वाट पाहते पुनवेची…

0
29
  • मेघना कुरुंदवाडकर

हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही ‘वटपौर्णिमा’ म्हणून साजरी केली जाते. यंदा ती 21 जूनला येत आहे. विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची या दिवशी पूजा करतात. या वटपौर्णिमेच्या व्रताविषयी…

हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही ‘वटपौर्णिमा’ म्हणून साजरी केली जाते. यंदा ती 21 जूनला येत आहे. या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.
पुराणकथेनुसार भगवान शंकराचे लक्ष संसारात नाही म्हणून रागावलेल्या पार्वतीने त्याला ‘तू वृक्ष होशील’ असा शाप दिला आणि शिवशंकर वटवृक्ष झाले! महाप्रलय झाल्यावर सगळे चराचर नष्ट झाले तेव्हादेखील फक्त वटवृक्ष पृथ्वीवर घट्ट पाय रोवून उभा राहिला. त्याची प्रत्येक फांदी, पारंबी व पानातूनसुद्धा नवीन वटवृक्ष जन्म घेतो म्हणून त्याला ‘अक्षयवट’ असेही म्हटले जाते. त्याच्या या कालातीत अस्तित्वामुळे स्त्रिया त्याला अखंड सौभाग्याचे साकडे घालतात. नैसर्गिक गुणाप्रमाणे आपल्या पतीला आणि कुटुंबीयांना आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभावे हा त्यामागचा हेतू आहे.

या व्रतामागे एक पारंपरिक सावित्री आणि सत्यवान यांची पौराणिक आख्यायिका सांगितली जाते. अनेक वर्षांपूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली. सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नकोस असा सल्ला सावित्रीला दिला. पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू-सासऱ्याची सेवा करू लागली.

सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसांवर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले, पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासू-सासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने ‘तथास्तु’ म्हटले म्हटले खरे, पण त्याचवेळी वचनबद्ध होऊन त्याला सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वटसावित्री व्रत आचरतात.
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत स्त्रियांनी हे त्रिरात्र व्रत करावे असे सांगितले जाते. तीन दिवस उपवास करणे अशक्य असेल त्यांनी फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा. सावित्रीसह ब्रह्मदेव ही या व्रताची मुख्य देवता असून सत्यवान-सावित्री, नारद व यमधर्म या उपांग देवता आहेत.
आपल्याकडे गोवा तसेच महाराष्ट्रात ‘वटपौर्णिमा’ हे व्रत बायका मोठ्या आवडीने करतात. खरे तर हे सणवार, व्रत-वैकल्ये मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीत संक्रमित होत आली आहेत. आपल्याला वाटते आजच्या या आधुनिक युगात असे उपास-तापास, व्रत-वैकल्ये करायला वेळ कुठे आहे? हल्ली शिकल्या-सवरलेल्या मुली, नोकरी करणाऱ्या मुलींना वेळ कुठे मिळणार हे सगळं करायला? पण नाही. आजही सुवासिनी, तरुण विवाहिता उलट वेळात वेळ काढून छानसं नटून-थटून वडाच्या पूजेला जाताना दिसतात.

आपली ही व्रतवैकल्ये, सणवार ही जी पूर्वापार संस्कृती आहे, ती जपून ठेवून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित केली जातेय. वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी नटून-थटून अखंड सौभाग्याचे दान मागण्यासाठी वडाची हळदकुंकू, अक्षता, नैवेद्य वाहून मनोभावे पूजा करतात. वडाच्या झाडाला सुती दोरा गुंडाळून सात प्रदक्षिणा घालतात आणि सात जन्म हाच पती मिळावा म्हणून श्रद्धापूर्वक उपासना करतात. तसेच पतीला चांगले आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे म्हणून कामना करतात.
मुळात निसर्गतःच दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूनेच वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी. म्हणूनच वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हाही पूजेचा एक हेतू असू शकतो. हे व्रत म्हणजे निसर्गाचे संवर्धन करणे हा उद्देश ठेवून केले जाते. आपल्या संस्कृतीने सगळ्या गोष्टींना महत्त्व दिलेले आहे. झाडाची पूजा, मातीची पूजा, नदीची पूजा, गायीची पूजा… अशा वेगवेगळ्या गोष्टींचे महत्त्व पटवून देणारी ही व्रत-वैकल्ये आहेत. वटपौर्णिमेच्या काळात बायका एकमेकींना भेटतात. छान पावसाळी हवामान असते. फणस-आंबे यांची रेलचेल असते. फळांचे द्रोण भरून एकमेकींना दिले जातात. अशा व्रत-वैकल्यातून आपण एकमेकींना जोडले जातो. एकत्र येतो. त्यामुळे समाजात एकोप्याचा संदेश जातो. व्रतांकडे उत्साहाने, आनंदाने पाहिले पाहिजे. प्रत्येकातून काही निष्पन्न होतेच असे नाही. काही भोळ्या समजुती आपल्याला खूप मोठी शिकवण देऊन जातात. उपास आणि व्रताचे सामर्थ्य हेच, म्हणून आपण उत्साह दाखवायचा असतो. त्यातला आनंद घ्यायचा असतो. तेव्हाच जगण्याला एक निराळा रंग प्राप्त होतो. आपण आपल्या नवऱ्याला भरपूर आयुष्य मिळावे, चांगले आरोग्य मिळावे म्हणून केलेले हे व्रत म्हणूनच आनंददायी असते.

बहरून आलं मन
वटपौर्णिमेचा सण
सण वर्षाचा आनंदाचा
वटसावित्री पुनवेचा…
सुखी ठेव धनी माझा
देवा मान कुंकवाचा…
परंपरेने जपलेला, स्त्रियांना आनंद देणारा, पतीसाठी त्याच्या आयुष्याचं दान मागणाऱ्या स्त्रियांना पावसाच्या रिमझिमीत नटण्याची संधी देणारा, पाऊस-पाण्यातला, आंब्या-फणसातला, फुला-पानांतला, वर्षानुवर्षे ‘व्रत’ रूपाने सजणारा हा सण बायकांना सांगतो, तुम्ही वटपौर्णिमेची वाट पाहत राहा…
वर्षामागून वर्षाची
वाट पाहते पुनवेची
हाती आरती सजली गं
परंपरा ही पुनवेची

वटवृक्षाची पूजा
वटवृक्ष हा शिवरूपी आहे. शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे म्हणजे वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एकप्रकारे स्मरून, त्याचे आयुष्य वाढून त्याची आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी, यासाठी ईश्वराची पूजा करणे होय. कर्माला शिवाची जोड असेल, तर शक्ती व शिव यांच्या संयुक्त क्रियेने व्यवहारातील कर्म साधना बनून त्याचा जिवाला फायदा होतो असे मानले जाते.

सूत का गुंडाळले जाते?
वटवृक्षाच्या खोडाच्या उभ्या छेदावर असणाऱ्या सुप्त लहरी शिवतत्त्व आकृष्ट करून वायुमंडलात प्रक्षेपित करतात. ज्यावेळी वटवृक्षाच्या खोडाला सुती धाग्याने गुंडाळले जाते, त्यावेळी जिवाच्या भावाप्रमाणे खोडातील शिवतत्त्वाशी संबंधित लहरी कार्यरत होऊन आकार धारण करतात. सुती धाग्यातील पृथ्वी व आप या तत्त्वांच्या संयोगामुळे या लहरी जिवाला ग्रहण करण्यास सुलभ होतात, असे शास्त्रीय कारण सांगितले जाते.

फळे का अर्पण करतात?
फळे ही मधुररसाची असल्याने फळांच्या समुच्चयाकडे आकृष्ट व प्रक्षेपित होणाऱ्या देवतांच्या लहरी कमी कालावधीत जिवाच्या देहातील कोशापर्यंत झिरपतात, हे फळे अर्पण करण्यामागील कारण आहे.