लोह खनिजाची किंमत प्रचंड प्रमाणात घसरल्याने राज्यातील खाण व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे लोह खनिजावरील ३ टक्के निर्यात शुल्क मागे घेण्याची मागणी करणारी निवेदने खाण परिसरातील खाण अवलंबितांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना पाठविली आहेत.
निर्यात शुल्क प्रचंड असल्याने खाण व्यवसाय सुरू करणेही अडचणीचे झाले आहे. त्याचा परिणाम सर्वसामान्य खाण अवलंबितांवर होतो. हा व्यवसाय बंद असल्याने रोजगाराची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.किर्लपालचे सरपंच दीपक पावसकर, उत्तर गोवा टिप्पर ट्रक असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश देसाई यांनीही जेटली यांना पत्र पाठवून सध्याच्या परिस्थितीत नोंदणीकृत ५००० ट्रक मालकांना फायद्याचा रोजगार गमावण्याची पाळी येईल व त्याचा समाजावर अनिष्ठ परिणम होईल, असा इशारा दिला आहे. दक्षिण गोवा प्रोग्रेसिव्ह ट्रक मालक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश देसाई यांनी पाठविलेल्या पत्रात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिजाच्या किंमती घटल्याने कंपन्यांसाठी खाण व्यवसाय नुकसानीचा ठरत आहे आणि वाढलेल्या निर्यात शुल्काचा त्यावर आणखी परिणाम होईल, असे म्हटले आहे. मुरगाव शिप एजंटस, असोसिएशन, गोवा कस्टम हाऊस एजंटस असोसिएशनचे उसगाव ट्रकमालक संघटना, तेजा ट्रान्स्पोर्टस् अविलिओ ट्रान्स्पोर्टस्, जय मल्हार मरिन सर्व्हिसेस, कन्ट्राकी लेबर ग्रुपस आदी अनेक संघटनांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्रे पाठवून खनिज निर्यातीसाठी पोषक वातावरण तयार करण्याची मागणी केली आहे.