>> गोवा-मुंबई मार्गावर पहिल्यांदाच सेवा; पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करणार रेल्वेचा शुभारंभ
गोवा-मुंबई मार्गावरील ‘वंदे भारत’ या वेगवान रेल्वेचा शुभारंभ सोमवार दि. 26 जून रोजी मडगाव रेल्वे स्थानकावरुन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या रेल्वेगाडीचा शुभारंभ करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन व अन्य मान्यवर, तसेच रेल्वे अधिकारी उपस्थित असतील.
या वंदे भारत रेल्वेचा 3 जून रोजी शुभारंभ होणार होता व त्यासाठीची सगळी तयारीही करण्यात आली होती. मात्र, ओडिशा येथे तीन रेल्वेंची धडक होऊन भीषण अपघातात शेकडो लोक मृत्यूमुखी पडल्याच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा रद्द करण्यात आला होता.
आता गोवा-मुंबई वंदे भारत रेल्वेबरोबरच बंगळुरू-हुबळी, पाटणा-रांची, भोपाळ-इंदूर व भोपाळ-जबलपूर या वंदे भारत रेल्वे गाड्यांचाही याच वेळी शुभारंभ करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच वेळी या सर्व वंदे भारत रेल्वे गाड्यांचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शुभारंभ करणार आहेत.