जुने गोवा येथे कॉंग्रेसचे नेते, माजी मंत्री मायकल लोबो यांना पत्रकार परिषद घेण्यापासून रोखण्याचा प्रयत्न मतदारसंघ निवडणूक निरीक्षकांनी काल केला. यावेळी लोबो यांनी, कॉंग्रेस पक्ष सर्व नियमांचे पालन करून पत्रकार परिषद घेत आहे. सर्वत्र पत्रकार परिषदा घेतल्या जात आहेत, असे मतदारसंघाच्या निवडणूक निरीक्षकांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर मतदारसंघ निरीक्षकांनी वरिष्ठ अधिकार्यांशी संपर्क साधून यासंबंधी माहिती दिली.
त्यानंतर कॉंग्रेसचे लोबो यांना पत्रकार परिषद घेण्यास मान्यता देण्यात आली.
कुंभारजुवा मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार राजेश फळदेसाई यांच्या घरोघरी प्रचाराला कॉंग्रेसचे नेते लोबो यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. यानिमित्त एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विशाल वळवईकर यांची उपस्थिती होती.
जुने गोवे येथील कॉंग्रेसच्या घरोघरी प्रचाराला लोबो उपस्थित राहणार असल्याने त्यांना प्रचारापासून रोखण्यासाठी पणजीत बसून सूत्रे हालविणार्या गोंयच्या बॉसचे हे कारस्थान आहे, असा आरोप लोबो यांनी केला. भाजपच्या निवडणूक प्रचाराला कोविड नियमावली लागत नाही मात्र विरोधकांना लागते, अशी टीका लोबो यांनी केली.