– लाडोजी परब
तुकाराम आणि मंगलानं हे पाहिलं, आपल्याला मूलबाळ नाही, पण जगण्याची उमेद आणि दुसर्याला आनंद देण्याइतपत ताकद आहे. मुलगा असूनही माईनं खूप भोगलं. आपल्याला मूलबाळ नाही याची खंत या दिवसापासून त्यांनी मनातून काढून टाकली. एकमेकांची काठी पकडून ती जीवनात पुढे मार्गस्थ झाली. नाती कितीही वाईट असली तरीही ती तोडता कामा नये, कारण पाणी कितीही घाण असलं तरीही ते तहान नाही तर आग तर विझवू शकतं?
तुकारामने घोंगडी ओसरीवर ठेवली, बैल गोठ्यात बांधले. बायकोनं पेज वाढली. त्या थरथरत्या हातांवरील सुरकुत्या आयुष्यभराच्या कष्टाची साक्ष देत होत्या. अळवावरच्या पाण्यासारखं त्यांचं आयुष्य! कष्टाची भाकरीच आयुष्यभर खात होते ते. पण आयुष्याचा तवा तापलेला असतानाही कधी गोड घास त्यांना खायला मिळाला नाही. कष्ट हे त्यांच्या पाचवीला पुजलेले. आज त्यांच्या लग्नाचा चाळीसावा वाढदिवस होता. तुकाराम बायकोला म्हणाला, ‘मंगल्या, आज आपल्या लग्नात ४० वर्षा पूर्ण झाली, कशी भुर्रकन गेली ना? ‘होय, देवान आत्तापर्यंत साथ दिली, पन ता सुख आमच्या पदरात पाडूक नाय, तुम्ही माका आत्तापर्यंत बरी साथ दिल्यात. संसार केलो, पण गोडवो काय येव नाय’ मंगला आईंचे डोळे भरून आले. कपाळावरच्या मोठ्या कुंकवाला पाण्याचा हात लागून ते पूर्ण चेहर्यावर ओघळत होते. अंगावर ना दागिना ना, भरजरी वस्त्रं. फाटक्या चिंध्यांतूनही ती उठून दिसत होती. कारण तिचं मन हिरे मोत्यांपेक्षाही स्वच्छ, निर्मळ होतं. एकमेकांच्या सहवासात उभं आयुष्य काढलं. रुसवे फुगवे स्वत:चे स्वत:च मिटवले. केवळ कष्टाने साथ दिली. नियती त्यांच्याबरोबर नव्हती. साठाव्या वर्षात पदार्पण करताना एकच खंत त्यांना सतावत होती, आपल्याला मूलबाळ नाही. थकलेल्या शरीराला, मनाला आणि भावनांना कुणाची तरी साथ हवी होती. आपल्यापैकी कुणीतरी एकजण आधी जाणार! तुकाराम म्हणायचा, ‘देवा मंगल्याक आधी तुझ्याकडे ने रे बाबा, मी गेल्यार तेचे हाल होतले.’
कुठल्या कार्यक्रमाला जाण्याचीही सोय नव्हती. गावात घरोघरी हळदीकुंकू, लग्न समारंभ, बारसा असे कार्यक्रम असले की, मंगलाला त्यातून वगळायचे. मूलबाळ नसल्याने ‘वांझोटी’ म्हणून तिला हिणवलं गेलं. साठ वर्ष केवळ अश्रूंनी मनाची समजूत घातली. आणि ती आजतागायत.
शेजारच्या माई काकूंचा मुलगा नोकरीला लागला म्हणून ती पेढे वाटत होती. तुकारामलाही पेढा दिला. ‘माई बरा झाला तुझो झील नोकरेक लागलो, आता तुमका शेतात जावची गरज नाय.’ माईच्या चेहर्यावरील आनंद ‘अजि म्या ब्रह्म पाहिले’ असा होता. माईने आपल्या आयुष्यभराची पुंजी मुलाच्या शिक्षणावर खर्च केली. चांगलं शिक्षण मिळेल आणि पुढे आपल्याला ‘सोनियाचे दिन’ येतील ही एकच आशा! तुकाराम आणि मंगलाला मनातून लाज वाटायची. आपल्यालाही मूलबाळ असतं तर किती आनंदाचे दिवस आम्ही उपभोगले असते? असं क्षणभर वाटायचं. कधी कधी मंगला शेजारी खेळणार्या मुलांना बोलावून काही तरी खाऊ द्यायची. त्यांचे मुके घ्यायची, तेवढंच समाधान. चांगले विचार आणि चांगले औषध दोन्ही कडवट, पण त्यामुळेच तर आयुष्य सुखकारक होतं हा मंत्र तुकारामने नेहमी जपला.
वर्ष उलटलं माईचा मुलगा अचानक एका मुलीच्या प्रेमात पडला. मुलगी दिसायला स्मार्ट आणि एम. ए शिकलेली. तिनं म्हणे, त्याला आधीच बजावून ठेवलेलं. लग्न तुझ्याशीच करणार, पण असल्या मोठ्या कुटुंबात मला रस नाही. लग्नानंतर तू एक खोली घे, आपण तिथं राहू. आता मर्जी कुणाची राखायची, आईची की प्रेयसीची? हा पर्याय त्याला निवडावा लागणार होता. लग्नही उरकलं. ‘माझी सून इली, माझी गुणाची बाय ती.’ असं म्हणून माईनं, वाड्यातल्या सर्व सवाशिणींच्या ओट्या भरल्या. चुलीजवळ तिला जाऊ दिलं नाही. नव्या नवरीचे गोड कौतुक एवढं झालं की त्या मुलीलाही खाल्ल्यासारखे वाटू लागले. ‘शी किती बुरसटलेल्या विचारांचे हे तुझे आई बाबा? नॉन्सेन्स!’ मला इथं राहायचं नाही, तिनं पुन्हा नवर्याला बजावलं. एक दोनदा शाब्दिक चकमकही झाली. नवर्याचे कान ती भरत होती. अन् महिन्याभरातच माईंबद्दलचा मुलाचा हेतू बदलला. त्याला ती नकोशी वाटू लागली. बायकोनं सांगितलेल्या सर्व गोष्टींवर तो विश्वास टाकू लागला. नाती ही झाडांच्या पानासारखी असतात, एकदा तुटली की त्याची हिरवळ नाहीशी होते. तसंच काहीसं त्याचं झालं. हल्ली विश्वास आणि आपली माणसं कधी सोडून जातील याचा नेम नाही. शेवटी व्हायचं ते झालंच, माईंचा मुलगा घरातून बाहेर पडला तो कडाक्याचं भांडण करूनच. बायकोला घेऊन तो शहरात खोली घेऊन राहिला. माईंच्या अपेक्षांवर पाणी पडले. लोक म्हणतात, पहिलं प्रेम विसरता येत नाही. मग हे आपल्या आई वडिलांना का विसरतात?
माई थकल्या होत्या. अंथरुणावर खिळून होत्या. पॅरालिसिसमुुळे त्यांना चालताही येत नव्हतं. अशा कठीण समयी जवळचा असा कुणीच नव्हता. नवराही थकलेला. अगदी तुकाराम आणि मंगला यांचीही स्टोरीही तशीच पण. यांच्या स्टोरीत एका मुलाची भर होती. उरलेलं आयुष्य मुलाच्या विरहानं काढण्याचं दु:ख माईला सहन झालं नाही. त्याचा ध्यास घेतला. वाटलं होतं, नातवाला, नातीला अंगा खांद्यावर खेळवीन. तिच्यासाठी तिने गोडद्याही स्वत:च्या हाताने शिवलेल्या. हातभार नको पण निदान आधार म्हणून तरी आपल्याजवळ त्यांनी रहावं, अशी तिची इच्छा होती. पण ती फोल ठरली. माईनं एक दिवस अखेरचा श्वास घेतला. मुलाला कळवलं. तो आलाही, सरणाभोवती फेरे मारून मडकं फोडलं. पण त्याच्या डोळ्यांत लहानपणीचंं ते प्रेम दिसत नव्हतं. क्रिया कर्म करून तो पुन्हा परतला. आता घरात एकटाच बाप राहत होता. प्रत्येक कोपर्यांत दडलेल्या आठवणींसोबत. माई असताना थोडा आधार तरी होता. पण आता…?? तो ही खचला होता.
तुकाराम आणि मंगलानं हे पाहिलं, आपल्याला मूलबाळ नाही, पण जगण्याची उमेद आणि दुसर्याला आनंद देण्याइतपत ताकद आहे. मुलगा असूनही माईनं खूप भोगलं. आपल्याला मूलबाळ नाही याची खंत या दिवसापासून त्यांनी मनातून काढून टाकली. एकमेकांची काठी पकडून ती जीवनात पुढे मार्गस्थ झाली. नाती कितीही वाईट असली तरीही ती तोडता कामा नये, कारण पाणी कितीही घाण असलं तरीही ते तहान नाही तर आग तर विझवू शकतं? तुकाराम आणि मंगलानं रात्री पेटवला. एक टक त्या दिव्याकडे बघत ती म्हणते, ‘अहो, आजकालची पोरां आवशी बापाशीक खय बघतंत? शेवटी काय, जसे इलू तसे आमका जावय व्होया, लगीन केल्यानी काय नाती विसारतत ते मग म्हातार्यांका वृद्धाश्रमात नाय तर वेगळं टाकतंत, त्यापेक्षा अशी पोरा नसलेली बरी.’ पुन्हा मंगल्यानं डोळे पुसले अन् झोपी गेली. उद्याचा सूर्य तिच्यासाठी वेगळ्या विचारांची किरणे घेऊन येणारा होता. उरलेलं आयुष्य आनंदात घालविण्यासाठी तिनं मनाची खूणगाठ बांधली होती.