वातदोषावरील श्रेष्ठ चिकित्सा ः ‘बस्ति’

0
190
  •  डॉ. सुरज स. पाटलेकर
    अध्यापक, गोमंतक आयुर्वेद महावि.

असेच मनात आले म्हणून बस्ति देऊ शकत नाही. त्यासाठीसुद्धा काही पूर्वकर्म, प्रधानकर्म व पश्चातकर्म असतात. रुग्णबल, दोष, काल, रोग, रोगी, त्यांची प्रकृती, अवस्था इतर विचार करुन त्या त्या दोषांचा नाश करणार्‍या औषधी द्रव्यांचा बस्तिकर्मामध्ये योग्य प्रयोग केल्याने तो बस्ति रोग अवश्य दूर करतो.

‘बस्ति’ ही वातदोषांवरील श्रेष्ठ चिकित्सा आहे, तसेच इतर दोषांवरही कार्य करतो. जवळपास सर्व रोगांमध्ये व सदाहितकर आहे. सध्या ‘पंचकर्म’ नावाचे जे स्तोम माजवले जात आहे, ते फक्त मसाज नव्हे तर त्यात बस्ति हेसुद्धा एक कर्म आहे. आयुर्वेदातील ‘अर्धचिकित्सा’ असेही आचार्यांनी बस्ति या उपक्रमाला संबोधिले आहे. आणि खरंच, तशी ती आहेदेखील. कारण ६०-७०% शारीरिक विकार हे वातदोषामुळेच होतात. त्या वातावर काम करणारा उपक्रम म्हणूनच तर बस्तिला पंचकर्मामध्ये असाधारण स्थान दिले गेले आहे. वातदोष वाढल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे अस्थिविकार/संधीविकार उद्भवतात… जसे की सांधे दुखणे (हाताच्या, पायाच्या, कंबरेच्या, पाठीच्या, मानेच्या इतर), हातापायात मुंग्या येणे, सांधे आखडणेे, एवढेच नव्हे तर डोके, कान, दाढ दुखणे… (अर्थातच कारण महत्वाचे व ते निश्चित करुनच ठरवावे की बस्ति द्यायचा की नाही ते) ह्या तक्रारींसाठीपण बस्ति उपयुक्त चिकित्सा ठरते. वायुमुळेच कफ, पित्ताचे वहन घडत असते व शरीराच्या क्रियांवर वाताचे नियंत्रण असते. वायुखेरीज इतर दोष काहीच करु शकत नाही. व अश्या या वाताचे मूळ स्थान पक्वाशय सांगितले आहे आणि त्याची शांती झाल्याने सम्पुर्ण शरीरगत रोगसमुहांचा नाश होतो. पक्वाशयातून बस्ति कार्य सर्व शरीरभर होते. ज्याप्रमाणे वृक्षाच्या मुळास दिलेले जल संपूर्ण वृक्षामध्ये पसरते त्याप्रमाणेच बस्ति स्वशक्तिने डोक्यापासून पायापर्यंत सर्व दोषांचे ग्रहण करतो व मुळासकट उखडून टाकतो. बस्तिसाठी वापरली जाणारी औषधे ही तैल, काढा, दुध, मध, गोमूत्र व इतर स्वरुपात असतात.

बस्तिद्वारा जी औषधी द्रव्ये गुदादि मार्गाने अंतर्प्रविष्ट केली जातात, शरिरात काही काळ राहतात, त्यास बस्ति असे म्हणतात. बस्ति म्हणजेच एनिमा असे जे म्हटले जाते ते साफ चुकीचे आहे. एनिमा हा बस्तिचा प्रकार आहे असं आपण म्हणु शकतो पण सर्व बस्ति हे त्यात नाही समाविष्ट करू शकत. कारण एनिमामध्ये नेहमी केवळ मलप्रत्यागम/पोट साफ करण्यासाठी गुदमार्गाद्वारे ग्लीसरीन किंवा साबणाचे पाणी यांसारखे द्रव्य दिले जातात तर बस्तिमध्ये गुदमार्ग/ गुदद्वारातून पक्वाशयामध्ये व्यतिरिक्त मूत्रमार्ग मुत्राशयामध्ये, योनीमार्ग/योनिद्वारा गर्भाशयामध्ये व व्रणमुखातून व्रणामध्येसुद्धा औषधी द्रव्ये प्रविष्ट केली जातात. बस्तिसाठी वापरली जाणारी औषधे ही जरी तैल, काढा, दुध, मांसरस, रक्त इतर स्वरुपात असतात तरीही कोमट तैल हे वातासाठी सर्वश्रेष्ठ आहे.

बस्ति ही लहान बाळ, तरुणपणी आणि वृद्ध ह्या तिन्ही वयोगटांना देता येते. नित्य प्रयोग केल्याने डोळ्यांसाठी पण हितकर आहे, चष्म्याचा नंबर झपाट्याने जर वाढत असेल तर ते बस्तिने आटोक्यात येऊ शकते. मलशोधन करते (शौचास साफ व्हायला मदत करते). अगदीच बद्धकोष्ठतेमध्ये तर अत्यंत गरजेची. असे हे पंचकमामधील एक. नेहमी बस्ति घेतल्यामुळे तारुण्य टिकून राहते किंवा म्हातारपण लवकर येत नाही. स्वस्थ आयुष्य आणि बल वाढते.

शरीराला स्थिरता देते. भूक व स्मरणशक्ती चांगली ठेवते व वाढवते. त्वचेची कांती, आवाज उत्तम करते. कार्यक्षमता वाढते, उत्साह टिकून राहतो, केस गळणे व पिकणे थांबवते, शुक्र वाढवते, स्रोतसांचे शोधन करविते. बस्तिद्रव्य आत गेल्यानंतर तिथे काही वेळ राहिली पहिजे. प्रत्येक प्रकारच्या बस्तिची आत राहण्याची कालावधी वेगवेगळी असते. बस्ति शीघ्र बाहेर येऊनसुद्धा सम्पूर्ण शरीरगत दोषानां दूर करतो. ज्या व्यक्तिचे शरीर स्तम्भित झाले आहे, अस्थिभग्न अश्यांमध्ये बस्ति विशेष लाभकारी आहे. बस्ति आतड्यांना बळ देते. पोटदुखी, अरुचीमध्येसुद्धा प्रशस्त आहे.
एवढेच नव्हे तर अपत्य होण्यासाठी (गर्भधारणा होत नसेल तर), वजन कमी करण्यासाठी(स्थौल्यामध्ये) किंवा वाढवण्यासाठीही बस्तिचा उपयोग होतो.

असेच मनात आले म्हणून बस्ति देऊ शकत नाही. त्यासाठी पण काही पूर्वकर्म, प्रधानकर्म व पश्चातकर्म असतात. रुग्णबल, दोष, काल, रोग, रोगी, त्यांची प्रकृती, अवस्था इतर विचार करुन त्या त्या दोषांचा नाश करणार्‍या औषधी द्रव्यांचा बस्तिकर्मामध्ये योग्य प्रयोग केल्याने तो बस्ति.. रोग अवश्य दूर करतो. बस्ति केशग्रापासून नखाग्रापर्यंत अर्थात संपूर्ण शरीराचे बृंहण करतो. गर्भस्राव, अल्पायु संतानमध्ये बस्ति अमृतसमान आहे. अनुवासन (स्नेह बस्ति), निरुह (कषाय बस्ति)/यापन बस्ति, मात्रा बस्ति असे बस्तिचे काही प्रकार. तरीही नवज्वर, अजीर्ण, अग्निमांद्य (जेव्हा भुक व्यवस्थित लागत नसेल व अन्न पचवण्याची क्षमता थोडी मंद झालेली असेल) यांसारख्या अवस्थेमध्ये बस्ति निषिद्ध आहे. पण जर बस्ति व्यवस्थित दिला गेला नाही तर व्यापदे सुद्धा तेवढीच त्रासदायक होऊ शकतात. म्हणूनच तज्ञ वैद्यांच्या सल्ला व मार्गदर्शनाशिवाय कोणीही बस्तिचा प्रयोग स्वत: करू नये.