आजपासून बरोबर एका वर्षाने, २३ डिसेंबर २०२३ रोजी नवी दिल्लीमध्ये जी – २० देशांची परिषद भारताच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तिची आणि त्यानिमित्ताने या वर्षभरात देशभरात होणार असलेल्या एकूण दोनशेहून अधिक बैठकांची तयारी ठिकठिकाणी जोरात सुरू आहे. आपल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करणार्या भारतासाठी, जी – २० समूहाचे अध्यक्षपद ही फार मोठी सुसंधी आहे. केवळ एक जागतिक सोहळा म्हणून त्याकडे न पाहता, भारताचे सामर्थ्य जगापुढे मांडण्याची सुसंधी म्हणून त्याकडे पाहिले गेले पाहिजे. ज्या दिवशी औपचारिकरीत्या हे अध्यक्षपद भारताकडे आले, त्याच दिवशी म्हणजे गेल्या एक डिसेंबरला देशातील सर्व प्रमुख वर्तमानपत्रांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यामध्ये जी – २० चे अध्यक्षपद भारतासाठी कोणत्या सुसंधी निर्माण करणारे ठरू शकते त्याचा लेखाजोखा विस्तृतपणे मांडण्यात आला आहे. खरोखरच एक महासत्ता म्हणून हळूहळू उदयास येत असलेल्या भारताला या निमित्ताने जगातील आपले उंचावत चाललेले स्थान भक्कम करण्याचीच नव्हे, तर आपला प्राचीन वारसा, आपल्या वैविध्यपूर्ण परंपरा, आपली मानवतावादी संस्कृती, आपल्या जीवनशैलीला असलेला आध्यात्मिक पाया ह्या सगळ्याविषयी विलक्षण कुतूहल बाळगणार्या जगापुढे ही आपली वैशिष्ट्य प्रभावीपणे मांडता येऊ शकतात.
जी – २० राष्ट्रे हा जगातील सर्वांत प्रबळ राष्ट्रांचा एक समूह आहे. अगदी अमेरिका आणि ब्रिटनपासून चीन आणि रशियापर्यंतचे मिळून १९ देश आणि युरोपीय महासंघ त्याचे सदस्य आहेत. एकूण जागतिक अर्थव्यवस्थेचा ८० टक्के वाटा ह्या जी – २० देशांचा आहे. जगाचा ७५ टक्के व्यापार या वीस देशांदरम्यान होतो आणि जगाची साठ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या या वीस देशांमध्ये आहे, यावरून जी – २० चे महत्त्व लक्षात यावे. भारताच्या अध्यक्षतेखाली आपल्या देशात होणार्या परिषदेत जगाच्या दृष्टीने महत्त्वाच्या समकालीन विषयांवर विचारमंथन तर घडेलच, परंतु त्यानिमित्ताने वेगवेगळ्या कृतिगटांच्या ज्या बैठका देशभरात विविध राज्यांत होणार आहेत, त्यानिमित्ताने आपल्या विशालतेचे, आपल्या समृद्धीचे, आपल्या प्रगतीचेही दर्शन जगाला घडवण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यामुळेच गुजरातपासून ईशान्येपर्यंत आणि काश्मीरपासून दक्षिण भारतापर्यंत विविध राज्यांमध्ये या विविध बैठका होणार आहेत. गोव्यातही एका बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. ङ्गचोगमम आणि ङ्गब्रिक्सफ प्रमाणेच गोव्यासाठीही ही एक सुसंधी आहे.
भारताचा योग, भारताचे अध्यात्म, भारताचा आयुर्वेद, भारताचा प्राचीन इतिहास व वारसा, संस्कृत व तामीळसारख्या भारताच्या प्राचीन भाषा, ह्या सगळ्याविषयी तर जगाला कुतूहल आहेच, परंतु आजच्या नव्या युगामध्ये भारताने विविध क्षेत्रांमध्ये जी कमाल करून दाखवलेली आहे, तोही जगासाठी कुतूहलाचा भाग आहे. आधार, यूपीआय, डिजिलॉकर, डिजिटल रुपया, जनधन, कोवीन, वगैरे वगैरे जे चमत्कार गेल्या काही काळात भारतासारख्या विराट लोकसंख्येच्या देशात यशस्वी ठरले, त्यांच्यापासून जगही काही शिकू पाहते आहे. त्यादृष्टीनेही जी २० देशांच्या अध्यक्षपदाच्या निमित्ताने भारत आपली साप आणि गारुड्यांचा देश ही वसाहतवादी मानसिकतेत घट्ट रुजलेली प्रतिमा पुसून टाकून नव्या डिजिटल युगाचे सारथ्य करणारा देश म्हणून जगापुढे आणू शकतो. एवढा मोठा देश असूनही लोकशाही येथे भक्कम स्वरूपात रुजली आहे. आज जगभरात भारतीय बुद्धिमत्तेने बड्या बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचे सुकाणू हाती धरले आहे. ज्या ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केले, त्यांच्यावर आज आपला माणूस राज्य करतो आहे. अवघ्या जगाला आज आपला देश अन्न, औषधे, खते इ. चा पुरवठा करतो आहे. हे जे स्थित्यंतर चहुअंगांनी घडून आलेले आहे, त्याचे दर्शन जगाला यानिमित्ताने घडेल. पर्यटन, शिक्षण, वैद्यक, उपग्रह संशोधन, अशा अनेक क्षेत्रांमध्ये भारताने घेतलेली झेप जगाला स्तिमित करून सोडणारी राहिली आहे. आपली एकशे तीस कोटी जनता हे आपल्यासाठी लोढणे नसून मानवसंसाधनाची ती महाशक्ती मानून तिचा सकारात्मक उपयोग करता येऊ शकतो हेही जगावर बिंबवले गेले पाहिजे. ‘इंडिया वर्ल्ड रेडी अँड वर्ल्ड इंडिया रेडी’ बनवण्याचा या परिषदेचा संकल्प आहे. जी २० अध्यक्षपदाच्या काळात प्रत्येक यजमान देश आपला कृतिकार्यक्रम पुढे ठेवत असतो. भारताने ‘वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्यूचर’ हे बोधवाक्य स्वीकारले आहे. वसुधैव कुटुंबकम ही तर आपली संस्कृतीच आहे. आता केवळ तिचे भव्योदात्त दर्शन जगाला घडवायचे आहे!