वाघाच्या मृत्यूप्रकरणी सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

0
102

गोळावली सत्तरी येथे म्हादई अभयारण्यात मृतावस्थेत सापडलेल्या पट्टेरी वाघ प्रकरणी सखोल चौकशी करण्याचा आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिला.
गोळावली सत्तरी येथे जंगलात स्थानिक नागरिकांना पट्टेरी वाघ मृतावस्थेत रविवारी आढळून आला होता. या प्रकरणी वनखात्याला माहिती देण्यात आल्यानंतर वनखात्याच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास कामाला सुरुवात केली आहे. मात्र अद्याप पट्टेरी वाघाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही.

म्हादई अभयारण्यात वाघाच्या मृत्यूच्या घटनेने मनाला वेदना झाली आहे. वाघाच्या मृत्यूची घटना हा चिंतेचा विषय आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी म्हटले आहे. प्राथमिक तपासात वाघाचा मृत्यू विषबाधेने झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची सूचना संबंधितांना करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी म्हटले आहे.

गोळावली येथे मृतावस्थेत आढळून आलेल्या पट्टेरी वाघाचे शवविच्छेदन दोन पशुवैद्यकीय चिकित्सकांनी केले. वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. वाघाच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी मृत वाघाच्या पोटातील काही भाग काढून तपासणीसाठी हैदराबाद आणि डेहराडून येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. शवचिकित्सा करण्यात आल्यानंतर वन खात्याने वाघाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. वन खात्याने गोळावलीजवळील भागात शोधमोहीम हाती घेतली आहे.