वर्ल्ड लीग्स फोरममध्ये आयएसएलला स्थान

0
146

इंडियन सुपर लीगला (आयएसएल) प्रतिष्ठित वर्ल्ड लीग्स फोरम (डब्ल्यूएलएफ) मध्ये स्थान मिळाले आहे. या फोरममध्ये स्थान मिळवणारी ‘आयएसएल’ ही दक्षिण आशियामधील पहिली व आशिया खंडातील सातवी लीग बनली आहे. या फोरममध्ये प्रीमियर लीग, ला लिगा आणि बुंडेस्लिगा यासारख्या जगातील सर्वांत लोकप्रिय व्यावसायिक फुटबॉल लीग स्पर्धांचा समावेश आहे.

सध्या या फोरममध्ये जगभरातील जवळपास १२०० पेक्षा अधिक क्लबचे प्रतिनिधित्व करणारे पाच खंडांचे सदस्य आहेत आणि व्यावसायिक फुटबॉलच्या विकासासाठी जागतिक संस्था फिफाबरोबर ही संस्था कार्य करते. राष्ट्रीय फुटबॉल संघटनांना सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यासाठी आणि व्यावसायिक फुटबॉलमधील मानक आणि संरचना सुधारण्यासाठी हे फोरम सतत काम करत आहे.

वर्ल्ड लीग्स फोरमचे सरचिटणीस जेरोम पेलेमटर म्हणाले की व्यावसायिक फुटबॉल कुटुंबात इंडियन सुपर लीगचे मनापासून स्वागत आहे. आयएसएलला आमच्या कुटुंबात सामील करून घेताना आम्हाला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो आहे. अलिकडच्या वर्षांत आयएसएलने बरीच मोठी मजल मारली आहे आणि आता ती आपल्या प्रदेशातील एक प्रमुख लीग होण्याच्या मार्गावर आहे. वर्ल्ड लीग्स फोरम आणि त्याचे सदस्य लीग आयएसएलबरोबर अनुभव सामायिक करण्यास आणि त्यांच्या भविष्यातील विकासास हातभार लावण्यास उत्सुक आहेत.

भारतीय फुटबॉलच्या
विस्ताराचे द्योतक ः नीता अंबानी
फुटबॉल स्पोर्टस् डेव्हलपमेंट लिमिटेड (एफएसडीएल) च्या संस्थापक आणि अध्यक्ष नीता अंबानी यांनी वर्ल्ड लीग्स फोरममध्ये आयएसएलला स्थान दिल्याबद्दल फोरमचे आभार मानले आहे. वर्ल्ड लीग्स फोरमच्या मंचावर जागा मिळणे हा आयएसएलचा सन्मान आहे. डब्ल्यूएलएफकडून मिळालेली ही मान्यता जागतिक फुटबॉलमध्ये भारतीय फुटबॉलच्या विस्ताराचे हे द्योतक आहे, असे नीता अंबानी म्हणाल्या. अंबानी पुढे म्हणाल्या की, २०१४ मध्ये जेव्हा आम्ही आयएसएल सुरू केले तेव्हा आमच्याकडे भारतात फुटबॉलमध्ये क्रांती घडविण्याचे स्वप्न होते. त्यानंतर दरवर्षी आम्ही सातत्याने आपल्या कामाचा दर्जा उंचावत राहिलो आणि आमच्या युवा फुटबॉलपटूंच्या कलागुणांना जागतिक दर्जाचे व्यासपीठ देत गेलो आहे. या सुंदर खेळाच्या वाढीस आणखी वेग देण्यासाठी आम्ही डब्ल्यूएलएफबरोबर काम करण्यास उत्सुक आहोत