वंदे मातरम’च्या वर्षभराच्या स्मरणोत्सवाचे उद्घाटन
प्रसिद्ध बंगाली लेखक बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेल्या ‘वंदे मातरम’ या देशभक्तीपर गीतापासून प्रेरणा मिळते असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. भारताच्या राष्ट्रीय गीताचा दर्जा मिळालेल्या ‘वंदे मातरम’ या गीताच्या 150 व्या वर्षभराच्या स्मरणोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी कला अकादमी येथे काल शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्य सचिव, डॉ. व्ही. कांदावेलू, कला आणि संस्कृती सचिव संतोष सुखदेवे, उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकित यादव, कला आणि संस्कृती संचालनालयाचे संचालक विवेक नाईक, सरकारी अधिकारी आणि इतर यावेळी उपस्थित होते.
आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी ‘वंदे मातरम’मधून प्रेरणा घेतली आणि देशासाठी आपले प्राण दिले. या गाण्यापासून प्रेरणा घ्यावी आणि ज्या देशाने आपल्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला त्याच्यासाठी जगावे. भारताच्या प्रगतीसाठी विकसित भारताच्या स्वप्नासाठी जगा. तरुणांसाठी अनेक संधी आहेत. राष्ट्राच्या स्वप्नांद्वारे तुमची स्वप्ने पूर्ण करा आणि राष्ट्रनिर्माते बना असे यावेळी पुढे बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी तरुणांना आवाहन केले.
पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी, आज पेडण्यापासून काणकोणपर्यंत सर्वांनी ‘वंदे मातरम’ हे गाणे गायले आहे, हे गाणे आपल्या देशाच्या हृदयाचे ठोके बनले असल्याचे सांगितले.
सुरवातीस सर्वांनी एकत्रितपणे ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रगीत गायले. कला अकादमीच्या कर्मचाऱ्यांनी देशभक्तीपर वाद्य गीते सादर केली. या प्रसंगी, बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या ‘आनंदमठ’ या कादंबरीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तद्नंतर नवी दिल्लीहून पंतप्रधान मोदी यांचे थेट भाषण दाखविण्यात आले.

