वाढत्या चोर्‍यांप्रकरणी पोलिसांना सतर्कतेचे आदेश ः मुख्यमंत्री

0
101

राज्यातील विविध भागातील वाढत्या चोर्‍यांची दखल घेऊन पोलीस यंत्रणेला सतर्क करण्यात आहे. भाडेकरू आणि परराज्यातून येणार्‍या लोकांची १०० टक्के पडताळणी करण्याची सूचना पोलिसांना करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत काल दिली.

रोहन खंवटे यांनी पर्वरी मतदारसंघातील चोर्‍यांचा प्रश्‍न शून्य तासाला उपस्थित केला होता. त्यावर बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, घरमालकांनी भाडेकरूची नोंदणी पोलिसांकडे केली पाहिजे. बर्‍याच घरमालकांकडून भाडेकरूंची नोंदणी केली जात नाही. भाड्याने राहणारे काही लोक चोर्‍यांमध्ये गुंतलेले आढळून येत आहे. पोलीस गस्त वाढविण्याची सूचना करण्यात आली आहे. परराज्यातून येणार्‍या लोकांची कसून तपासणी करण्याची सूचना पोलिसांना करण्यात आली आहे, असेही सावंत यांनी सांगितले.

पर्वरी मतदारसंघात दिवसाढवळ्या दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकाविण्याच्या घटना घडलेल्या आहेत. तसेच एकाच दिवशी तीन फ्लॅटमध्ये चोर्‍या करण्यात आलेल्या आहेत. पर्वरी परिसरात चोर्‍यांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, असे खंवटे यांनी सांगितले.
कुठ्ठाळी मतदारसंघातील वाढत्या चोर्‍यांचा प्रश्‍न एलिना साल्ढाणा यांनी बुधवारी उपस्थित केला होता. कुठ्ठाळी परिसरात पोलीस गस्त वाढवून परराज्यातून येणार्‍या लोकांची चौकशी करण्याची सूचना करण्यात आली आहे, असेही सावंत यांनी सांगितले.