>> वनमंत्री विश्वजीत राणे यांनी आरोप फेटाळला; सबळ पुरावे देण्याची विरोधकांकडे मागणी
गत उन्हाळा कालावधीत राज्याच्या विविध वनक्षेत्रांत आग लागून मोठ्या प्रमाणात वनसंपदेची हानी आणि वन्यजीवांना झळ पोहोचली होती. हा मुद्दा विरोधी पक्षाच्या आमदारांनी काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला उपस्थित करत या आगीमागे बिल्डर लॉबीचा हात असल्याचा आरोप केला. जळून खाक झालेल्या वनक्षेत्राचे निवासी क्षेत्रात रुपांतर करण्याचा हा डाव असल्याचा आरोपही विरोधकांनी केला; मात्र हा आरोप वनमंत्री विश्वजीत राणे यांनी फेटाळला. सोबतच जळालेल्या वनक्षेत्राचे निवासी क्षेत्रात रुपांतर होईल ही भीती अनाठायी असून, या प्रकारामागे बिल्डर लॉबीचे कारस्थान असेल, तर त्याचे पुरावे द्यावेत, अशी सूचनाही राणे यांनी विरोधकांना केली.
काल प्रश्नोत्तराच्या तासाला काँग्रेसचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी उन्हाळा कालावधीत वनक्षेत्रातील आगीचा प्रश्न उपस्थित करत राज्यातील वनक्षेत्रात ज्या आगीच्या घटना घडल्या होत्या, त्यामागे बिल्डर लॉबीचा हात असल्याचा आरोप केला; मात्र राणे यांनी तो आरोप फेटाळला.
आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या वनक्षेत्राचे रुपांतर केले जाणार नाही, याचे वनमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन द्यावे, अशी मागणी यावेळी विजय सरदेसाई यांनी केली. त्यावर वनमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करत, राज्यातील वन क्षेत्राला लागलेल्या आगी या बिल्डर लॉबीने लावलेल्या आहेत हा आरोप खोटा असून, या वनक्षेत्राचे निवासी क्षेत्रात रुपांतर करण्यात येईल ही भीती निरर्थक असल्याचे स्पष्ट केले. बिल्डर लॉबीने आग लावल्याचे पुरावे जर विरोधकांकडे असतील, तर ते त्यांनी द्यावेत, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
राज्यातील जंगलांना यापुढेही आग लागण्याच्या घटना घडू शकतात. त्यामुळे त्या रोखण्यासाठी राज्य सरकारची काय तयारी आहे, असा प्रश्न यावेळी व्हेन्झी व्हिएगस यांनी केला. त्यावर उत्तर देताना राणे म्हणाले की, आग विझवण्यासाठीच्या साधनसुविधांत वाढ करण्यात येणार आहे. त्यासाठीचे मनुष्यबळ तर वाढवले जाईलच. शिवाय आग आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक असलेली नवी उपकरणेही खरेदी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डोंगर माथ्यावर लागलेली आग विझवणे खूप कठीण असते. त्यासाठी लागणारी वेगळी उपकरणे खरेदी करणार असे त्यांनी स्पष्ट केले. आग लागण्याच्या घटना आता राज्यात वाढल्या आहेत. पूर्वी आगीच्या वर्षाला 25-30 दुर्घटना घडायच्या; पण आता त्या 100 वर पोचल्या असल्याची माहितीही राणे यांनी यावेळी दिली.
वनक्षेत्राचे रुपांतर निवासी क्षेत्रात करू देणार नाही : राणे
गेल्या उन्हाळ्यात आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या 480 हेक्टर वन क्षेत्रापैकी 665 वनक्षेत्र हे ओलसर पानगळीचे जंगल असून, त्याचे रुपांतर निवासी क्षेत्रात करता येत नसल्याचे वनमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले. ज्या वनक्षेत्रात आगीच्या घटना घडल्या होत्या, त्यापैकी कुठल्याही वनक्षेत्राचे रुपांतर निवासी क्षेत्रात करू दिले जाणार नसल्याचे आश्वासनही राणे यांनी दिले.
आगीमुळे 480 हेक्टर वनक्षेत्र जळून खाक
उन्हाळ्यात लागलेल्या आगीत राज्यातील किती वनक्षेत्र जळून खाक झाले, असा प्रश्न विजय सरदेसाई यांनी काल उपस्थित केला, त्यावर 480 हेक्टर एवढे वनक्षेत्र जळून खाक झाल्याची माहिती विश्वजीत राणे यांनी दिली.