>> मोफत सिलिंडर योजनेला मंजुरी
एप्रिलपासून योजनेची कार्यवाही; पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत
निर्णय; भाजपकडून निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासनाची पूर्ती
भाजपने आपल्या विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांपैकी एका आश्वासनाची पूर्ती राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत काल केली. राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत तीन घरगुती गॅस सिलिंडर मोफत देण्याच्या योजनेला मान्यता देण्यात आली, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सलग दुसर्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आपल्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेतली. या बैठकीला मंत्री विश्वजीत राणे, माविन गुदिन्हो, रवी नाईक, नीलेश काब्राल, सुभाष शिरोडकर, रोहन खंवटे, गोविंद गावडे, बाबूश मोन्सेरात आणि मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल यांची उपस्थिती होती.
या बैठकीत राज्यातील नागरिकांना वर्षाला तीन घरगुती गॅस सिलिंडर मोफत देण्याच्या योजनेवर चर्चा करून तिला मान्यता देण्यात आली. या योजनेची अधिसूचना जारी केल्यानंतर ती कार्यान्वित होणार आहे. आगामी वर्ष २०२२-२०२३ या आर्थिक वर्षापासून तीन मोफत गॅस सिलिंडर योजनेची कार्यवाही केली जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
राज्य विधानसभेच्या दोन दिवसीय अर्थसंकल्पीय अधिवेशनात ३० मार्च रोजी अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. या बैठकीत विधानसभेच्या दोन दिवसीय अधिवेशनावरही चर्चा करण्यात आली. या अधिवेशनात राज्याचा पूर्ण अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. सदर अर्थसंकल्प पावसाळी अधिवेशनात चर्चा करून मंजूर केला जाणार आहे. या अधिवेशनात लेखानुदानाला मान्यता घेतली जाणार आहे. तसेच विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी २९ मार्चला होणार्या राज्यपालांच्या अभिभाषणाला मान्यता देण्यात आली, अशी माहिती देखील मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.
तत्पूर्वी, पर्वरीतील मंत्रालयात मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. सावंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता, त्यावेळी देखील त्यांनी मोफत सिलिंडर योजनेविषयी भाष्य केले होते. भाजपने सत्तेवर आल्यास राज्यातील जनतेला वर्षाला तीन एलपीजी सिलिंडर मोफत देण्याचे जे वचन दिले आहेत, ते आपण निश्चित पूर्ण करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते.
अजित रॉय मुख्यमंत्र्यांचे सचिव
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सचिवपदी अजित रॉय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रॉय हे उत्तर गोवा जिल्हाधिकारी पदी कार्यरत होते. त्यांच्या जागी आता जिल्हाधिकारी म्हणून मामू हागे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन
गोवा विधानसभेचे दोन दिवसीय अर्थसंकल्पीय अधिवेशन मंगळवार दि. २९ मार्चपासून सुरू होणार असून, ते बुधवार दि. ३० मार्चपर्यंत चालणार आहे. नूतन सभापतींची निवड मंगळवारी सकाळी ११.३० वाजता केली जाणार आहे. त्यानंतर, दुपारी १२.३० वाजता राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांचे अभिभाषण होणार आहे. या अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी बुधवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत वर्ष २०२२-२०२३ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या दोन दिवसीय अधिवेशनात लक्षवेधी सूचना आणि प्रश्नोत्तराचा तास होणार नाही.
सभापतिपदासाठी आज निवडणूक
सभापतिपदासाठी सत्ताधारी पक्षातर्फे रमेश तवडकर आणि विरोधी पक्षाकडून आलेक्स सिक्वेरा यांनी अर्ज दाखल केले आहेत. कॉंग्रेसचे आलेक्स सिक्वेरा यांनी काल सभापतिपदासाठी अर्ज दाखल केला. सत्ताधारी पक्षाला २५ आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे भाजपचे काणकोणचे आमदार रमेश तवडकर यांची सभापतिपदी निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. दरम्यान, सभापतिपदासाठी रमेश तवडकर यांना २५ पेक्षाही जास्त मते मिळण्याची शक्यता मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी व्यक्त केलेली आहे.