- पौर्णिमा केरकर
प्रत्येक गोष्टीचा व्यापार होऊच शकत नाही. भावनांना व्यावसायिक रूप देताना जगण्यातील कृत्रिमतेकडे आपण झुकत आहोत, याचे भान जरूर बाळगता आले पाहिजे. नवीन बदल हा सातत्याने होत जाणारा बदल आहे. तो सकारात्मक, नावीन्यपूर्ण आणि कृतिशील, कलात्मक करणे हे आपल्या हाती असते. त्यासाठी प्रयत्नशील राहून कार्य करणे ही नव्या वेगवान प्रवाहाशी जुळवून घेण्याची मेख आहे. म्हणून डोळसपणे सभोवतालचे बदल टिपत जगता आले पाहिजे. तारखा बदलू देत, वर्षे सरू देत, नैसर्गिकरीत्या आपल्या देहावर सुरकुत्या पडल्या तरीही हरकत नाही… मात्र प्रत्येक ऋतू नव्याने सजताना तो अनुभवता आला पाहिजे…
वर्षं अगदी झरझर मागे पडत आहेत. ‘अरे, आत्ता तर नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे…’ म्हणेपर्यंत त्या वर्षाचा परतीचा प्रवासही सुरू झालेला असतो. वर्ष बदलते म्हणजे नेमके काय होते? कॅलेंडरवरील तारखांत बदल होतो की मग बदललेल्या वर्षाचा एकच शेवटचा आकडा बदलतो?
बदल नेहमीच प्रवाही असायला हवा. तो वाहता राहिला तरच त्याच्यातील जिवंतपणाची अनुभूती जागी राहणारी असते. नवीन वर्षाच्या बदलाची जाणीव ही तारखांपुरती मर्यादित न राहता ती आभाळभरारी घेणारी हवी. आत्मविश्वास, वैचारिक क्षमता जागविणारी हवी… असे असले तरच त्यातील नावीन्य जगण्याला उभारी देणारे ठरते. दरवर्षी नवे वर्ष- नवी स्वप्ने- नव्या शुभेच्छा! नवीन संकल्पानंतर या संकल्पाचे काय होते कळत नाही. आपण चौकटीत आयुष्य जगतो. घराला ज्या आकाराच्या खिडक्या असतात, त्याच आकाराचा आकाशाचा तुकडा आमच्या डोळ्यात सामावतो. आकाश त्याहूनही खूप विस्तीर्ण, अमर्याद आहे. ते अनुभवण्यासाठी थोडीशी चौकट मोडावीच लागते; अन्यथा त्यावर बुरशी साचेल, शेवाळ दाटेल! एकेक वर्ष आपल्या आयुष्यातून वजा होत जाते, तसतसे आपण वयाबरोबरच अनुभवानेही वाढत जातो. हे अनुभव आपल्याला संवेदनशील माणूस घडायला मदत करणारे हवेत. थोडेसे मागे वळून गतकाळातील दिवसांना भेटूया. कोणाकोणाला आपण भेटलो… नातेवाइकांची खबर-बातमी घेतली का? आपल्याच जीवनाला आपण नव्याने भिडलो का? या प्रश्नांची उत्तरे शोधायचीत. ती जर नकारात्मक आली तर मात्र परिस्थिती कठीण होते.
पूर्वीपेक्षा आज माणसे साक्षर झालेली आहेत असे सर्वसाधारणपणे मानले जाते. जुनी जाणती पिढी निरक्षर होती; मात्र ती अज्ञानी नव्हती. आजच्या पिढीला अक्षर-ओळख आहे, परंतु ती अज्ञानी असल्याचे कित्येक दाखले सापडू शकतात. उदा. पूर्वीच्या लोकांनी नितळ आरोग्याला प्राधान्य दिले होते. ‘आरोग्यम् धनसंपदा’, ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ असे मानून त्यांनी जंगले वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. लोकांनी ती टिकवावी म्हणून धार्मिक भीती घातली. वडेश्वराला विशाल वटवृक्षाच्या रूपात पूजले, झरेश्वराच्या माध्यमातून निर्मळ पाण्याच्या स्रोतांचे पावित्र्य जतन केले, महाकाय वृक्ष-वेलींचे जतन देवराईच्या संकल्पनेतून केले. आज आपला सभोवताल विद्रुप होत आहे. डोंगरांचे सपाटीकरण करून नैसर्गिक जंगले उद्ध्वस्त करून सिमेंट-काँक्रीटची जंगले वाढविली जात आहेत. अलीकडे निसर्गाशी आपला संवादच होत नाही. जिथं कुटुंबातील व्यक्तींशी संवाद होत नाहीत, तिथं निसर्गाशी बोलायला वेळ तरी कोणाकडे असणार…? असा विचार मनात येऊ शकतो. तरीसुद्धा मुलांसाठी, त्यांच्या भवितव्याच्या सुरक्षिततेसाठी तो भरमसाठ आर्थिक मालमत्ता कमावून ठेवतो. मात्र ज्याच्यामुळे त्याचे आयुष्य सुगंधित, समाधानी, सुदृढ बनले अशा निसर्गापासून त्यांना दूर नेत आहोत. सरत्या वर्षाने ही स्थिती तर अधिकच जीवघेणी केलेली आहे. सरत्या वर्षाकडून सद्बुद्धी घेत नवीन वर्षात निसर्ग संवर्धनासाठीची संवेदनशील साक्षरता हृदय अन् मनात अढळपदी असायलाच हवी. निसर्ग चित्रातून, कवितांतून यायला हवा अशी धारणा असते. फिरायला जायचे ते निसर्गाच्या सान्निध्यात असेही आपले मत असते. मग जीवन-जाणिवांना समृद्ध करणाऱ्या आपल्या परिसराला हिरवागार ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाचीच आहे.
निसर्ग म्हणजे नवनिर्मिती. तो सतत बदलत राहतो. त्याचे बदल टिपण्यासाठीची सक्षम दृष्टी लाभली तरच स्वतःचं आणि येणाऱ्या पिढीचं जीवन समृद्ध होईल यात शंका नाही. नववर्षात निसर्गसमृद्ध जीवनशैली जगण्याचे ध्येय बाळगून त्यासाठी इतरांनाही प्रवृत्त करायला हवे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी, पर्यटनातून आर्थिक समृद्धी प्राप्त करण्यासाठी या छोट्या भूमीत जमिनीचा होणारा लिलाव… डोंगर-टेकड्यांची कत्तल… पाणथळ जागा बुजवून, मोठमोठ्या झाडांची बेछूट कत्तल करून जगणं म्हणजे आपण भकास करणारा विकास साध्य करण्याचा प्रयत्न करीत आहोत. राष्ट्रीय वारसा साधन-संपत्ती, वैभवशाली इतिहास संस्कृती आणि परंपरांचे जतन करून त्या पुढील पिढीसाठी राखून ठेवणे गरजेचे आहे. आज मूळचा स्वभावाने शांत, संयत, सहनशील, अगत्यशील गोवेकर असुरक्षितता, अस्थिरता, अस्वस्थतेच्या विळख्यात सापडलेला आहे. माणसांच्या जगण्याचा वेग तीव्र झालेला आहे. प्रवासाची वेगवान साधने उपलब्ध आहेत.. अजूनही विस्तीर्ण महामार्ग बांधले जात आहेत. त्यासाठी निर्दयपणे कचाकचा शेकडो वर्षांच्या ऋषितुल्य वृक्षांवर यंत्रे चालवून त्यांना मातीमोल करण्यात येत आहे. पिढ्यान्पिढ्या आपण माणसांना, पाखरांना सावली, श्वास दिले, अंगाखांद्यावर खेळवलं, त्यांचे सारेच हट्ट पुरविले आणि आता ही अवस्था…? बा. सी. मर्ढेकरांच्या कवितेतून झाडांच्या अंतर्मनाची वेदना संवेदनशील मनाला अंतर्बाह्य हलवून टाकते. ते म्हणतात-
शिशिर ऋतूच्या पुनरागमे
एकेक पान गाळावया
का लागता मज येतसे
न कळे उगाच राडावया,
पानात जी निजली इथे
इवली सुकोमल पाखरे
जातील सांग आता कुठे?
निष्पर्ण झाडीत कापरे-!
मर्ढेकरांनी किती तरल विचार या कवितेत मांडलेला आहे. पानगळती होताना पाखरांची होणारी झोपमोड कवीला अस्वस्थ करते. इथे तर शेकडो वर्षांचे संचित जतन करून मूकपणे आघात सोसणाऱ्या वृक्षांनाच मुळापासून उमटून काढले जात आहे त्याचे काय?
कुठं धावायचं? कितपत धावायचं? आणि कशासाठी धावायचं? याचा विचार नवीन वर्षात करायलाच हवा!
पैशांसाठी जमिनी विकायच्या… बंगले बांधून पर्यटकांना भाड्याने द्यायचे… त्यांनाच खूश करण्यासाठी अवैध व्यवसाय करायचे… स्वतःच्या नावावर असलेले व्यावसायिक गाडे परप्रांतीयांना धंदे करण्यासाठी द्यायचे… आणि आपण गल्ला गोळा करीत राहायचे, ही वृत्ती बदलायला हवी. आपल्या निसर्गसंपन्न गोव्याची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटनामुळे डागाळत आहे याला जबाबदार कोण?
भरमसाठ पैसा कॉर्पोरेट जगणं देईल; मात्र खरंखुरं जगण्याचं असीम समाधान, आयुष्यभराचे सुख देणारा आहे तो फक्त निसर्ग. आज नवे वर्ष साजरे करतानासुद्धा आपल्याला पब पार्ट्या, सनबर्न हवे असते…
आपल्यात हा बदल झालेला आहे. मातीच्या कौलारू उबदार, टुमदार घरापासून ते मोठ्या सिमेंट-काँक्रीटच्या हवेलीपर्यंत चालणे… सायकल मागे पडून आपण दुचाकी, चारचाकीवर बसून आहोत. मनोरंजनाची साधने प्रत्येकाच्या हाती आलेली आहेत. जगणे, वागणे, रीतीभाती, संस्कार मूल्ये, नातेसंबंध, बंध-अनुबंध, कुटुंब सारे सारे काही बदलले आहे. बदल हवाच, परंतु जगणेच विस्थापित करणारा बदल कितपत स्वीकारायचा याचा विचार सुजाण पिढीने करायला हवा. निसर्गाची आपण करीत असलेली हत्या थांबवली पाहिजे. नवीन वर्षात याच विचाराला प्राधान्य हवे; अन्यथा निसर्गाचा ऱ्हास हा माणसांच्या होणाऱ्या विनाशाची नांदी ठरेल…!
वय वाढते तशी आपल्या जगण्यात, वागण्यात, वैचारिक क्षमतेत प्रगल्भता यायला हवी. बरे-वाईट, खरे-खोटे समजून घेण्याची शक्ती निर्माण व्हायला हवी. आणि मग जीवन कसे जगायचे याचा निर्णय घ्यावा. आपण जगतो ते जग सुंदर आहेच, पण ते आणखीन सुंदर करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती घेऊन सर्वांनी कार्यप्रवण राहायला हवे, ही विचारधारा बाळगून नवीन वर्षाचे स्वागत करायला हवे.
साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रांचा विचार केला असता सरत्या वर्षाची प्रेरणादायी कामगिरी होती. संपूर्ण वर्षभर कोणत्या ना कोणत्या सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल सुरूच होती. उत्साह-आनंदाची ही पर्वणी सुखावणारी होती. यानिमित्ताने सांस्कृतिक, साहित्यिक उपक्रम राबविले जातानाही त्यात निसर्ग अग्रक्रमाने यायला हवा. निसर्गभान समाजामध्ये रुजविण्यासाठी साहित्यिक, कलावंतांनी आपापल्या कलाकृतीतून अभिव्यक्ती करायलाच हवी तरच कोठे निसर्गाच्या ओढीची खरीखुरी तीव्रता लागेल. अरुणा ढेरे आपल्या कवितेतून खोल मनातळाशी असलेली भावना व्यक्त करताना म्हणतात-
नष्ट होताहेत दुर्मीळ जातीचे मोर, वाघ, हत्ती
आणि कितीतरी जीवनोत्सुक प्राणी, पक्षी
अभयारण्यातही भयाचा गडद आकांत दबलेला
काही आणि कुठेच सुरक्षित वाटत नाही
माझ्या मनात खोल तळाशी येऊन लपली आहेत
कितीतरी मूल्ये, लक्षावधी वर्षे चिवटपणे तगलेली
आज प्राणभयाने थरथरताहेत
त्यांच्यासाठी पृथ्वीच्या पाठीवर एखादे अभयारण्यही नाही…
प्रत्येक गोष्टीचा व्यापार होऊच शकत नाही. भावनांना व्यावसायिक रूप देताना जगण्यातील कृत्रिमतेकडे आपण झुकत आहोत, याचे भान जरूर बाळगता आले पाहिजे. नवीन बदल हा सातत्याने होत जाणारा बदल आहे. तो सकारात्मक, नावीन्यपूर्ण आणि कृतिशील, कलात्मक करणे हे आपल्या हाती असते. त्यासाठी प्रयत्नशील राहून कार्य करणे ही नव्या वेगवान प्रवाहाशी जुळवून घेण्याची मेख आहे. म्हणून डोळसपणे सभोवतालचे बदल टिपत जगता आले पाहिजे. तारखा बदलू देत, वर्षे सरू देत, नैसर्गिकरीत्या आपल्या देहावर सुरकुत्या पडल्या तरीही हरकत नाही.. मात्र प्रवीण दवणे म्हणतात तसे…
तृणामधला शब्द होऊन, याला झुलता येतं
प्रत्येक क्षण फूल होऊन, त्याला फुलता येतं
स्पर्शामध्ये ज्याच्या रुजते, हिंदोळ्याचे झाड
आभाळ त्याला हृदयामधून, सहज टिपता येतं
हे असे जगता आले पाहिजे आणि प्रत्येक ऋतू नव्याने सजताना अनुभवता आला पाहिजे.