वादळाच्या प्रभावामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार

0
3

हवामान विभागाचा अंदाज; ऑरेंज अलर्ट जारी

भारतीय हवामान विभागाने बंगालच्या उपसागरात येत्या 48 तासांत वादळ तयार होण्याची शक्यता वर्तविली असून, मंगळवार 18 जुलैपासून राज्यातील पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. हवामान विभागाने 18 ते 21 जुलै दरम्यान जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या काळात 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
राज्यात चोवीस तासांत पाऊण इंच पावसाची नोंद झाली. राज्यात आत्तापर्यंत 64.92 इंच पावसाची नोंद झाली आहे. मागील 24 तासांत सांगे येथे सर्वाधिक 1.48 इंच पावसाची नोंद झाली. पेडणे येथे 1.25 इंच, वाळपई येथे 1.24 इंच, केपे येथे 1.13 इंच,साखळी येथे 1 इंच, काणकोण येथे 0.88 इंच, म्हापसा येथे 0.78 इंच, फोंडा येथे 0.74 इंच पावसाची नोंद झाली.

साळावली धरणात 82 टक्के पाणीसाठा
सांगे परिसरात पडणाऱ्या जोरदार पावसामुळे साळावली धरणातील पाणीसाठ्यात बरीच वाढ झाली असून, पाणीसाठा 82 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. काणकोण तालुक्यातील गावणे धरणात 84 टक्के आणि चापोली धरणात 71 टक्के पाणीसाठा झाला आहे. फोंडा तालुक्यातील पंचवाडी येथील म्हैसाळ धरणामधील पाणीसाठा 84 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या जून महिन्यात या धरणातील पाणी आटले होते. उत्तर गोव्यातील आमठाणे धरणातील पाणीसाठा 73 टक्के एवढा झाला आहे.

अंजुणे धरणात 26 टक्के जलसाठा
सत्तरी तालुक्यातील अंजुणे धरणामध्ये पाण्याचा साठा अजूनपर्यंत कमीच आहे. या धरणात आत्तापर्यंत केवळ 26 टक्के पाणी जमा झाले आहे. गेल्या जून महिन्यात या धरणातील पाण्याची पातळी 3 टक्क्यांवर आली होती. वाळपई आणि साखळी परिसरात यावर्षी आत्तापर्यंत पावसाचे प्रमाण थोडे कमीच आहे. दरवर्षी वाळपई भागात जास्त पावसाची नोंद होत होती.