वात्सल्यसिंधू आई

0
67
  • मीना समुद्र

देश-परदेश वार्‍या अथकपणे त्या लेकरांच्या घासासाठीच करणारी, तळमळीची, मायमोगाची ही माय. ती गेली तेव्हा हजारो अंतःकरणातून याच पंक्ती उमटल्या असतील- ‘प्रेमस्वरूप आई, वात्सल्यसिंधू आई, बोलवू तूज आता मी कोणत्या उपायी…’

‘हजारो अनाथांची माय, राष्ट्रपती पुरस्काराच्या मानकरी ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती सिंधुताई सपकाळ यांचं हृदयविकाराच्या झटक्याने पुण्याच्या ‘गॅलॅक्सी’ रुग्णालयात निधन… सरकारी इतमामात अंत्यसंस्कार होणार…’ बातमी वाचली आणि अंतःकरण भरून आले. वास्कोच्या रवींद्रभवनात एका कला-साहित्यप्रेमी संस्थेतर्फे साहित्यिक, कलाकारांच्या सत्कार समारंभात त्यांच्या पुण्यवान हातून मला मिळालेलं सन्मानपत्र आठवलं. नमस्कारासाठी वाकले असता त्यांचा डोक्यावरचा आशीर्वादाचा हात आठवला आणि आठवलं, त्यावेळी त्यांनी केलेलं अतिशय कळकळीचं भाषण आणि आपल्या लेकरांसाठी पसरलेला पदर.

आठवली, पुण्याच्या सुरेश भट गझलमंचतर्फे आमचा ‘गोफ’ कार्यक्रम सादर करण्यासाठी गेलो असताना तिथली त्यांची चैतन्यदायी उपस्थिती आणि त्यांची कन्या ममता हिच्या गझल सादरीकरणासाठी आणि सर्वांच्याच कौतुकासाठी फिरणारी त्यांची मायाळू, उत्सुक नजर. काही वर्षांपूर्वी पाहिलेला, त्यांच्या सोशिक, कर्तृत्वसंपन्न जीवनाचा पट उलगडणारा चित्रपटही आठवला. नारीशक्ती, अहिल्याबाई होळकर, पुणे विद्यापीठ जीवनगौरव, सह्याद्री, हिरकणी असे त्यांना मिळालेले मानाचे ७५० पुरस्कार. उत्कृष्ट समाजसेविका म्हणून राष्ट्रपती पै. अब्दुल कलाम, श्री. प्रणब मुखर्जी, श्रीमती प्रतिभाताई पाटील आणि नुकताच चौथ्यांदा श्री. रामनाथ कोविद यांच्या हस्ते मिळालेला सन्माननीय राष्ट्रपती पुरस्कार… सारे दूरदर्शन, वृत्तपत्रे अशांच्या माध्यमातून आठवले. यानिमित्त दूरदर्शन, यू-ट्यूब अशा माध्यमांतून, शाळा-महाविद्यालयांतून, अनेक छोट्या-मोठ्या संस्थांमधून झालेल्या सत्कारानिमित्त त्यांनी केलेली भाषणे, दिलेल्या मुलाखती आणि श्रोत्यांशी साधलेला सुसंवाद हे सारे पाहिले, ऐकले. या सर्वांमागचं किंवा सर्वांमधलं समान सूत्र होतं ते म्हणजे त्यायोगे घडलेलं या ‘माय’चं, या ‘आईचं’, या ‘माईचं’ मनोज्ञ दर्शन! अन् वाटलं, आभाळाचं मन आणि मातीची माया घेऊन उपेक्षित दीनदलितांना, अनाथ- पीडित- असहाय्यांना छत्रछाया देणारी ती त्यांची माय झाली. अनाथ मुलांचीच नव्हे तर भाकड म्हणून अनाथ झालेल्या, सोडलेल्या ३५० गायी, २५० जावई, ५० सुना अशा गजबजलेल्या एकत्र कुटुंबाची ती ‘माय’ म्हणून मिरवली. या सार्‍यांच्या जीवनाची ती प्रकाशवाट झाली, दीपस्तंभ झाली.

खरं तर तिचं स्वतःचं आयुष्य कुठं होतं प्रकाशमान? १४ नोव्हेंबर १९४७ रोजी वर्ध्यातल्या नगरगाव येथे अठराविश्‍वे दारिद्य्र आणि अज्ञानाचा भयावह अंधार असणार्‍या घरात तिचा जन्म झाला. अडाणी आईने मुलीला शिकण्याची प्रचंड आवड असूनही तिच्या हातात म्हशीचा कासरा दिला. म्हशींना कशीबशी मारून-मुटकून पाण्यात बसवून, वडिलांनी नाव घातलेल्या शाळेत जाऊन कशीबशी चौथीपर्यंतची शाळा अर्धवटपणेच पूर्ण केली आणि त्यावेळच्या प्रथेप्रमाणे वयाच्या अवघ्या ९व्या वर्षीच तिचे लग्न लावले गेले. ३५ वर्षीय नवर्‍याच्या गळ्यात ही धोंड बांधून मातापिता निश्‍चिंत झाले. ज्या वयात खेळा-बागडायचे, नाचायचे-उडायचे, हसायचे-गायचे, हट्ट करायचा त्या वयात संसाराचे जोखड तिच्या खांद्यावर आले आणि सासरचे अन्याय, अत्याचार, नवर्‍याची शिवीगाळ, मारझोड यात आयुष्य चिंधीसारखे फाटत, तुटत, विरत चालले. अशातच दिवस गेले आणि लाथाबुक्क्या घालून नवर्‍याने तिला गायीच्या गोठ्यात ढकलून दिले. तिथेच ती वीस वर्षांची मुलगी बाळंत झाली आणि बेशुद्ध पडली. तेव्हा ज्या गायीची देखभाल ती करायची त्या गायीने तिच्या चारी बाजूला चार पाय ठेवून तिला संरक्षण दिले… इतर जनावरे पाय देतील म्हणून! आणि ती तिला हंबरून उठवू लागली, सावध करू लागली. ग्लानीतून बाहेर येताच तिने दगडाने १६ वेळा मारून नाळ तोडली आणि घराला रामराम करून जीव देण्यासाठी बाहेर पडली. ओली बाळंतीण, पोटात भुकेची आग पेटलेली. रेल्वे स्टेशनवर भीक मागितली तर कोणी देईना, तेव्हा गाणे म्हणून भीक मिळालेली भाकरी खाण्यासाठी गेली असता मरणाच्या दारी टेकलेला एक भिकारी पाणी मागताना दिसला- तेव्हा त्याला भाकरी खाऊ घातली, पाणी दिले आणि तो भिकारी जणू जिवंत झाला. त्याला तरतरी आली. मग आपण दुसर्‍याचा जीव वाचवू शकतो तर मरायचे कशाला? ‘जीओ और जीने दो’चे तत्त्वज्ञान तिच्या मनात आता रेंगाळू लागले.

दहा दिवसांची तान्हुली पदरात घेऊन ती तरुणी स्मशानाचा आसरा घेऊन निर्भय झाली. पोटाच्या आगीसाठी तिने रस्त्यावरचे पीठ मडक्याच्या पाण्यात पानावर कालवून छोटीशी भाकरी प्रेताच्या अग्नीवर भाजली आणि खाल्ली. कल्पनेतही येणार नाही असे दाहक वास्तव त्या मुलीने भोगले. पण या काळोखातूनच एक ठिणगी तिच्या करुणामय मनात पडली आणि तिने इतरांच्या पोटाची भूक भागविण्याचा वसा हाती घेतला. ज्यांना तिने अन्न दिले ते निराधार लोक, मुलेबाळे तिच्यासोबतच राहिली आणि एक कुटुंबप्रमुख गृहिणीपदाची जबाबदारी तिने आजीवन कर्तव्यनिष्ठेने निभावली ती भाषणे देऊन, दानशूरतेला आवाहन करीत, पदर पसरून. तिने स्वतःची ओळख निर्माण केली. ‘हजारो अनाथांची माय’ होण्याचं भाग्य तिला लाभलं आणि स्वतः अर्धशिक्षित असूनही त्यांची मुलंबाळं एमए, पीएच्‌डी, एम फील, डॉक्टर्स झाली. असे नावाजलेले नागरिक बनलेले असून माझ्यानंतर तेच कार्य चालू ठेवतील याचा विश्‍वास त्या मातेच्या मनात होता.

सिंधुताईंची स्मरणशक्ती अफाट. सुरुवातीला रस्त्यात इकडे-तिकडे मिळणारे कागद-चिटोरे वाचून त्यांनी शेरोशायरी, कवितेच्या ओळी, हमसे ना तू खाने-पिने की बात कर, मर्दों की तरह दुनिया में जीने की बात कर, जिस मातृभूमी की तू गोद में पला, जिसकी पवित्र धूल में घुटने के बल चला, उसके फटे आँचल को तू सीने की बात कर… अशी परिचित चालीवरची गाणी आपल्या भाषणात पेरली. पुण्यात ‘बालगंधर्व’मध्ये भारत-रशिया मैत्रीकराराबद्दल सभेत मंत्री, नेतेमंडळी उपस्थित होती. काहीतरी क्लृप्ती करून, आत प्रवेश मिळवून काश्मीरच्या नेत्याचे भाषण झाल्यानंतर त्यांनी माईक हातात घेतला आणि स्वतःला भिकारी, झाडूवाली, कामवाली- कोण समजतात ते समजोत, पण सच्चा भावाने देशभक्तीपर आणि उपदेशपर गाणी म्हटली. मोठ्या धाडसाने भाषण ठोकले ते सार्‍यांनाच भारून टाकणारे. तेव्हापासून त्यांचे कार्य मोठमोठ्या मंडळींच्या लक्षात आले. त्यांनी पहिले गाणे (भजन) गायले तेही एका मंदिरात. अतिशय जिद्दीने, धारिष्ट्याने त्यांनी भाषणे केली. ‘भाषण नहीं तो राशन नहीं’ म्हणत भाषणांनी आपल्या विनाअनुदान संस्था चालवल्या. आणि ‘आम्हाला हसायला शिकव पण आमचे दुःखाचे दिवस आम्हाला विसरू देऊ नकोस’ असे ब्रीदवाक्यही अनुसरले. अत्यंत खड्या आवाजात ‘बाळा, बाबा’ असे लहानथोरांना संबोधत खेळीमेळीने, मोकळेपणाने, साध्या-सोप्या-ओघवत्या अनघड शैलीत, हिंदी-मराठी-संस्कृत थोडीथोडी पेरत विषयानुरूप कविता-गाणी म्हणत, आपल्या जीवनाचे अनुभव कथन करत श्रोत्यांशी हृदयसंवाद साधणे हे त्यांच्या भाषणाचे प्रमुख वैशिष्ट्य. खुसखुशीत विनोदाची पेरणीही भाषणात असते. खुदही खाते तो विकृती, बॉंट के खाये तो संस्कृती; हिंमत से काम लो, जीना आता है|’ ‘काट्यांना बोचणं माहीत, फुलांच्या पायघड्यांवरून चालताना ते बोचणारच, ते सहन करायला शिका, स्वतः मरून संपण्यापेक्षा जगून इतरांना वाचवा, बाहेरचे दिवे विझतात तेव्हा आतले दिवे लाव’ असे अनेेक सुविचारसदृश्य वाक्ये त्यांच्या तोंडून अगदी सहजगत्या बाहेर पडतात. बहिणाई, सुरेश भट यांच्या काव्याचे, चरित्रवाचनाचे, श्रवणाचे उत्तम संस्कार आणि एक सतत उत्सुक, स्वागतशील मन त्यांच्याजवळ आहे. स्त्रीजातीबद्दल कमालीचा आदर, विश्‍वास, श्रद्धा असल्यानेच बाई नाही तर काही नाही, संसार झिरो, शेतकर्‍याच्या बायकोनं त्याला धीर द्यायला हवा, सांभाळायला हवं तर त्यांच्या आत्महत्या थांबतील. आईवडिलांनी मुलांसाठी वेळ द्यायला हवा. मादी नको, माय बना- असे त्या सांगतात. स्वतःच्या छळणार्‍या नवर्‍याला माफ करून मुलगा म्हणून वाढविण्याचे क्षमाशील हृदय त्यांचेच. गायीने जीवदान दिले म्हणून गोरक्षण संस्था स्थापन करून कर्तव्य आणि कृतज्ञता साक्षात करणारे मनही त्यांचेच. मातृभक्ती, देशभक्ती आणि सुसंस्कारांची शिकवण देणारी आणि आपल्या हजारो अनाथ लेकरांची भूक भागवणारी, त्यांच्यात आणि स्वतःच्या लेकीत डावे-उजवे होऊ नये म्हणून तिला दगडूशेट हलवाई ट्रस्टच्या स्वाधीन करणारी आणि मुक्काम पोस्ट ‘फिरस्ती’ असं सांगत देश-परदेश वार्‍या अथकपणे त्या लेकरांच्या घासासाठीच करणारी, तळमळीची, मायमोगाची ही माय. ती गेली तेव्हा हजारो अंतःकरणातून याच पंक्ती उमटल्या असतील- ‘प्रेमस्वरूप आई, वात्सल्यसिंधू आई, बोलवू तूज आता मी कोणत्या उपायी…’