‘वंदे भारत’ रेल्वे 3 जूनपासून प्रवाशांच्या सेवेत

0
5

>> पंतप्रधान करणार उद्घाटन; 5 जूनपासून गोवा-मुंबई मार्गावर नियमित सेवेत

कोकण रेल्वे मार्गावरील पहिल्या वंदे भारत रेल्वेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. देशातील सर्वात जलदगतीने धावणारी ‘वंदे भारत’ ही कोकण मार्गावरील रेल्वे 3 जूनपासून सुरू होत असून, या गोवा-मुंबई वंदे भारत रेल्वेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ही रेल्वे 3 जून रोजी सकाळी 10.30 वाजता मडगावहून मुंबईकडे प्रयाण करेल. त्यानंतर, 5 जूनपासून ही गाडी प्रवाशांच्या नियमित सेवेसाठी दाखल होणार आहे.
यावेळी मडगाव रेल्वे स्थानकावर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि अन्य मान्यवर उपस्थित असतील.

भारतातील ही 19 वी वंदे भारत रेल्वे असून, कोकण मार्गावरून धावणारी ही पहिलीच रेल्वे ठरणार आहे. वंदे भारत रेल्वेचा वेग हा 180 किलोमीटर प्रतितास एवढा असून, या गतीने धावणाऱ्या या रेल्वेमुळे मडगाव ते मुंबई दरम्यानचा प्रवास सात ते साडेसात तासांत पूर्ण होणार आहे. या रेल्वेमुळे प्रवाशांचे चार तास वाचणार आहेत.
या रेल्वेला एकूण 8 डबे असून, ते सर्व वातानुकूलित असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. या रेल्वेचा थिवी स्थानकावरील थांबा निश्चित झालेला असल्याने प्रवाशांची सोय होणार आहे.

कुठे-कुठे मिळणार थांबा?
मडगाव-मुंबई सीएसएमटी वंदे भारत रेल्वे ही गोमंतकीय आणि कोकणवासियांना मोठा दिलासा देणारी ठरणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मडगाव, थिवी, कणकवली, रत्नागिरी, खेड, पनवेल, ठाणे, दादर, सीएसएमटी या स्थानकांवर वंदे भारत रेल्वे थांबेल. ही वंदे भारत रेल्वे आठवड्याला सहा दिवस चालवण्याचे सध्या नियोजन आहे. सीएसएमटीवरून सकाळी 5.35 ला ट्रेन सुटेल, तर मडगाव येथे दुपारी 1.15 वाजता वंदे भारत ट्रेन पोहोचेल. त्यानंतर लगेच मडगाववरुन तीच वंदे भारत दुपारी 2.35 वाजता मुंबईकडे रवाना होईल आणि रात्री 10.25 वाजता पोहोचेल.