>> कला-संस्कृतीमंत्र्यांची माहिती; तीन ठिकाणी नव्या तालुका वाचनालय इमारतींचा प्रस्ताव
राज्याचे वाचनालय धोरण ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस जाहीर केले जाणार आहे. फोंडा, वास्को, कुडचडे येथे नवीन तालुका वाचनालय इमारती उभारण्याचा प्रस्ताव आहे, असे कला-संस्कृती तथा क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी विधानसभेत कला, संस्कृती, क्रीडा, ग्रामीण विकास खात्याच्या अनुदानित पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना काल सांगितले.
राज्यात वाचन चळवळीला चालना देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. डॉ. नंदकुमार कामत यांच्या नेतृत्वाखालील समितीकडून राज्याचे वाचनालय धोरण तयार केले जात आहे. स्पर्धात्मक परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना आवश्यक साधनसुविधा उपलब्ध केल्या जात आहे, असेही गावडे यांनी सांगितले.
ग्रामीण विकास यंत्रणेच्या (आरडीए) अंतर्गत प्रत्येक मतदारसंघात किमान 2 प्रकल्प प्राधान्यक्रमाने मार्गी लावण्यात येणार आहेत, असे गावडे म्हणाले.
गोवा युवा आयोग स्थापणार
राज्यात गोवा युवा आयोगाची स्थापना करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्यातील क्रीडा संस्थाना अनुदान दिले जाते. काही संस्थाकडून अनुदान वापराबाबतचे प्रमाणपत्र वेळेवर सादर केले जात नाही. त्यामुळे पुढील अनुदान रखडते, असे गावडे यांनी सांगितले.
क्रिकेट स्टेडिअमबाबत चर्चा
राज्यातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअमबाबत जीसीएची चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाणार आहे. अपूर्णावस्थेतील क्रीडा प्रकल्पांची कामे प्राधान्यक्रमाने हाती घेण्यात येतील. गणेश चतुर्थीपूर्वी क्लबांचे अनुदान आणि बक्षीस विजेत्यांच्या रकमेचे वितरण केले जाणार आहे, असेही गावडे यांनी विधानसभेत सांगितले.
ताबा मिळाल्यानंतर कला अकादमी खुली
कला अकादमीच्या इमारतीचे नूतनीकरण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून केले जात आहे. साबांखाने इमारतीचा ताबा कला-संस्कृती खात्याकडे सुपूर्द केल्यानंतर कला अकादमी लोकांसाठी खुली केली जाणार आहे, असे गोविंद गावडे यांनी सांगितले.
‘ते’ स्वप्न अखेर साकार होणार
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजनाचे स्वप्न अखेर साकार होणार आहे. राज्यात 25 ऑक्टबर ते 9 नोव्हेंबर 2023 दरम्यान राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ केला जाणार आहे, असे गावडे यांनी सांगितले.