- डॉ. मनाली महेश पवार
आयुर्वेद दिनाच्या निमित्ताने ‘देश का प्रकृती परीक्षण अभियान’ सुरू झाले आहे. ही मोहीम म्हणजे एक देशव्यापी आरोग्य जागरूकता उपक्रम आहे. हा उपक्रम आयुर्वेदाला प्रत्येक घराजवळ आणील. नागरिकांना त्यांची अद्वितीय प्रकृती समजून घेण्यास आणि वैयक्तिक, प्रतिबंधात्मक आरोग्यपद्धतीचा अवलंब करण्यास सक्षम बनवेल.
प्रत्येक व्यक्तीचे शरीर हे तीन दोष, सात धातू व तीन मल यांच्या साहाय्याने बनलेले आहे. आयुर्वेदशास्त्रामध्ये वात, पित्त व कफ यांना ‘दोष’ म्हटले आहे. या तीन दोषांपैकी कोणते तरी दोन किंवा एक घटक अधिक उत्कटतेने आपल्या शरीरात कार्य करीत असतात. त्यावरच प्रत्येक व्यक्तीची प्रकृती अवलंबून असते. प्रकृती-विचार हे आयुर्वेदशास्त्राचे वैशिष्ट्य आहे.
9 व्या आयुर्वेद दिनाच्या निमित्ताने ‘देश का प्रकृती परीक्षण अभियान’ सुरू झाले आहे. आयुर्वेदात वर्णन केलेली प्रकृतीची संकल्पना जीनोमिक्सच्या विज्ञानावर व वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधनावर आधारित वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाली आहे. ही मोहीम म्हणजे एक देशव्यापी आरोग्य जागरूकता उपक्रम आहे. ही एक आरोग्य सेवा क्रांती आहे. हा उपक्रम आयुर्वेदाला प्रत्येक घराजवळ आणील. नागरिकांना त्यांची अद्वितीय प्रकृती समजून घेण्यास आणि वैयक्तिक, प्रतिबंधात्मक आरोग्यपद्धतीचा अवलंब करण्यास सक्षम बनवेल.
आयुष मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली व नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टिम ऑफ मेडिसीनद्वारे ‘देश का प्रकृती परीक्षण अभियान’ संपूर्ण भारतात प्रस्थापित झाले. प्रकृती परीक्षणाद्वारे व्यक्तीची जीवनशैली, आहार, व्यायाम, दिनचर्या कशी असावी याचे ज्ञान होते.
एकंदरीत सात प्रकारच्या प्रकृती असतात. वात, पित्त व कफ यांपैकी एकेकाच्या प्रबलतेमुळे तयार होणारे तीन प्रकार म्हणजे अनुक्रमे वातज, पित्तज व कफज प्रकृती. त्यांना एकदोषज प्रकृती म्हणतात. तीन दोषांपैकी कुठल्याही दोघांच्या प्राबल्याने तयार होणारे वातपित्तज, पित्तकफज व कफवातज तर तीनही दोषांच्या प्राबल्याने तयार होणारी ती समप्रकृती. प्रत्येकाच्या ठिकाणी असणाऱ्या विशिष्ट शरीर-मानस लक्षणांवरून वैद्य रुग्णांची प्रकृती ओळखतात.
प्रकृतीची निर्मिती गर्भ तयार होण्याच्या पहिल्या क्षणापासूनच होते. गर्भाच्या निर्मितीसाठी स्त्रीबीज व पुरुषबीज यांचा संयोग होत असताना जे दोष प्रबल असतात, त्यांची अभिव्यक्ती पुढे प्रकृती म्हणून होते. गर्भाशयात जे दोष प्रबल असतील व बाहेरच्या वातावरणात जे महाभूत प्रबल असतील त्यावरसुद्धा प्रकृतीकारक दोषांचे प्राबल्य अवलंबून असते. या सर्वांच्या एकत्रित प्रभावाने तीनपैकी एक किंवा दोन किंवा तीनही दोष प्रबल होऊन त्या गर्भाची व अंततः त्या व्यक्तीची प्रकृती ठरते. या सात प्रकृतींपैकी सम प्रकृतीची व्यक्ती सहसा आजारी पडत नाही, तर एकज किंवा द्वाद्वंज प्रकृतीच्या व्यक्तीचा आजारी पडण्याकडे कल जास्त असतो. माणसाची ही प्रकृती जन्मभर कायम असते. त्यात बदल होत नाही.
वाजत प्रकृती- शारीरिक वैशिष्ट्ये
- चेहरा ः चेहऱ्याचा आकार आयताकृती असतो. चेहरा जितका पातळ असेल तितका वात जास्त असतो.
- डोळे ः डोळे चेहऱ्याच्या आकाराच्या तुलनेत लहान असतात.
- नाक ः तुलनेत लहान, त्याचबरोबर नाकपुड्या लहान असतात.
- ओठ ः ओठ अरुंद असतात व ते फाटलेले दिसतात.
- रंग ः निस्तेज, धुळीचा दिसतो. काहींचा काळसर.
- केस ः केस कोरडे, कुरळे, प्रमाणात कमी.
- त्वचा ः त्वचा कोरडी आणि पातळ असते. लव जास्त प्रमाणात असते.
- हाडे ः वात स्वभावाच्या व्यक्तीच्या हाडांची रचना अरुंद असते. त्यांच्या हाडांच्या आकारात अनियमितता असू शकते. स्नायूंच्या विकासाच्या अभावामुळे वातप्रकृतीच्या लोकांची हाडे फारच ठळकपणे दिसतात.
- मान ः लांब व अरुंद असते, जास्त स्नायू नसतात.
- हात ः लांब, तसेच अरुंद असतात. आकार आयताकृती असतो.
- नखे ः लहान, अरुंद, रुक्ष, सहज तडकतात.
- अंगकाठीने कृश असतात.
- त्वचा खरबरीत असते.
- केस कोरडे आणि दाट असतात.
- झोप कमी आणि अस्वस्थपणा जाणवतो.
- अस्थिर चित्ताचे असतात.
- सहनशीलता आणि एकाग्रता कमी.
- वजन कमी.
- ग्रहणशक्ती तीव्र, पण स्मरणशक्ती कमी.
- सांध्यांमध्ये सतत आवाज.
- आहाराच्या सवयीमध्ये अनियमितता.
- बोलण्याच्या वर्तनातील अनियमितता.
- भुवया हलवण्याची सवय.
- व्यक्ती नेहमी बोलकी असते, जादा शब्द वापरते.
- कंडरा आणि शिरांसंबंधीचे जाळे विपुल प्रमाणात दिसते.
- या लोकांमध्ये खूप लवकर भीती निर्माण होते.
वातप्रकृतीच्या लोकांमध्ये उत्पन्न होणारे सामान्य आजार
- बद्धकोष्टता.
- त्वचा स्फुटन, कोरडेपणा.
- श्वासोच्छ्वासाच्या तक्रारी
- पचनाच्या तक्रारी
- स्नायू आणि सांधेदुखी, हाडांच्या समस्या.
- चिंता, भीती.
- सकष्ट मासिक पाळी.
- सकष्ट प्रसव.
वातप्रकृतीच्या लोकांसाठी आहार-विहार
- निरोगी जीवन जगण्यासाठी वात शमन करणारा आहार सेवन करावा. जीवनशैलीमध्ये बदल घडवावा.
- चांगले शिजवलेले, मध्यम प्रमाणात सकस आहार सेवन करावा.
- संपूर्ण धान्य, दूध, तूप, लोणी यांसारखे पदार्थ सेवन करावेत.
- धान्यामध्ये मूग पथ्यकर आहे. पण वाटाणा, पावटा कटाक्षाने टाळावा.
- अक्रोड, पिस्ता, बदाम, काजू यांसारखा सुकामेवा भिजवून खावा.
- गहू, तांदूळ यांसारखे धान्य वातप्रकृतीसाठी उत्तम.
- मांसरस, सूप हा प्रकार वातप्रकृतीसाठी उत्तम आहे.
- मसाल्यामध्ये हळद, काळी मिरी, आले, जिरे, धणे, हिंग, लवंगा, लसूण यांसारखे सौम्य मसाले सेवन करावेत.
- घरगुती व ताजे अन्न सेवन करावे.
- फ्रिजमध्ये साठवलेले अन्नपदार्थ अजिबात खाऊ नयेत.
- वातप्रकृतीच्या व्यक्तींनी शक्यतो स्निग्ध पदार्थ सेवन करावेत. रुक्षता वाढवणारे फास्टफूड, जंकफूड, मैद्याचे पदार्थ अजिबात खाऊ नयेत.
- हंगामी चांगली पिकलेली फळे व त्यांचा रस सेवन करावा. पण थंड पेय अजिबात सेवन करू नये.
- आहारात शक्यतो नेहमी तुपाचा समावेश करावा.
- स्निग्धांश असलेल्या तेलाचा वापर आहारात करावा, पण तळलेले पदार्थ पूर्ण टाळावेत.
- वात प्रकृतीच्या व्यक्तींनी वाताचे संतुलन राखण्यासाठी दिनचर्येत अभ्यंगाचा (तेलाचे मालीश) नियमित समावेश करावा. तसेच हलके व्यायाम करावेत.
- योगासनांमध्ये ताडासन, वृक्षासन, सूर्यनमस्कार यांसारख्या व्यायामप्रकारांना महत्त्व द्यावे.
- प्राणायामाचा नियमित सराव करावा.
- हलका पोहण्याचा सराव रक्ताभिसरण सुधारते.
- 20-30 मिनिटे चालण्याचा व्यायाम करावा.
- भीती, चिंता, सतत विचार हे वाताचे दोष आहेत. त्यामुळे वातप्रकृतीच्या व्यक्तींचा ध्यान-धारणेकडे जास्त कल असावा.
स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येकाला आपली प्रकृती माहीत असणे गरजेचे आहे.