वाजपेयी, मदनमोहन मालवीय यांना भारतरत्न

0
131

देशातील सर्वोच्च नागरी सन्मान असलेला भारतरत्न पुरस्कार भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि स्वातंत्र्यसैनिक तसेच बनारस हिंदू विश्‍वविद्यालयाचे संस्थापक शिक्षणतज्ज्ञ पंडित मदनमोहन मालवीय (मरणोत्तर) यांना जाहीर करण्यात आला आहे. येत्या २६ जानेवारी रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत वाजपेयी व मालवीय यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्यानंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना हा निर्णय कळविण्यात आला. त्यानंतर ‘मालवीय व वाजपेयी यांना भारतरत्न जाहीर करताना मला आनंद होत आहे’ असे ट्विट राष्ट्रपतींच्या ट्विटर अकाउंटवरून करण्यात आले.
केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर मदनमोहन मालवीय यांना ‘भारतरत्न’ देण्याचे आश्‍वासन खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारादरम्यान दिले होते. त्यामुळे हे नाव निश्‍चित मानले जात होते. मालवीय यांच्यासोबत वाजपेयी यांनाही सर्वोच्च पुरस्काराने गौरविले जावे, अशी मागणी होत होती. बर्‍याच राजकीय पक्षांनीही वाजपेयी यांच्या नावाला पाठिंबा दिला होता. त्याची योग्य दखल मोदी सरकारने घेतली आहे.
वाजपेयी यांचा उद्या वाढदिवस असून ते वयाची नव्वदी पूर्ण करीत आहेत तर पंडित मदनमोहन मालवीय यांची उद्या १५३ वी जयंती आहे. त्याच्या पूर्वसंध्येला ही घोषणा करण्यात आली. भाजपच्या या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांचा आज साजरा होणारा वाढदिवस ‘सुशासन दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
वाजपेयी हे १९९८ ते २००४ या काळात पंतप्रधान होते. पण वयोमानपरत्वे ते सार्वजनिक जीवनातून निवृत्त झाले. राजकीय मुत्सद्दी म्हणूनही त्यांची ओळख आहे. वाजपेयी यांनी त्यांच्या काळात भारत-पाकिस्तान यांच्यातील मतभेद दूर करण्याचे प्रयत्न केले होते. कॉंग्रेस वगळता दुसर्‍या पक्षाचे सर्वात जास्त काळ सत्तेवर असलेले वाजपेयी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुखवटा आहेत, अशी टीका त्यांचे विरोधक करीत असत पण तरी त्यांच्याविषयी सर्वाच्याच मनात स्नेहभाव होता. मुरलीमनोहर जोशी यांच्यासह भाजपच्या अनेक खासदारांनी वाजपेयी यांना ’भारतरत्न’ देण्याची मागणी केली होती. शिवसेनेनेही त्यांना ’भारतरत्न’ देण्याची मागणी केली होती.
पंडित मदनमोहन मालवीय हे राजकीय, शिक्षण क्षेत्रात होते. १९०८ ते १९१८ या काळात ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. मालवीय यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोठा सहभाग होता व हिंदू राष्ट्रवादाचा त्यांनी पुरस्कार केला होता. हिंदू महासभेचेही ते नेते होते.
देशाचा या सर्वोच्च पुरस्काराने आत्तापर्यंत ४३ जणांना त्यांच्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले आहे. त्यात डॉ. बाबासेहब आंबेडकर, सी. राजगोपालचारी, सी. व्ही. रमण यांच्यासह दिग्गज व्यक्तींचा समावेश आहे. भारतरत्न देण्याची व्यवस्था २ जानेवारी, १९५४ रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी केली होती. त्यावेळी, केवळ जिवंत व्यक्तींनाच हा सर्वोच्च सन्मान दिला जात होता. परंतु, १९५५ पासून मरणोत्तर सन्मान देण्यास सुरूवात झाली होती.