वर्षा पर्यटनासाठी सुरक्षित धबधबे खुले करणार : मुख्यमंत्री

0
4

राज्यातील वर्षा पर्यटनासाठी सुरक्षित असलेले धबधबे पर्यटक आणि नागरिकांसाठी खुले करण्यात करण्यात येणार आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल स्पष्ट केले.

राज्य सरकारच्या वन खात्याने पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन संरक्षित वन क्षेत्रातील धबधबे आणि नद्यांवर जाण्यास नागरिक व पर्यटकांना बंदी घातली आहे. या आदेशाबाबत राज्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी नाराजी व्यक्त केली होती. राज्यातील सर्वच धबधब्यावर जाण्यास बंदी घालणे योग्य नव्हे. त्याचा राज्यातील पर्यटनावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. राज्यातील पावसाळी पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर वन खाते आणि पर्यटन खाते यांच्या समन्वय आवश्यक आहे, असे रोहन खंवटे यांनी म्हटले होते.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करून कमी धोका असलेले धबधबे पर्यटक आणि नागरिकांसाठी खुले केले जाऊ शकतात, असे वनमंत्री विश्वजीत राणे यांनी म्हटले होते. त्यानंतर काल रात्री उशिरा मुख्यमंत्री राज्यातील सुरक्षित धबधबे पर्यटक व नागरिकांसाठी खुले केले जाणार असल्याचे स्पष्ट केले.
राज्यातील म्हादई, भगवान महावीर, खोतीगाव आणि नेत्रावळी या चार संरक्षित वनक्षेत्रात सुमारे 38 धबधबे आहेत. वन खात्याच्या अहवालानुसार म्हादई संरक्षित वन क्षेत्रातील 21 धबधब्यांपैकी 5 धबधबे धोकादायक , 4 धबधबे मध्यम धोक्याचे आहेत. भगवान महावीर अभयारण्यातील 10 धबधब्यांपैकी 4 धबधबे धोक्याचे आणि 4 धबधबे मध्यम धोक्याचे आहेत. नेत्रावळी अभयारण्यातील 4 धबधब्यांपैकी 2 धबधबे धोक्याचे आणि 1 धबधबा मध्यम धोक्याचा आहे. खोतीगाव अभयारण्यातील 3 धबधब्यांपैकी 2 धबधबे मध्यम धोक्याचे आहेत. राज्यातील एकूण 16 धबधबे कमी धोक्याचे आहेत. गतवर्षी कमी धोक्याचे धबधबे पर्यटक आणि नागरिकांसाठी खुले करण्यात आले होते.

सर्व धबधब्यांवर सरसकट बंदी अयोग्य

पर्यटनमंत्री रोहन खंवटे; पावसाळी पर्यटनही गरजेचे

राज्यात नियमित पर्यटनाबरोबरच पावसाळी पर्यटन गरजेचे आहे. नुकतीच धबधब्यावर बंदी घालण्यात आल्याची घोषणा वन खात्याने केली आहे, त्याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि वनमंत्री विश्वजीत राणे यांच्याशी चर्चा करून योग्य तोडगा काढण्यात येणार आहे. गोवा राज्य पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे पावसाळी पर्यटन मोसमात हॉटेल व्यावसायिक आणि अन्य छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना फायदा होतो. त्यामुळे अचानक सरसकट धबधब्यांवर बंदी घालणे अयोग्य आहे, असे मत पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी काल पर्वरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

राज्यात पावसाळी पर्यटनामुळे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना रोजगार, कामधंदा मिळेल. धोकादायक धबधबे आणि जलसंचय होणारी ठिकाणे शोधून तेथे सुरक्षा उपाययोजना आखणे आवश्यक आहे. अचानक धबधब्यांवर जाण्यास बंदीची घोषणा करणे हे योग्य नव्हे, असे रोहन खंवटे म्हणाले.
पर्यटन कायद्याअंतर्गत व्यवसाय आणि सार्वजनिक कायदा हे दोनच कायदे सध्या राज्यात अमलात आहेत. आता पर्यटन कायदा अधिक बळकट करण्याची गरज आहे. त्यासाठी जनतेच्या सूचना जाणून घेतल्या जातील. यासंबंधी तेलंगणा येथील एका एजन्सीला मसुदा करण्यास सांगितला असून, तो जनतेपुढे लवकरच सादर करण्यात येईल, असेही खंवटे म्हणाले.