वाटणी

0
169
  • संदीप पां. केळकर

आपल्या शहरातल्या नोकर्‍या सोडून हे भाऊ इथे येऊन राहतील? मिळालेली वाटणी परस्पर कुणाला विकून तर नाही टाकणार ना? एखादा परप्रांतीय माणूस येथे येऊन घरसुद्धा थाटेल. तो कसा असेल? प्रश्‍नांची प्रचंड मालिका रमाकाकूंसमोर उभी राहिली.

गणेशचतुर्थीला विसूकाकांचे सारे भाऊबंद आले होते. दारासमोर फोर व्हिलर उभ्या होत्या. विसूकाकांचे भाऊ, त्यांची सारी कुटुंबीय मंडळी घरी जमली होती. वर्षातून एकदा सारी माणसे अशीच मूळघरी एकत्र यायची. आज विसूकाका खूप आनंदात होते. भाऊ-भावजया, त्यांची मुलं या सार्‍या गोतावळ्यात पुढे पाच दिवस मजेत जाणार होते.
दुपारच्या जेवणावळी आटोपून बरीच जणं विश्रांती घेत कुठेकुठे पहुडली होती. सार्‍या बालगोपाल मंडळींनी एकत्र जमल्याने घरात नुसता धुडगूस मांडला होता.
विसूकाकांचे तीन भाऊ शहरात कुठेकुठे नोकरीला होते. चतुर्थीला येताना ते काय काय सामान घेऊन यायचे. मखराचे सामान, इलेक्ट्रीक माळा, फटाके… सारे जमा व्हायचे.
संध्याकाळचे चहापान झाले आणि सारी मंडळी डेकोरेशन करायच्या तयारीला लागली. विसूकाका आरामखुर्चीत बसून सर्वांना वेगवेगळ्या सूचना देत होते. कृष्णा गड्याने माटोळीला बांधण्यासाठी नारळाची अख्खी पेंड आणि बेड्यांचे शिपटे आणून पडवीत ठेवून दिले. अन् तो पुन्हा माटोळीसाठी राखून ठेवलेला केळीचा घड आणण्यासाठी कुळागरात निघून गेला. हे सारे तो आपलेपणाने करीत असे. गेली कित्येक वर्षे विसूकाकांकडे तो वावरत होता… अगदी घरच्यासारखा!
विसूकाकांचे दोन भाऊ पडवीत बसले होते. विसूकाकांच्या मागल्या भावाने- प्रभाकरने- विषय सुरू केला.

‘‘यंदा सुपारीचा दर वाढलाय ना दादा?’’
‘‘होय, यंदाच कित्येक वर्षांनी सुपारीला थोडी तेजी आलीय!’’
जवळच प्रभाकरचा मुलगा राघव बसला होता. ‘‘वाढलाय म्हणजे किती?’’ त्याने विचारायला सुरुवात केली.
‘‘अडीचशे झालाय ना दादा?’’ प्रभाकरने मध्येच तोंड घातले.
‘‘एका झाडाला किती सुपारी लागते?’’- राघव.
विसूकाका तसा साधा माणूस. त्याचे आत एक बाहेर एक असे नव्हते. ‘‘तशी एका झाडाला दोन ते तीन किलो लागते. काही झाडांना अर्धा किलोसुद्धा, तर काही झाडं अशी आहेत की त्यांना शिपटच धरत नाही.’’ त्यांनी अगदी सत्य परिस्थिती सांगितली.
‘‘आमची किती झाडं आहेत?’’- राघव.
‘‘आहेत हजारभर!’’
राघव त्या झाडांचा आणि सुपारीचा हिशेब करण्यात गर्क झाला. गेल्या तीस-चाळीस वर्षांत असे प्रश्‍न विसूकाकांनी कधी ऐकले नव्हते. त्यांना आज काहीतरी वेगळंच जाणवत होतं. आता दुसरा भाऊ मोरेश्‍वर काय बोलतो याकडे विसूकाकांचे लक्ष लागले होते. पण तो काही बोलला नाही.
कित्येक वर्षांनी सुपारीच्या झाडांची, सुपारीच्या भावाची भाऊ चौकशी करू लागले होते.
तेवढ्यात गडी कृष्णा आंब्याचे टाळे घेऊन आला.
‘‘माटोळी बांधूया मरे काका?’’
‘‘हय तर बेगींच सुरू करूया!’’
दरवर्षी काकांची माटोळी बांधून, गणपती बसवूनच तो घरी जायचा. कित्येक वर्षांपासूनचा त्याचा तो नेम होता.

हळूहळू सगळी मंडळी मखर सजावटीला, माटोळी बांधावळीला जुंपली.
विसूकाकांची बेचैनी वाढत होती. काहीतरी व्हायचं आहे असंच त्यांना वाटत होतं. त्यांचा चतुर्थीचा उत्साह केव्हाच मावळला होता.
विसूकाकांना दोन मुलं. मुलगी लग्न होऊन सासरी नांदत होती. मुलाचं लग्न झालं होतं, त्याला एक मुलगा होता.
विसूकाकांचा मुलगा नचिकेत घरचं बघायचा. कुळागराचा व्याप सांभाळायचा. चार गुरं होती, त्यांची देखभाल करायचा. हल्ली गडी माणसं मिळत नाहीत. त्यात वाढती मजुरी. त्यामुळे हिशेबांचा ताळतंत्र जुळत नव्हता. गावात थोडं पौरोहित्य होतं, तेही तो करायचा.
दरवर्षी आदल्या दिवशी सगळे भाऊ हजर व्हायचे. आज मात्र पहिल्यांदाच धाकटा भाऊ उदय आला नव्हता. तो न आल्यामुळे विसूकाका अधिकच बेचैन झाले होते. पण आपली बेचैनी कुणाला जाणवू देत नव्हते.
‘‘माटोळी बांधून झाली की दोघे गणपती आणायला चला कृष्णाला घेऊन,’’ विसूकाकांनी आठवण करून दिली.
प्रत्येकजण कामात मग्न होता.
‘‘माटोळीला प्लास्टिक सुतळी बांधायची नाही. केवणीचे दोर आणले आहेत कृष्णाने, ते बांधा,’’ मोरेश्‍वराने मुलांना सूचना केली. ‘‘थर्माकोलचा वापर कमी करा, त्याबदली पुठ्ठे वापरा.’’ प्रभाकरने पर्यावरणावर बौद्धिक सुरू केलं.
‘‘आदी केंसला थर्माकोल. आदी आमी पड्डे, फोली लावीत सलो. कागदाचीं फुलां करीत सलों. फुगे करीत सलो.’’ विसूकाकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. सगळे भाऊ एकत्र आले की बोलीभाषेत संवाद सुरू व्हायचे.
विसूकाका मघाच्या सुपारीच्या विषयातून काहीसे बाहेर आले. उत्सव आनंदात पार पडावा असेच त्यांना वाटत होते.

रात्री आपल्या शयनकक्षात विसूकाका निवांतपणे बसले होते. रोजच्या सवयीप्रमाणे गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचं पुस्तक त्यांनी उघडलं. डोळे मिटून पान उघडायचं आणि जे पान येईल ते वाचायचं असा त्यांचा शिरस्ता होता. ‘राम ठेवील त्यात समाधान मानावे,’ त्यांनी शीर्षक वाचले आणि त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, ‘‘बरोबर आहे!’’ रमाकाकू हळूच येऊन शेजारी बसल्या. दिवसभराच्या कामाच्या शिणाने त्या दमल्या होत्या. मदतीला आज जावा असल्या तरी त्यांचं काही कामात लक्ष नव्हतं. एकांतात त्यांची काही कुजबूज चालली होती. त्यांच्या बोलण्या-चालण्यातला वेगळेपणा त्यांच्या सहज लक्षात आला होता.
‘‘एकटेच काय बोलत होता तुम्ही?’’
‘‘कुठं काय?’’
‘‘बरोबर आहे, बरोबर आहे असं काहीतरी म्हणत होता एकटेच.’’
‘‘काही नाही गं, रोजच्यासारखं पान उघडलं आणि वाचत बसलो झालं.’’
‘‘एरव्ही तुम्ही सगळी माणसं जमली की किती आनंदात असता… तुमच्या मनात काहीतरी घोळत आहे. मला नाही सांगणार?’’
‘‘तुला नाही सांगणार तर कुणाला सांगू. भावांच्या मनात काहीतरी घोळत आहे. जमिनीच्या वाटणीचा विषय त्यांच्या मनात आहे. ते उघड नाही सांगणार, पण पुढं-मागं ती करावीच लागणार. त्यापेक्षा आपण होऊनच जमिनीच्या वाटणीचा विषय मोकळा करावा असं मला वाटतं. धाकटा उदय तर आज आलाच नाही. तो तर रजा काढून आधीच दोन दिवस यायचा.’’
रमाकाकू बराच वेळ गप्प होत्या. दीर-जावांच्या वागणुकीतला बदल त्यांनाही जाणवला होता.
‘‘माझ्याही लक्षात आलंय सगळं, पण जरा विचार करून काय ते करा. एक मात्र करा, आपलं नुकसान तरी करून घेऊ नका. तुम्ही पडलात मोठे सांब. हे सारं तुम्ही उभं केलंय. माड्या लावण्यापासून ते शिंपण्यापर्यंत. तुम्ही मनायांबरोबर राबायचा. या भावांची शिक्षणं वगैरे तुम्हीच केलीत ना?’’
‘‘आणि तू काय कमी खस्ता खाल्ल्या आहेत माझ्याबरोबर. पहाटे उठून कल्ल घेऊन तू यायचीस माझ्याबरोबर. एकदा तर मिणमिणता कंदील घेऊन आम्ही पहाटे शिंपत होतो कुळागरात; आणि वार्‍यानं कंदील विझला. तू भ्यालीस आणि मला घट्ट बिलगलीस. आठवतं…?’’
‘‘ते बरं आहे लक्षात तुमच्या!’’
‘‘तुला खरं सांगू रमा, सुपारीला दर आला आहे म्हणून हा विषय सुरू झाला आहे.’’
‘‘तुम्हाला माहीत आहे का? एकावेळी सुपारीचा दर एकदम खाली आला होता. फक्त पंचेचाळीस रुपये किलो इतका खाली आला होता. किती हाल झाले आपले. तेव्हा या तुमच्या भावांनी विचारपूस नाही केली तुमची. करून टाका वाटण्या, कळू दे त्यांना इथलं सुख-दुःख!’’ रमाकाकू वैतागून बोलत होत्या.
‘‘शांत हो रमा. जी गोष्ट कधीतरी होणारच आहे ती आताच करून टाकलेली बरी.’’
‘‘त्यांची मुलं नोकरी-उद्योगात आहेत. आमच्या मुलाला आम्ही उगीच यात गुंतवून ठेवलं. काय मिळवलं शेवटी…?’’
‘‘रमा, तू उगीच निराश होऊ नकोस. आमचा नाचिकेत तसा काही लेचापेचा नाही. काहीतरी धंदा-उद्योग करील. शिवाय आम्हाला म्हणून वाटणी मिळणारच आहे. एकदा वाटण्या झाल्या की बिनधास्तपणे काही काम करता येईल.’’
‘‘तेही खरंच म्हणा. तुमचे पुढे भांडणतंटे होण्यापेक्षा आज सुखाने सारे झालेले बरे.’’
गेली चाळीस वर्षे त्या विसूकाकांना साथ देत होत्या. अत्यंत खडतर मेहनतीनं इथले हे सारे कुळागर, घरदार त्या उभयतांनी उभे केले होते. दारिद्य्राचे दशावतार भोगले होते. अनेक स्थित्यंतरे अनुभवली होती. खूप वर्षांनंतर आज थोडे सुखाचे दिवस आले होते, पण आज हे वाटणीचं संकट उभं ठाकलं होतं.
वाटणीचा विषय उभयतांच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. वाटणी… आपण निर्माण केलेल्या, आपल्या हातांनी लावलेल्या झाडांची वाटणी. प्रत्येक झाडागणिक साठलेल्या अनेक आठवणी; अन् त्यांची ही वाटणी की ताटातूट?
ही आपण लावलेली झाडं, पोफळी, माड, केळी… काही म्हणून कमी नाही. आंबे, फणस, अननस, लिंबू, सीताफळं, रामफळं हौसेने कुठून कुठून आणून लावली. माहेरहून आणलेला नागचाफा… एकदा फुलू लागला की सारा आसमंत सुगंधित होतो. या झाडांना फक्त बोलता येत नाही. ही झाडं पुढे दुसर्‍याची होणार. आमच्या वाट्याला कुठली झाडं येणार माहीत नाही. स्वकष्टाने निर्माण केलेली वसाहत… त्यांच्या पुढे वाटण्या होणार. पुढे येऊ घातलेल्या संकटाने त्या बेचैन झाल्या होत्या.

विसूकाका बोलत नव्हते, पण मनात त्यांच्या प्रचंड खळबळ माजली होती. भरभक्कम पगार असलेले त्यांचे भाऊ शहरात ऐषआरामात जगत होते; ते घरच्या कुळागराच्या उत्पन्नाची अपेक्षा करतील असं त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं.
आपल्या शहरातल्या नोकर्‍या सोडून हे भाऊ इथे येऊन राहतील? मिळालेली वाटणी परस्पर कुणाला विकून तर नाही टाकणार ना? एखादा परप्रांतीय माणूस येथे येऊन घरसुद्धा थाटेल. तो कसा असेल? प्रश्‍नांची प्रचंड मालिका रमाकाकूंसमोर उभी राहिली. आणि विसूकाका…? वरून शांत वाटत असले तरी आतून खूप व्यथित झाले होते.

‘‘आता झोपा शांत…’’
‘‘आणि तूही झोप ना आता. सकाळी उठून गणपतीच्या पूजेची तयारी करायला हवी.’’
…सकाळी पूजेला बसण्यासाठी विसूकाकांची गडबड चालली होती. आंघोळ करून, सोवळं नेसून ते कधीचे तयार होते. आता पुरोहित आले की पूजेला सुरुवात होणार होती, एवढ्यात फोन वाजला. फोन बहुधा पुरोहितांचाच असावा असं विसूकाकांना वाटलं. पण फोन धाकट्या भावाचा- उदयचा- होता.
‘‘अरे सांग उदय, येत आहेस ना आता? पूजेला सुरुवात व्हायची आहे, ये लवकर.’’
‘‘इथे एक वेगळाच प्रॉब्लेम आलाय दादा.’’
‘‘अरे बरी आहेत ना सगळी?’’
‘‘बरी आहेत सगळी, पण आमच्या दारात कुणीतरी गणपती आणून ठेवलाय. काय करू?’’
‘‘आता लाव पूजेला. पण स्पष्ट बोलतो म्हणून राग धरू नकोस. काल तू का नाही आलास? तुझं काहीतरी ठरलेलं होतं असं मी नाही म्हणत, पण लोक म्हणणारच ना!’’
सर्वांनीच विसूकाकांना प्रश्‍न केला, ‘‘उदय येतोय ना?’’
‘‘उदय येणार नाही. त्याच्याकडे गणपती आलाय. आता आमच्या गणपतीची पण वाटणी झाली,’’ विसूकाका खिन्नपणे म्हणाले.

पुरोहित आले, पूजा झाली. पण त्या पूजेत विसूकाकांचे लक्ष नव्हते. एरव्ही सगळ्या आरत्या, देवे मंत्रपुष्प यथासांग व्हायचं. पूजा कशीतरी आटोपली गेली. सारं यंत्रवत चाललं होतं. पंचखाद्य नेवर्‍या वाटल्या गेल्या. मुलं आपापल्या विषयात गर्क झाली. कुणी फटाके, चंद्रज्योती, भूईचक्र पेटवण्याचा सपाटा लावला, काहींनी मोबाईलमध्ये तोंड खुपसलं.
विसूकाका आरामखुर्चीत विसावले होते. चतुर्थीचा उत्साह मावळला होता.
रमाकाकूंनी त्यांचं मन केव्हाच ओळखलं होतं.
गरम गरम चहाचा कप त्यांनी आणून विसूकाकांच्या हाती दिला. विसूकाकांनी निमूटपणे तो हातात घेतला. काही रमाकाकू तिथेच रेंगाळल्या.
‘‘चला, आम्ही खाली कुळागरात फिरून येऊया गं,’’ दोन जावांचा संवाद रमाकाकूंच्या कानावर पडला. कुळागरात कधी चुकूनसुद्धा पाऊल न ठेवणार्‍या जावा आज कुळागरात फिरायला बाहेर पडल्याहेत हे त्यांच्या सहज लक्षात आले. विसूकाकांच्याही नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. विसूकाकांनी मनोमन ठरवूनच टाकलं, आता मात्र हा वाटणीचा विषय मार्गी लावायचा.
आरामखुर्चीत ते चहा पीत बसले होते. जवळच वर्तमानपत्र पडलं होतं. पेपर कालचा होता. काल तो वाचायला त्यांना वेळच मिळाला नव्हता. पेपर चाळता चाळता त्यांचं लक्ष त्या कवितेकडं गेलं. साहित्यिक सदरातल्या त्या कवितेनं त्यांचं लक्ष वेधून घेतलं. कवितेचं नाव होतं- वाटणी. कविता ते लक्ष देऊन वाचू लागले. आपलीच व्यथा कुणीतरी मांडली आहे असेच त्याना वाटले.
शिक्षणाने झाली ओसाड ती गावे
कुणीही न ठावे पुढे काय….
किती विचित्र योगायोग. ही कविता आजच छापून आली होती. अशी जिवंत वास्तव असलेली कथा प्रथमच वाचल होतो. आता वाटणी हा एकच विषय त्यांच्यापुढे होता.