लोहिया मैदानाजवळ जलक्रांतीचा नारा

0
8

बिगर सरकारी संघटनांना विरोधकांचा पाठिंबा

गोवा क्रांती दिनाच्या मुहूर्तावर सेव्ह गोवा सेव्ह म्हादई या झेेंड्याखाली गोव्यातील विविध बिगर सरकारी संघटनांनी लोहिया मैदानाजवळ जलक्रांतीचा नारा दिला. यावेळी गोव्यातील नद्या, झरे, तलाव व पाण्याचे स्रोत टिकवणे व संवर्धन करण्याचा ठराव संमत करण्यात आला.

म्हादईसह राज्यातील सर्व नद्या टिकवून ठेवण्याबरोबरच त्यांचे पाणी कोठेही वळवू न देण्याचा निर्धार करण्यात आला. गोव्यातील पाण्याचे स्रोत टिकविणे तसेच डोंगर, वने, बागायती, शेती या जमिनीचा बदल करू देणार नाही. म्हादईचे पाणी वळविण्यासाठी दिलेला डीपीआर सरकारने रद्द करावा. म्हादई पाण्यासंबंधी स्थापन केलेल्या समित्या रद्द कराव्यात. गोवा सरकारने पाण्याच्या साठ्याचा अभ्यास करावा. म्हादईसंबंधी प्रमुख वन्यजीव वॉर्डनने नोटीस दिली आहे, ती नामंजूर करावी. सरकारने 17 (2) व 16 (ब) ही नगरनियोजन कायद्यातील कलमे रद्द करावीत अशा पाच मागण्या यावेळी करण्यात आल्या.

काल लोहिया मैदानालगत जाहीर सभा झाली. क्रांतीदिनी काल जलक्रांतीची घोषणा केली. त्यावेळी माजी मंत्री ॲलिना साल्ढाणा, प्रजल साखरदांडे, प्रतिमा कुतिन्हो, अभिजीत प्रभू देसाई, ॲड. हृदयनाथ मंगेशकर, विवेक गावडे, सांतान रॉड्रिग्स, शंकर पोळजी व इतरांची भाषणे झाली. सर्वजण रिकाम्या बादल्या, कळश्या, भांडी घेवून सभेला उपस्थित होते. यावेळी आपचे अध्यक्ष अमीत पालेकर, आमदार क्रुझ सिल्वा, ॲल्विस गोम्स आदी राजकीय नेते उपस्थित
होते.