वाटचाल- स्त्री सबलीकरणाची, स्त्री सक्षमीकरणाची

0
2024

– अनुराधा गानू

सकाळी सकाळी वर्तमानपत्र उघडा, एक तरी बातमी निश्‍चितपणे वाचायला मिळेल- बलात्कार, अत्याचार, हुंडाबळी. मग असा प्रश्‍न पडतो की, २१ व्या शतकात कित्येक क्षेत्रांमध्ये महिलांनी भरारी मारलेली आहे, अशा या समाजात अशा घटना राजरोसपणे कशा घडू शकतात? मग वाटतं, या शतकातसुद्धा महिला खरेच सक्षम आहेत? सशक्त आहेत? आमची नारीशक्ती कुठे दिसतेय? याचं उत्तर खेदानं ‘नाही’ असंच द्यावं लागेल. म्हणजे या पुरोगामी समाजात खर्‍या अर्थाने स्त्री सशक्त किंवा सक्षम झालेलीच नाहीय.आता सक्षम होणं किंवा स्त्री-सशक्तीकरण होणं म्हणजे नक्की काय हा एक प्रश्‍नच आहे. याचा विचार अनेक पैलूंनी करावा लागेल. कारण ‘स्त्री-सशक्तीकरण’ या शब्दाची व्याप्तीच खूप मोठी आहे. स्त्रीचं शारीरिक आणि शैक्षणिक सबलीकरण, आर्थिक सबलीकरण, वैचारिक सशक्तीकरण आणि सामाजिक सशक्तीकरण या सगळ्या पैलूंनी स्त्री जेव्हा सशक्त होते आणि त्याचा उपयोग सकारात्मक दृष्टीने समाजासाठी केला जातो तेव्हाच खर्‍या अर्थाने स्त्रीचं सशक्तीकरण, सक्षमीकरण झालं असं म्हणता येईल. आता थोडंसं जुन्या काळाकडं वळून बघूया आणि स्त्रीशक्तीच्या एकेक पैलूचा विचार करूया.
अगदी जुन्या काळात स्त्री म्हणजे एक उपभोग्य वस्तू आणि मुलं निर्माण करण्याचं एक यंत्र एवढीच तिची किंमत होती. चूल, मूल आणि उंबठ्याच्या आत पाऊल एवढीच तिची मर्यादा होती. नवर्‍याला साथ देणं, वारंवार येणारी बाळंतपणं झेलणं आणि मुलांच्या खस्ता खाणं एवढंच तिचं नित्यकर्म होतं. ती स्त्री शारीरिकदृष्ट्या सक्षम होणे शक्यच नव्हते. शैक्षणिक म्हणाल तर मुलींना दुसर्‍या, तिसर्‍या इयत्तेतूनच शाळेतून काढलं जायचं म्हणजे पुढे तिला आर्थिक व्यवहार कळायला नकोत. फक्त सही करता आली की झालं. म्हणजे शैक्षणिकदृष्ट्याही स्त्री सक्षम नव्हती आणि पर्यायाने आर्थिक बाबतीतसुद्धा ती सशक्त किंवा सक्षम नव्हती. एवढ्या सगळ्यामधून समाजात काय चाललंय हे बघायला तिला वेळच नव्हता. म्हणजेच स्त्रीचं सबलीकरण त्या काळाला मान्यच नव्हतं. स्त्रीवर जबरदस्ती करणं हे सहज शक्य होतं.
हळूहळू काळ बदलू लागला. महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, महादेव गोविंद रानडे, अण्णासाहेब कर्वे या सर्वांनी घरचा प्रखर विरोध पत्करून, प्रसंगी शेणा-दगडाचा मारा सोसून, समाजातल्या कर्मठ व प्रतिष्ठित म्हणवणार्‍यांच्या कुचेष्टा सहन करून स्त्रीला सक्षम बनवण्याचा चंगच बांधला. त्यासाठी महिलांना शिक्षण देण्याची गरज होती. त्यांना स्वावलंबी करण्याची गरज होती. निराधार स्त्रियांना, ज्यांना समाज आपल्यामध्ये मिसळू देत नव्हता त्यांना, आधार देण्याची गरज होती. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री-शिक्षणाची सुरुवात केली. निराधार आणि विधवा महिलांना आधार दिला. स्वतःच्या घरात त्यांना आश्रय देऊन सुरक्षित केले. महादेव गोविंद रानडे व त्यांंच्या पत्नी रमाबाई रानडे यांनी पुण्यात हुजूरपागा, सेवासदन अशा शाळा फक्त मुलींसाठी सुरू करून महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल उचलले. त्याच्याही पुढे जाऊन अण्णासाहेब कर्वे यांनी पुनर्विवाहाची मुहूर्तमेढ रोवली व स्वतः एका विधवेशी विवाह करून लोकांपुढे एक उदाहरण घालून दिले. महिलांच्या शिक्षणासाठी हिंगणे स्त्री शिक्षण संस्था काढली. राजा राममोहन रॉय यांनी सतीची चाल बंद केली. परदेशात जाऊन डॉक्टरकीचं शिक्षण पूर्ण करून भारतातील पहिली डॉक्टर होण्याचा मान मिळवला डॉ. आनंदीबाई जोशी यांनी.
आज जी सक्षम महिला दिसते आहे ती या सगळ्यांनी केलेल्या अथक परिश्रमाचा परिपाक आहे. आज स्त्री सुशिक्षित आहे, स्वतःच्या पायावर उभी आहे. अर्थात शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्याही ती सक्षम आहे. पण त्याचबरोबर वैचारिकदृष्ट्याही ती सशक्त असायला हवी. नुसतं पुस्तकी शिक्षण घेऊन, पदवी मिळवून किंवा गलेलठ्ठ पगार मिळवला म्हणजे स्त्री सक्षम झाली किंवा सबल झाली असे नाही; त्याला विचारांची, संस्कारांची जोड असणे तितकेच गरजेचे आहे. नाहीतर मग वास्को शहरात नुकत्याच घडलेल्या घटनेसारख्या घटना घडतच राहतील. एका सुशिक्षित स्त्रीने आपल्याच घरातील सासू व जावेचा खून केला. एका लहानग्या जिवाला निराधार केलं. काही वर्षांपूर्वी अशाच दोन घटना घडल्या होत्या. लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवरी मुलगी आपल्या प्रियकराबरोबर पळून गेली. आणखी एका घटनेत असंच घडलं. साखरपुडा झाला, दोन सह्या घेऊन लग्न रजिस्टरही झालं आणि नंतर मुलीने लग्नाला नकार दिला. लग्न त्या मुलाशी करायचं नव्हतं तर आधीची नाटकं तरी का केली? आता या मुली सुशिक्षित होत्या, सबला होत्या, सशक्त होत्या. मग आता या सशक्तीकरणाला नकारात्मक सशक्तीकरण असंच म्हणावं लागेल. मग त्याचा उपयोग काय? म्हणून वैचारिक सशक्तीकरण, सक्षमीकरण होणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
आजची स्त्री सक्षम आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वावरते आहे. पण या सक्षमीकरणाचा अर्थ असा नाही की तिने पुरुषांवर कुरघोडी करावी. त्यांना कमी लेखावे. त्यांच्या विरोधात जावे. कारण पुरुष आणि स्त्री एकाच रथाची दोन चाकं आहेत आणि ती दोन्ही सारखीच सक्षम असायला हवीत तरच संसाराचा आणि पर्यायाने समाजाचा रथ व्यवस्थित चालू शकेल. स्त्रीचं जर सक्षमीकरण किंवा सबलीकरण करायचं असेल तर प्रथम स्त्रीमधील निद्रिस्त असलेल्या आत्मविश्‍वासाला जागं करण्याची गरज आहे. मग भलेही ती स्त्री सुशिक्षित नसेल, कदाचित शिक्षितसुद्धा नसेल; पण तिच्यामधल्या ताकदीची तिला जाणीव असणे महत्त्वाचे आहे. यावरून मला आठवले, एकदा मी व माझी मैत्रीण रात्रीच्या बसने गोव्यात येत होतो. बस गच्च भरलेली. बाहेर काळाकुट्ट अंधार. रस्ता घाटातला. अशावेळी एक गाडी हॉर्न वाजवत बसच्या मागून येत होती. बसड्रायव्हर तिला बाजू देऊ शकत नव्हता. मग ती गाडी तशीच जोरात पुढे येऊन बसच्या पुढे थांबली. आतून तीनचार लोक उतरले. ड्रायव्हरच्या बाजूने त्याला बाहेर खेचण्यासाठी गेले. इतक्यात बसमधीलच एक बाई पुढे आली. कोणाला काही कळायच्या आत ड्रायव्हरला तिने झटकन ओढून कुठे लपवले कोण जाणे! थोडा वेळ ते लोक तिथेच थांबले, पण त्या बाईने कसलीही दाद लागू दिली नाही. मग जवळ जवळ अर्ध्या-पाऊण तासाने आमची बस सुटली. त्या बाईने ड्रायव्हरला वाचवले होते. एवढ्या भरगच्च भरलेल्या बसमधल्या कोणीही जे धाडस दाखवले नाही ते एका खेडवळ भाजीवालीने दाखवले होते. आणि जणू काही तिने दाखवून दिले की ‘कोमल है, कमजोर नहीं हम| शक्ती का नाम नारी है!’ असंच काही वर्षांपूर्वी कर्नाटकातल्या एका गावात त्या गावातल्या महिलांनी एकजूट केली आणि गावातल्या दारूभट्या बंद करायला लावल्या. या बायका शिक्षित नव्हत्या, पण त्या सशक्त होत्या आणि त्यांच्यात एकजूट होती. पण अशा घटनांचं प्रमाण अगदी नगण्य आहे.
इतिहासाकडे मागे वळून बघितलं तर लक्षात येईल की आपल्या मातीत अशा कितीतरी स्त्रिया होऊन गेल्या की त्या अबला नव्हत्या, सशक्त होत्या आणि पुरोगामी विचारांच्या होत्या. शिवाजी महाराजांची आई जिजाबाई, अहिल्याबाई होळकर, झांशीची राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई, रमाबाई रानडे, डॉ. आनंदीबाई जोशी अशी कितीतरी नावे आपल्याला घेता येतील की ज्यांनी स्त्रीला एका उंचीवर नेऊन ठेवले.
पुन्हा पुरुषप्रधान संस्कृतीची बीजं घट्ट रुजली. स्त्रीने स्वतःला गौण, दुय्यम मानण्यामध्येच समाधान मानले. त्यांच्यातला आत्मविश्‍वास हळूहळू संपुष्टात आला. पुुरुषांच्या अत्याचाराला स्त्रिया पुन्हा बळी पडू लागल्या. आपल्या इतिहासाच्या पुस्तकांतील ‘ती’ इतिहासाची पाने कोणीतरी फाडून टाकली होती. स्त्रियांची वैचारिकताही संपली, आणि मग एका नव्या पण नकारात्मक सशक्तीकरणाचे पर्व सुरू झाले. सासू-सुनांची, जावा-जावांची भांडणे तर आजच्या समाजातही आपल्याला दिसतात. टीव्हीवरच्या मालिकांमध्ये तर कहरच केला जातो. स्त्रियाच स्त्रियांच्या वैरी होऊ लागल्या. आता स्त्रिया सुशिक्षित आहेत, स्वावलंबी आहेत, पण पुन्हा तेच. वैचारिक आणि संस्कारित बैठक त्यांच्यापाशी नाही. मग अशा स्त्रिया दुबळ्या, अशिक्षित स्त्रियांना सक्षमतेच्या वाटेकडे नेऊ शकतील?
काही वर्षांपूर्वी मी स्वतः एक व्यवसाय सुरू केला होता. बरेचसे खाद्यपदार्थ तयार करून त्यांची विक्री करण्याचा. त्यावेळी आम्ही माईन्स साईटवर राहत होतो. या कामासाठी मी आमच्याच कामगारांच्या अत्यंत गरजू आणि साध्यासुध्या पाच बायकांची निवड केली. रोज दुपारच्या रिकाम्या वेळात त्या माझ्याकडे येत व पदार्थ बनवत. त्यांच्या कामाचा मोबदला मी त्यांना देत असे. हेतू एवढाच की त्या खेड्यातील बायका स्वावलंबी व्हाव्यात. मीही काही करू शकते आणि माझ्या संसाराला हातभार लावू शकते हा आत्मविश्‍वास त्यांच्यात जागा व्हावा. मी पण एक सक्षम महिला आहे हा विश्‍वास त्यांना वाटावा. ते पदार्थ तर मी त्यांना शिकवलेच, पण अनेक गोष्टींची जाणीव त्यांना करून दिली. त्यांच्यामधील असलेले सुप्त गुण जागे केले. आपल्यावर झालेला अत्याचार सहन नाही करायचा, त्याचा प्रतिकार करायचा. कारण अत्याचार करणारा आणि सोसणारा दोघेही सारखेच दोषी असतात हे त्यांच्या लक्षात आणून दिले. हे सगळे मी त्यांना उपदेश म्हणून नाही सांगितले तर काम करता करता गप्पागोष्टी करत बोलण्याच्या ओघात मी त्यांना सांगत असे. याचा त्यांच्यावर खरेच खूप चांगला परिणाम झाला. मी त्यांना समजावलेले त्या इतर बायकांना समजावून सांगू लागल्या. काही दिवसांनी त्यातल्या एकीने मला येऊन सांगितले, ‘‘वहिनी, आता बारीकसारीक खर्चासाठी मला माझ्या नवर्‍याकडे पैसे नाही मागावे लागत. माझ्या स्वतःच्या कमाईमधून मी खर्च करू शकते, याचा मला खूप आनंद आहे. आता माझ्या घरच्यांनाही माझा अभिमान वाटतो. वहिनी, हे सगळं तुझ्यामुळं झालंय!’’ हे सांगताना तिच्या डोळ्यांत आलेले अश्रू बरेच काही सांगून गेले मला. मी तिला म्हटले, ‘‘अगं, माझ्यामुळे काहीच झालं नाही. तुम्ही सगळ्या सक्षम आहातच. त्याची जाणीव फक्त मी तुम्हाला करून दिली इतकंच.’’ थोड्या दिवसांनी माझ्याकडेच काम करणारी दुसरी बाई आली. म्हणाली, ‘‘वहिनी, एकदा माझ्या नवर्‍याने मला मारण्यासाठी हात उगारला. त्याचा उगारलेला हात मी वरच्यावर घट्ट पकडला आणि हिसडून टाकला जोरात. आता पुन्हा नाही मारणार मला कधी. का म्हणून मार खायचा मी उगीचच? बरोबर केलं ना वहिनी मी? हां, पण माझ्यात एवढं बळ कुठून आलं याचं मात्र त्याला आश्‍चर्य वाटलं.’’ मला खरंच त्या बायकांचं कौतुक वाटलं. स्त्री सशक्तीकरणासाठी मी टाकलेलं हे पाऊल नक्कीच यशस्वी होईल असं मला मनापासून वाटलं. (मनातून थोडी धाकधूक वाटली की गावातले पुरुष एकत्र येऊन मला घेराव तर घालणार नाहीत ना? पण तसं काही झालं नाही. नशीब.)
मला तर वाटते, आपल्या महिलांचे खरोखरच सशक्तीकरण, सक्षमीकरण, सबलीकरण करायचे असेल तर त्यांना शिक्षण दिले पाहिजे. त्यांच्यामध्ये एकजूट निर्माण केली पाहिजे. आर्थिकदृष्ट्या त्यांना स्वावलंबी करण्याची खरेच गरज आहे. श्रद्धा-अंधश्रद्धा यांतील फरक त्यांना समजावायला हवा. वर्णभेद, जातीभेद मिटवायला हवेत. नुसताच ८ मार्च हा महिलादिन साजरा न करता आम्ही महिलांनीच महिलांना स्वतःमधली शक्ती जागृत करायला शिकवलं पाहिजे. त्यांच्यातील गुप्त गुणांची ओळख त्यांना करून दिली पाहिजे. त्यांच्यात आत्मविश्‍वास निर्माण केला पाहिजे, तरच नारीशक्ती नारीच्या मागे भक्कमपणे उभी राहील आणि अत्याचाराला, येणार्‍या प्रत्येक संकटाला स्त्रिया समर्थपणे तोंड देतील, प्रतिकार करतील आणि त्यात त्या यशस्वीही होतील. मुळूमुळू रडत नाही बसणार. आणि आपण म्हणजे समाजातील सर्वच घटकांनी असे प्रयत्न केले पाहिजेत. मी ‘आपण सगळ्यांनीच’ असं म्हटलं, कारण या कामासाठी पुरुषांचं सहकार्यही शंभर टक्के असायलाच हवं. कारण स्त्री सशक्त होणे, सक्षम होणे, म्हणजे पुरुषांशी वैर धरणे किंवा संघर्ष करणे नव्हे तर एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून समर्थपणे उभे राहणे.
असं जर झालं तर जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच नारी सक्षम होईल, सशक्त होईल. मग जगाच्या उद्धाराला वेळ लागणार नाही.