वर्षभरात 2500 रिक्त सरकारी पदे भरणार

0
25

>> 78 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची घोषणा; खाजन विकास आणि संवर्धन मंडळाची स्थापना करणार

राज्य कर्मचारी भरती आयोगामार्फत येत्या वर्षभरात विविध सरकारी खात्यांतील 2500 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्री मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्य पातळीवरील 78 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात बोलताना पणजी येथे काल केली. याशिवाय राज्यातील खाजन जमिनींच्या संवर्धनासाठी ‘खाजन विकास आणि संवर्धन मंडळा’ची स्थापन करण्यात येणार आहे, अशी घोषणाही त्यांनी केली.
येत्या 19 डिसेंबर 2024 पर्यंत 100 टक्के गोव्यात साक्षरता साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शिक्षणात एसटीईएम, एआय आणि रोबोटिक्समध्ये प्रगती करण्यावर सरकारचा भर आहे. माध्यमिक शाळा ते उच्च माध्यमिक शाळेपर्यंतच्या अभ्यासक्रमात कोडिंग आणि रोबोटिक्सचा समावेश करणारे पहिले राज्य म्हणून गोवा आघाडीवर आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.

राज्यातील विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षण देऊन त्यांना स्वयंपूर्ण बनवण्याच्या निर्धाराने सरकार काम करत आहे. राज्यातील सरकारच्या सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयएसओ-प्रमाणित असून, पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान वाढविण्यासाठी टाटा टेक्नॉलॉजीशी भागीदारी केली आहे. कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी सौर तंत्रज्ञान, अग्निशमन तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान, औद्योगिक सुरक्षा आणि आदरातिथ्य व्यवस्थापन यासारखे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. राज्याच्या आर्थिक बळकटीसाठी पर्यटन क्षेत्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याने सर्व तरुणांनी त्याविषयीचे विशेष प्रशिक्षण घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
गोव्याचा झपाट्याने विकास होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंय भारताला विकसित करण्याचे स्वप्न पाहिले आहे. त्यामुळे विकसित भारत आणि विकसित गोव्यासाठी गोमंतकीय जनतेने पूर्ण योगदान दिले पाहिजे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

कृषी क्षेत्रातील बदल आणि नवनव्या योजनांमुळे राज्यातील कृषी उत्पादनात वाढ होत आहे. येणाऱ्या काळात फोंडा आणि वाळपई येथील कृषी कार्यालयांचे आधुनिकपण करण्यात येणार आहे. राज्यातील प्रशासकीय व्यवस्था बळकट केली जात आहे. नव्या प्रशासकीय इमारतीची कमतरता असलेल्या नऊ तालुक्यांत नवीन इमारती उभारण्यात येणार आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

तत्पूर्वी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ध्वजारोहण व तिरंगा झेंड्याला सलामी दिल्यानंतर मानवंदना स्वीकारली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक अग्निशमन सेवा संचालक नितीन व्ही. रायकर यांना प्रदान करण्यात आले. जीवन रक्षा पदक पुरस्कार 2024 हा वाळपई येथील साहिल भिसो लाड याला प्रदान करण्यात आला. पोलीस अधिकारी अरुण डी. बाक्रे आणि एएसआय महेश जी. सावळ यांना सार्वजनिक प्रशिक्षणात उत्कृष्टतेसाठी केंद्रीय गृहमंत्री पदक प्रदान करण्यात आले.

या कार्यक्रमाला केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, हळदोण्याचे आमदार ॲड. कार्लुस फेरेरा, मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल आणि इतरांची उपस्थिती होती.