वातरक्त ः एक दारुण आजार

0
378
  • डॉ. मनाली म. पवार
    (सांतइनेज-पणजी)

सर्व प्रकारचे सांधे दुखणे म्हणजे संधिवात नसतो. म्हणून योग्य वैद्याच्या सल्ल्यानेच चिकित्सा- औषधोपचार करावे. या व्याधीमध्ये पथ्यापथ्याला खूप महत्त्व आहे. हा आजार पूर्णतः कधी समूळ नष्ट होत नसल्याने या आजारावर रसायन चिकित्सा महत्त्वाची ठरते.

थंडीच्या दिवसात सांधे दुखणे किंवा हात-पाय जखडल्यासारखे होणे अशी लक्षणे घेऊन बरेच रुग्ण दवाखान्यात येतात. पण आपण या सगळ्या रुग्णांचे निदान संधिवात म्हणून करू शकत नाही. संधिवात हा बर्‍याचवेळा म्हातारपणातील वातरोग असतो. जेव्हा हाडे ठिसूळ होतात. हाडांमधील पोकळीमध्ये वात वाढतो. संधीच्या ठिकाणी वात वाढतो तेव्हा संधिवात होतो असे म्हणता येईल. पण काही वेळा मध्यम वयातील रुग्णांमध्ये व ज्याला थंडीच्या ऋतुचीच गरज आहे असे होत नाही पण संधिमध्ये पीडा मात्र जाणवते. अशा वेळी आपण मात्र अशा रोगाला संधिवात असे म्हणू शकत नाही. आयुर्वेद शास्त्रामध्ये वात आणि रक्त यांची स्वतंत्रपणे दुष्टी होऊन या दोघांच्या संमूर्छनेतून एक व्याधी उत्पन्न होतो व त्याला ‘वातरक्त’ असे म्हणतात, असे वर्णिलेले आहे.
वातरक्तालाच खुडवात, आढयवात, वातबलासक असे पर्यायी शब्द आहेत. खुड याचा अर्थ संधी किंवा क्षुद्र, लहान म्हणजेच ज्या रोगामध्ये लहान संधीची विकृती होते तो खुडवात. आढयवात म्हणजे श्रीमंत लोकांना होणारा वाताचा आजार. वातबलासक वाताच्या आवरणाने रक्त अधिक दुष्ट होते व व्याधी बलवान होतो त्यामुळे वातबलासक प्रत्यक्षातही हा आजार श्रीमंत, सुकुमार, अधिक सुखी व्यक्तींना होतो, असे दिसून येते.
आजचे काही जाणकार सुप्रसिद्ध वैद्य वातरक्ताला ‘हृमॅटॉइड आर्थ्रायटीस’ असे म्हणतात. कारण या रोगाची सुरुवात अंगुष्ठपर्वाच्या ठिकाणी होते व हळुहळू अन्य अंगुलीच्या पर्वसंधीमध्ये पसरू लागते. त्याचीही विकृती होते. तद्नंतर अन्य संधींमध्येही शोथ, शूल, आरक्तवर्णता, उष्णस्पर्श, स्पर्शासहत्व ही लक्षणे दिसतात. अन्य संधीची विकृती होत असताना एक विशिष्ट क्रम असतो. पर्वसंधीपासून क्रमाने मध्यभागाकडील संधींची विकृती होत जाते, हे यातील वैशिष्ट्य आहे. म्हणजे पायातील पर्वसंधी- गुल्फ – जानु- वंक्षण हा क्रम असेल तर हातात पर्वसंधी – मणिबंध – कर्पूर- अससंधी हा क्रम कधीच बदलत नाही.

वातावरणातील महत्त्वाची कारणे-
व्याधीचे निदान करण्यासाठी फक्त रक्त- लघवी, एक्स-रे सारख्या तपासण्याच महत्त्वाच्या नाही तर रुग्णांचा आहार-विहाराचा पूर्वेतिहास घेतला तरी रोज घडणार्‍या कारणांमुळे रोगाचे निदान करता येते.

  • लवण, अम्ल, कटु, क्षार, स्निग्ध, उष्ण पदार्थांचे अधिक प्रमाणात सेवन करणे
  • जेवणात वरून मीठ घेण्याची सवय असणे.
  • जेवणात आंबट दही, लोणचे-भाजीसारखे खाणे इ. फक्त चमचमीत पदार्थच आवडणे.
  • अजीर्ण झालेले असले तरी सवय म्हणून, वेळ झाली म्हणून क्रम म्हणून जेवणे-खाणे.
  • कुजलेले, नासके व शुष्क मांस सेवन करणे.
  • तिळाची पेंड
  • कंदमूळांच्या भाज्यांचे अतिसेवन.
    कुळीथ, पावटा, उडीद अशा पित्तकर आहाराचे अतिसेवन. डोसा, इडली, मेदूवडा, घावणे यांसारख्या पदार्थांचे अतिसेवन.
  • दही, कांजी, आंबट, ताक व मद्याचे सेवन.
    विरुद्धाशन – फ्रूट सॅलड, सर्व प्रकारच्या फळांचे मिल्कशेक इत्यादी.
  • क्रोध, संताप
  • रात्री जागरण, दिवसा झोपणे, रात्री उशिरा जेवणे.
  • सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तणावपूर्वक जीवन जगणे.
    आधुनिक शास्त्राप्रमाणे हा एक ऑटो-इम्यून आजार आहे. म्हणूनच तो कधी बरा होणारा नाही पण योग्य पथ्यापथ्याचे पालन केल्यास आजाराच्या काही लक्षणात आराम मिळू शकतो. यात निदान परिवर्जन (वरील कारणांचा त्याग) करणेच महत्त्वाचे आहे.

वातरक्तातील दिसणारी लक्षणे…

  • संधिप्रदेशी अत्यधिक प्रमाणात वेदना
  • पर्वसंधीपासून अन्य संधीकडे पसरणारी विकृती
  • संधीप्रदेशी सूज, वेदना, लाल होणे, गरम वाटणे व खूप जास्त प्रमाणात स्पर्शसुद्धा सहन न होणे.
  • ताप हे वातरक्ताचे प्रमुख लक्षण त्यालाच हृमॅटिक फिवर म्हणता येते.
  • हाडाच्या सांध्याच्या ठिकाणी पिडीकांची उत्पत्ती (हृमॅटिक नोड्यूल) हेही वातरक्तातील प्रधान लक्षण आहे.
  • त्याचप्रमाणे वातरक्त हा आजार उत्तन व गंभीर वातरक्त असा दोन प्रकारे विभाजित केला जातो. उत्तान वातरक्तामध्ये खाज, दाह, वेदना, टोचल्याप्रमाणे वाटणे, त्वचा काळी होणे ही लक्षणे आढळतात.
  • गंभीर वातरक्तामध्ये काठिण्य, वेदनाधिक्य, दाह, तोद, भेद, स्फूरण अशी लक्षणे असतात.
  • संधी, अस्थि, मज्जा या ठिकाणी तोडल्याप्रमाणे वेदना जाणवतात.
  • काही वेळा या वेदना अचानक नष्ट झाल्याप्रमाणे जाणवते व त्या ठिकाणी सुप्ति हे लक्षण निर्माण होते.
  • अवयवांच्या ठिकाणी वक्रता, संधिवक्रता व त्यामुळे खंड वा पांगुल्य यासारखी लक्षणेही गंभीर वातरक्तामध्ये उत्पन्न होतात.

औषधोपचार –
सर्व रोग हे मंदाग्नीतून उत्पन्न होतात, या न्यायानुसार वातरक्तसुद्धा त्याला अपवाद नाही. यात प्रथम आमावस्था निर्माण होते व वात व रक्ताला दूषित करतो व स्रोतोरोध होतो. म्हणून चिकित्सेची सुरुवात ही शोधनोपचाराने करावी. यामध्ये वात व रक्त दुष्टी असल्याने वाताची बस्ति चिकित्सा प्रधान असल्याने बस्ति द्यावा. निरुह बस्तिसाठी दशमूळ काढा वापरावा व अनुवादन बस्तिसाठी घृताचा (तूपाचा) उपयोग करावा.

  • रक्तासाठी रक्तमोक्षण करावे. रक्ताबरोबर पित्ताचा संबंध असल्याने मृदू रेचन महत्त्वाचे ठरते.
  • अभ्यंगासाठी विविध तेलाचा उपयोग केला जातो. शतावरी, ज्येष्ठमध, गुडूची व बला यांनी सिद्ध केलेले तेल लाभदायी ठरते.
  • बला तैल किंवा क्षीरबल तैल हे बाह्य तथा अभ्यंतर स्नेहनासाठी उपयुक्त ठरते.
  • औषधी द्रव्यांमध्ये गुडुची, मंजिष्ठा, सारिवा, पर्पटक, कुमारी, निंब, निर्गुडी, शतावरी, दशमूल, जीवनीय गणातील द्रव्ये, एरंड, त्रिफळा, रास्ना ही द्रव्ये महत्त्वाची आहेत.
  • वरील सर्व औषधी द्रव्यामध्ये ‘गुळवेल’ हे वातघ्न, रक्तदुष्टी दूर करणारे वातरक्तासाठी व्याधिप्रत्यनिक ठरणारे औषधी द्रव्य आहे. गुडूची चूर्ण, गुळवेल सत्व, अमृता गुग्गुळ, अमृतारिष्ट असे गुडूचीचे विविध कल्प वातरक्तामध्ये विशेष उपयुक्त ठरतात.
  • वातरक्तात असणारी रक्तदुष्टी लक्षात घेता मंजिष्ठादि काढा, सारिवाद्यासव, चंदनासव, कामदुधा, प्रवाळ, वाळा, कमल, नागकेशर, महातिक्तक घृतसारख्या औषधी द्रव्यांचा उपयोग करावा.
    हा आजार पूर्णतः कधी समूळ नष्ट होत नसल्याने या आजारावर रसायन चिकित्सा महत्त्वाची ठरते. यामध्ये संशमनी वटी किंवा गुडूची सिद्ध घृत किंवा गुळवेल कोणत्याही प्रकारे सेवन करीत रहावी. हे रसायन म्हणून घेणे आवश्यक ठरते.

पथ्यापथ्य –

  • जुना तांदूळ, यव, गोधूम, मूग, मसूर, द्राक्ष, आवळा, गाई-म्हशीचे दूध हे विशेष पथ्यकर आहे.
  • उडीद, कुळीथ, दही, मद्य, कटू-उष्ण-लवण असे अन्न, दिवसा झोपणे, अग्निसेवा हे अपथ्यकर आहे.
    सर्व प्रकारचे सांधे दुखणे म्हणजे संधिवात नसतो. म्हणून योग्य वैद्याच्या सल्ल्यानेच चिकित्सा- औषधोपचार करावे. या व्याधीमध्ये पथ्यापथ्याला खूप महत्त्व आहे.