वन मॅन आर्मी, शिरगाव विजयी

0
104

>> मनोर्वा करंडक २०१७

शापोरा येथील मनोर्वा स्पोटर्‌‌स अँड कल्चरल क्लबने ‘मनोर्वा करंडक २०१७’ साठी आयोजित केलेल्या १३व्या अखिल गोवा लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत सोमवारी झालेल्या पहिल्या लढतीत बेतीच्या वन मॅन आर्मी संघाने पर्वरी युनायटेडचा ७ गड्यांनी पराभव केला. तर दुसर्‍या लढतीत शिरगाव स्पोटर्‌‌स क्लबने चोपडे स्पोटर्‌‌स क्लबवर २०७ धावांनी दारुण पराभव लादला.

पहिल्या सामन्यात पर्वरीने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ८ बाद १२८ धावा केल्या. त्यांच्या सुशांत राऊतने सर्वाधिक २३ धावांचे योगदान दिले. बेतीकडून अर्जुन मोरजकरने सर्वाधिक ३ गडी बाद केले. विजयासाठी आवश्यक असलेले लक्ष्य बेतीने १५.५ षटकांत गाठले. त्यांच्या गजन याने नाबाद २८ व साईशने २५ धावा केल्या. पर्वरीच्या सचिन कुंडईकरने २ बळी घेतले.

दुसरा सामना एकतर्फी ठरला. सागर सावंतच्या नाबाद ११७ धावांच्या बळावर शिरगावने १७ षटकांत २ बाद २४२ धावा फलकावर लावल्या. विश्‍वतेज वायंगणकरने ७३ धावा कुटत त्याला चांगली साथ दिली. शिरगावने यानंतर चोपडेचा डाव ३५ धावांत गुंडाळला. शिवा गावकरने भेदक मारा करत १५ धावांत ५ गडी बाद केले.