फलश्रुती म्हणून गेली कितीतरी दशके शांत होती. चीनचा भारतीय भूप्रदेशांवरचा दावा कायम राहिला, परंतु त्याची परिणती प्रत्यक्ष चकमकींमध्ये सहसा होत नव्हती. अनेक वेळा आपल्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ चिनी सैनिकांनी घुसखोरी जरूर केली, परंतु नंतर शिष्टाईची बोलणी होताच माघारही घेतली गेली. पण अलीकडच्या काळामध्ये हे प्रयत्न सातत्याने चालले आहेत आणि हेतुतः चालले आहेत असे दिसते.
भारतीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह, परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांच्या वक्तव्यांमधून विद्यमान परिस्थिती किती तणावपूर्ण आहे याची कल्पना येते. प्रस्तुत विवाद मिटवायचा असेल तर त्यासाठी लष्करी, राजनैतिक आणि राजकीय अशा तिन्ही पातळ्यांवर संवाद गरजेचा आहे असे जयशंकर म्हणाले आहेत. परंतु शेवटी लातोंके भूत बातोंसे नही मानते हेच खरे असते. चीनच्या सुनियोजित व्यूहनीतीचा मुकाबलाही तितक्याच चाणक्यबुद्धीने करण्याची आवश्यकता आज आहे.
पंधरा जूनचे भारतीय जवानांचे बलिदान भारत व्यर्थ जाऊ देणार नाही हे माहीत असूनही पुन्हा पुन्हा ज्या प्रकारे चीन कुरापती काढत आहे, ते पाहिल्यास ही युद्धाची खुमखुमी तर नाही ना, असा प्रश्न पडतो. भारताशी असलेल्या संबंधांबाबत सदैव दुटप्पीपणा करीत राहिलेल्या चीनची ही कुरापतखोरी भारत कोणत्या मर्यादेपर्यंत सहन करणार आणि या संयमाचा बांध फुटला तर पुढे काय होणार हे या घडीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. लडाखमध्ये जे चालले आहे ती वादळापूर्वीची शांतता आहे एवढे मात्र निश्‍चित.