>> मुख्यमंत्र्यांची यशस्वी शिष्टाई
>> संयम बाळगण्याची सूचना
उपसभापती मायकल लोबो आणि नगरविकासमंत्री तथा म्हापशाचे आमदार फ्रान्सिस डिसोझा यांच्यामध्ये शिगेला पोचलेला वाद काल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या शिष्टाईमुळे तूर्त मिटला. लोबो व फ्रान्सिस यांच्यातील वादावर तोडगा काढण्यासाठी पर्वरी येथील विधानसभा संकुलातील कार्यालयात दुसरी संयुक्त बैठक घेऊन वाद मिटवला. पर्रीकरांनी दोघांनाही संयम बाळगण्याची सूचना केली असून एकमेकांविरोधात काहीही बोलू नये असे सूचित केले आहे. कुठल्याही प्रकारची तक्रार असल्यास आपल्याकडे किंवा भाजपच्या गाभा समितीकडे करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
भाजपचे सरचिटणीस सदानंद शेट तानावडे व भाजप गाभा समितीच्या काही पदाधिकार्यांच्या उपस्थित मुख्यमंत्री पर्रीकर यांनी ज्येष्ठ मंत्री डिसोझा आणि उपसभापती लोबो यांच्याशी चर्चा केली. भाजपच्या नेत्यांमध्ये वादविवाद होणे योग्य नाही. त्यामुळे यापुढे वादविवाद करू नका. काही तक्रार, अडचणी असल्यास आपल्यापाशी किंवा भाजपच्या कोअर समितीकडे करा, अशी सूचना मुख्यमंत्री पर्रीकर यांनी केली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
नगरविकासमंत्री फ्रान्सिस डिसोझा आणि भाजपचे आमदार तथा उपसभापती मायकल लोबो यांच्यातील वाद गेले कित्येक दिवस चर्चेचा विषय बनला होता. दोन्ही नेत्यांतील शाब्दिक वादाने गंभीर वळण घेतल्याने भाजपच्या गाभा समितीला या वादाची गंभीर दखल घ्यावी लागली. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी दोन दिवसांपूर्वी मंत्री डिसोझा यांच्याशी या विषयावर चर्चा केली होती. तसेच उपसभापती लोबो यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून आरोप न करण्याची सूचना केली होती. या वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री पर्रीकर यांना पुढाकार घ्यावा लागला.
लोबोंनी पुन्हा आरोप केल्यास
गप्प बसणार नाही : फ्रान्सिस
आपण कुठल्याही प्रकारच्या वादाला सुरुवात केली नव्हती. फक्त माझ्या विरोधात केलेल्या वक्तव्याला उत्तर देण्याचे काम केले. लोबो यांनी पुन्हा आरोप केल्यास आपणाला बोलावे लागणार आहे, असे मंत्री डिसोझा यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. आमदार लोबो यांना काय सांगायचे ते सांगतो. पण, तू काही बोलायचे नाही, अशी सूचना मुख्यमंत्री पर्रीकर यांनी मला केली आहे. मी कुठल्याही विषयावर कधी बोलत नाही. लोबो यांनी वादाला सुरुवात केल्याने त्यांना उत्तर देण्यासाठी बोलावे लागले, असे डिसोझा यांनी सांगितले. कळंगुट मतदारसंघातील अमलीपदार्थ व इतर विषयांबाबत लोकांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. लोबो म्हापसा मतदारसंघात हस्तक्षेप करू पाहत आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना सर्व काही शक्य आहे, असे मंत्री डिसोझा म्हणाले.
म्हापशातील लोकांच्या भावना
उघडपणे व्यक्त केल्या : लोबो
आपण नगरविकासमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्याविरोधात नाही. त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचे वैयक्तिक मतभेद, हेवेदावे नाहीत. डिसोझा हे ज्येष्ठ नेते असून त्यांच्याबाबत आदराची भावना आहे. आपण केवळ म्हापशातील लोकांच्या मनातील भावना उघडपणे व्यक्त केली, असे आमदार मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना काल सांगितले.
टीकेकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे. माझ्यावर अनेकांकडून विविध विषयावरून टिका केली जाते. सकारात्मक दृष्टिकोनातून टीकेकडे पाहतो आणि त्यात सुधारणा करण्यासाठी कृती करतो. कळंगुट मतदारसंघात अमलीपदार्थ, वेश्याव्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा आरोप केला जातो. त्यामुळे आपणाला पोलीस यंत्रणेवर दबाव आणून कार्यरत राहण्याची सूचना करावी लागते. पोलिसांकडून अमलीपदार्थ, वेश्याव्यवसायात गुंतलेलेल्यावर कारवाई केली जात आहे, असेही लोबो यांनी सांगितले.
आपणाला मंत्रिपदाची हाव नाही. मंत्रिपद मिळविण्यासाठी टिका केलेली नाही. सध्या आपणाला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देण्यात आलेला आहे, असेही लोबो यांनी सांगितले.