वक्फ जेपीसीच्या बैठकीत गदारोळ; दहा विरोधी खासदारांचे निलंबन

0
3

वादग्रस्त वक्फ विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीचा (जेपीसी) 500 पानी अहवाल तयार झाला आहे. या अहवालावर शुक्रवार आणि शनिवारी अशी दोन दिवस बैठक होऊन चर्चा होणार होती; मात्र काल बैठकीच्या पहिल्या दिवशीच खासदारांमध्ये गदारोळ झाला. त्यामुळे आता विरोधी पक्षाच्या 10 खासदारांना समितीमधून निलंबित करण्यात आले आहे. निलंबित खासदारांमध्ये अरविंद सावंत, असुदद्दीन ओवेसी यांचाही समावेश आहे. या बैठकीत अहवालावर चर्चा होऊन तो कायदा मंत्रालयाकडे दिला जाणार होता. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सदर विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे.

भाजपाचे खासदार जगदंबिका पाल हे या संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष असून, त्यांच्या अध्यक्षतेखाली काही ही बैठक झाली. कालच्या बैठकीची सुरुवात गोंधळाने झाली. जगदंबिका पाल यांनी विरोधी खासदारांवर असभ्य वर्तनाचा आरोप केला. यानंतर भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी खासदारांचे निलंबन करण्याचा प्रस्ताव दिला. निलंबित करणाऱ्यात आलेल्या खासदारांमध्ये कल्याण बॅनर्जी, मोहम्मद जावेद, ए. राजा, असदुद्दीन ओवेसी, नसीर हुसेन, मोहिबुल्ला, मोहम्मद अब्दुल्ला, अरविंद सावंत, नदीम-उल हक आणि इम्रान मसूद यांचा समावेश आहे. दरम्यान, लोकसभेत सादर झालेल्या वक्फ विधेयकामध्ये 44 दुरुस्त्या सुचवल्या आहेत. या प्रत्येक दुरुस्तीवर ‘जेपीसी’च्या दोन दिवसांच्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करणे अपेक्षित होते.