>> एकूण ५ संशयित ताब्यात, केंद्रीय वन्यजीव गुन्हे अन्वेषण पथकाची भेट
सत्तरी तालुक्यातील चार वाघांच्या मृत्यू संदर्भात आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. त्यांना वाळपई प्रथम न्यायदंडाधिकारी न्यायालयातून चौकशीसाठी सात दिवसांचा रिमांड देण्यात आलेले आहे. दरम्यान केंद्रीय वन व पर्यावरण खात्याच्या निर्देशानुसार नियुक्त करण्यात आलेल्या केंद्रीय वन्यजीव गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने काल गोळावली भागातील अनेक ठिकाणी भेटी देऊन या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी विविध ठिकाणी भेटी देऊन छायाचित्रे घेतली व संबंधित खात्याच्या अधिकार्यांशी सविस्तर चर्चा केली.
सत्तरी तालुक्यातील गोळवली गावांमध्ये चार वाघ मृत्यू होण्याच्या प्रकारामुळे खळबळ निर्माण झाल्यानंतर हा प्रश्न जागतिक स्तरावर निर्माण झालेला आहे. गोव्याची मोठ्या प्रमाणात नाचक्की झाली असून याची गंभीर दखल केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने खास पथक नियुक्त करून या संदर्भाचा सविस्तरपणे आढावा घेण्यासंदर्भात निर्देश दिले होते. त्याप्रमाणे काल हे पथक गोव्यात आले. यात राजेंद्र गरवाड व अय्या मल्ल्या यांचा समावेश होता. या दोन सदस्य पथकाने गोळावले गावांमध्ये संध्याकाळी भेट देऊन या संदर्भाची संपूर्ण माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी वनखात्याचे डीसीएफ विकास देसाई यांच्याशी चर्चा केली व वाघ कशाप्रकारे मृत्यू पावले व कशाप्रकारे त्यांची विल्हेवाट लावली यासंदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेतली. हे पथक आणखी चार दिवस गोव्यात वास्तव्य करणार असून वेगवेगळ्या माध्यमातून चौकशी करून अहवाल केंद्रीय मंत्रालयात सादर करण्यात येणार आहे.
दरम्यान वाघाच्या मृत्यू संदर्भाची तपास यंत्रणा मोठ्या प्रमाणात गतिमान झाली असून आज संशयित म्हणून भिरो पावणे याला अटक करण्यात आली. यामुळे एकूण अटक झालेल्या संशयितांची संख्या पाचवर पोहोचली असून यापूर्वी अटक करण्यात आलेल्या चार आरोपींमध्ये विठो पावणे, मालो पावणे, बोमो पावणे, ज्योतिबा पावणे यांचा समावेश आहे.
वाघ मृत्यूप्रकरणी कसून चौकशी
म्हादई अभ्यारण्य क्षेत्रात झालेल्या वाघांच्या हत्येप्रकरणी कसून चौकशी चालू असून वनमंत्री असलेले मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या प्रकरणी गंभीरपणे लक्ष घातलेले आहे, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी काल सांगितले.
ज्या कुणी हे अमानवी कृत्य केलेले आहे त्यांच्यावर कडक कारवाई होण्याची गरज असून ती होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. ही हत्या हे एखाद्या संघटित टोळीचे काम आहे, असे आपणाला वाटते काय, असे विचारले असता आता चौकशीत सगळे काही उघड होणार असल्याचे ते म्हणाले. मृत वाघांची नखे काढण्यात आली असल्याचे आढळून आलेले असून सगळ्या बाजूनी चौकशी केल्यानंतर सत्य बाहेर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
म्हादई अभयारण्याला व्याघ्रक्षेत्र
घोषित करण्यास विरोध ः विश्वजित
म्हादई अभयारण्य हे व्याघ्रक्षेत्र (टायगर रिझर्व्ह) घोषित केल्यास सत्तरी तालुक्याच्या विकासावर मोठे निर्बंध येणार असून त्यामुळे म्हादई अभयारण्य व्याघ्रक्षेत्र घोषित करण्यास आपला विरोध असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी काल अनौपचारिकरित्या पत्रकारांशी बोलताना सांगितले. आपण व्याघ्रप्रेमी आहे. वन्यजीवांविषयी आपणाला प्रेम आहे. मात्र, म्हादई अभयारण्य हे व्याघ्रक्षेत्र घोषित केल्यास सत्तरीतील लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागणार असल्याने व सत्तरीचा विकास खुंटणार असल्याने आपला त्याला विरोध असल्याचे विश्वजित राणे यांनी स्पष्ट केले.
गोव्याचे माजी राज्यपाल जे. एफ. आर. जेकब यांनी गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू असताना मागचा पुढचा विचार न करता घाईगडबडीत म्हादई वनक्षेत्र हे अभयारण्य घोषित केले होते, असे राणे म्हणाले. व्याघ्रक्षेत्रातील नियम हे अत्यंत कडक असतात असे सांगून म्हादईचा परिसर हा फार मोठा आहे. एकदा व्याघ्रक्षेत्र घोषित करण्यात आले तर या संपूर्ण परिसरात कोणताही विकास होऊ शकणार नाही. परिणामी तेथे राहत असलेल्या लोकांच्या जीवनावर त्याचा विपरित परिणाम होणार असल्याचे राणे म्हणाले.
म्हादई अभयारण्यात ‘टायगर कॉरिडोर’ आहे. दूरदूरहून वाघ तेथे येत असतात. त्यामुळे म्हादई व्याघ्रक्षेत्र घोषित करण्याऐवजी ते ‘टायगर कॉरिडोर’ घोषित केले जावे, अशी सूचना राणे यांनी केली. त्याबाबत केंद्र सरकार योग्य काय तो निर्णय घेईल, असे ते म्हणाले.