केंद्र सरकारने गोवा सरकारला वनीकरणासाठी २३८.१६ कोटी रुपयांचा निधी काल मंजूर केला आहे.
वन आणि वृक्षाच्छादित क्षेत्र वाढवण्यासंदर्भात राष्ट्रीय स्तरावर निश्चित केलेली योगदान (एनडीसी) उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, वनीकरणाकरिता हा निधी वापरण्याचे आवाहन केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राज्याच्या वनमंत्र्यांच्या बैठकीत नवी दिल्ली येथे बोलताना केले.
केंद्र सरकारने देशाची हरित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि वनीकरणाला चालना देण्यासाठी विविध राज्यांना ४७,४३६ कोटी रुपयांहून अधिक निधी हस्तांतरित केला. यात गोव्याला वनीकरणासाठी २३८.१६ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
कॅम्पा अर्थात क्षतिपूरक वनीकरणनिधी व्यवस्थापन आणि नियोजन प्राधिकरणांतर्गत हा निधी दिला आहे. यावेळी राज्यमंत्री बाबुल सुप्रियो उपस्थित होते.
राज्यांकडून क्षतिपूरक वनीकरणासाठी गोळा केलेल्या निधीचा वापर होत नसल्याच्या सुरुवातीच्या अनुभवानंतर सर्वोच्च न्यायालयाने २००१ मध्ये या प्राधिकरणाच्या स्थापनेचे आदेश दिले होते.
राज्याला वनीकरणासाठी २३८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केल्याबद्दल केंद्रीय मंत्री जावडेकर यांचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आभार मानले आहेत. या निधीचा योग्य व प्रभावीपणे वापर केला जाईल, असे सावंत यांनी म्हटले आहे.