विघ्नहर्ता श्रीगणेशाच्या उत्सवाच्या काळात ‘कोरोना’ या विषयावर काही लिहिणे आम्ही टाळले, परंतु आता लिहिणे भाग आहे. लोकांना गणेश चतुर्थी फेब्रुवारीत साजरी करा असे सांगणारे नेते स्वतः मात्र गणपतीपुढे उभे दिसले. दिवसागणिक वाढती रुग्णसंख्या, वाढते मृत्यू हे तर सुरू आहेच, परंतु सर्वांत खेदजनक बाब म्हणजे सर्वसामान्य कोरोनाबाधित जनता सरकारच्या आरोग्य यंत्रणेवर भाबडा भरवसा ठेवून सरकारी इस्पितळांमध्ये धाव घेत असताना राज्यातील यच्चयावत राजकीय नेते मात्र स्वतःचा ‘व्हीआयपी’ दर्जा मिरवत खासगी इस्पितळात उपचार घेताना दिसत आहेत. सर्वांत संतापजनक बाब म्हणजे राज्याचे नुकतेच कोरोनाग्रस्त झालेले आरोग्य संचालक देखील सरकारी यंत्रणेला टाळून खासगी इस्पितळात स्वतःवर उपचार घेत आहेत! कोणी कोठे उपचार घ्यावेत हा सर्वस्वी त्यांचा वैयक्तिक अधिकार जरी असला, तरी सरकारच्या आरोग्य व्यवस्थेवर नेत्यांचा आणि दस्तुरखुद्द आरोग्य संचालकांचाच विश्वास नाही हेच यातून सिद्ध होत नाही काय? स्वतः कोरोनाग्रस्त होताच खासगी इस्पितळाला जवळ करणार्या या नेत्यांनी सरकारी आरोग्य यंत्रणेवरील अविश्वासच आपल्या या कृतीतून व्यक्त केलेला आहे. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, आमदार सुदिन ढवळीकर, चर्चिल आलेमाव, अशी नेत्यांची रांग सरकारी उपचार घेणे टाळून दोनापावलाच्या खासगी इस्पितळाकडे का वळली? सरकारची आरोग्य यंत्रणा आरोग्यमंत्री विश्वजित राणे सदैव सांगत असतात त्याप्रमाणे खरोखरच सक्षम आणि सक्रिय असेल तर या नेत्यांनी सरकारी इस्पितळात दाखल होणे नक्कीच पसंत केले असते. ज्या अर्थी स्वतः कोरोनाबाधित होताच आरोग्य संचालक देखील खासगी इस्पितळ जवळ करतात, त्याचाच अर्थ आरोग्य यंत्रणा कोरोनावरील उपचारांतच नव्हे, तर रुग्ण व्यवस्थापनामध्ये देखील अपयशी ठरलेली आहे असा अविश्वास सामान्यजनांच्या सोडाच, खुद्द उच्चपदस्थांच्या मनामध्ये देखील निर्माण झालेला आहे असा त्याचा अर्थ निघतो.
केंद्रीय मंत्री श्री. नाईक यांच्या देखभालीसाठी खास दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या डॉक्टरांचे पथक दोन वेळा गोव्यात दाखल झाले. श्री. नाईक हे संरक्षण राज्यमंत्रीही असल्याने लष्कराचे तज्ज्ञ डॉक्टरही त्यांच्यासाठी धावून आले. श्रीपादभाऊ लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी आम्ही त्यांच्यासाठी नक्कीच कामना करतो, परंतु अतिमहनीय व्यक्तींवरील उपचारांसाठी ही तज्ज्ञ डॉक्टरांची खास व्यवस्था केली जात असताना सर्वसामान्य जनतेच्या प्राणांची चिंताही सरकारने करायला नको काय? दिवसाला जे आठ नऊ बळी रोज जात आहेत, त्यांचे दिल्लीतील उच्चपदस्थांशी काही नाते नाही म्हणून त्यांनी मुकाट किड्यामुंग्यांप्रमाणे मरावे?
राज्यात कोरोनाने आठ – नऊ बळी रोज जात आहेत. सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या ३१ जुलैपर्यंत राज्यामध्ये एकूण रुग्ण ५९१३ होते, तर वर्तमान रुग्णसंख्या ३४४५ होती. ४५ लोकांचा मृत्यू ओढवला होता. काल २८ ऑगस्टपर्यंतचा गेल्या २८ दिवसांचा लेखाजोखा मांडला तर एकूण रुग्णसंख्या ५९१३ वरून दुपटीहून अधिक म्हणजे तब्बल सोळा हजारांवर गेली आहे. मृत्यूसंख्या ४५ वरून तिपटीहून अधिक १७५ वर गेली आहे. या महिन्यात पहिल्या पंधरवड्यात कोरोनाने ५३ बळी घेतले, तर नंतरच्या १२ दिवसांत ७७ बळी गेले. म्हणजे गेल्या २८ दिवसांत १३० जणांचा राज्यात कोरोनाने घास घेतला. ही आकडेवारी सरळसोटपणे आणि प्रामाणिकपणे जनतेसमोर मांडली तर तुम्ही लोकांना घाबरवताय असे सांगायला नेत्यांचे हुजरे पुढे होतात! हे जे बळी गेले आहेत, त्यांना जर वाचा फुटली तर आरोग्य यंत्रणेच्या बेफिकिरीच्या आणि अनागोंदीच्या अनेक कहाण्या पुढे आल्यावाचून राहणार नाहीत. हॉस्पिसियोमध्ये मृत पावलेल्या रुग्णाच्या मुलाला कोणत्या दिव्यातून जावे लागले हे ताजे उदाहरण तर समोर आहेच.
सध्या दिवसागणिक कोरोनाची नवी रुग्णसंख्या पाचशेचा उंबरा गाठते आहे. पाचशे ही संख्या जास्त दिसेल म्हणून की काय, काही अहवाल प्रलंबित दाखवून ४९७, ४५६, असे पाचशेच्या खालचे आकडे येतील याची तजवीज केली जाताना दिसते. आता तेही जमेनासे झालेले आहे. पण आकड्यांचा हा खेळ राज्यात कोरोनाने जनतेच्या प्राणांशी मांडलेला खेळ लपवू शकणार नाही. उगाच सारे काही आलबेल असल्याचे भासवून स्वतःचेच हसे करून न घेता सरकारने राज्यात कोरोनाने मृत्यूचे प्रमाण वाढले आहे हे मुकाट मान्य करून त्याची कारणे गांभीर्याने शोधावीत. त्यासाठी बाहेरील वैद्यकीय तज्ज्ञांची मदत घ्यावी. कोरोनाचा हाताबाहेर गेलेला फैलाव रोखण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत. जनतेला दिलासा द्यावा, तिला आज आरोग्ययंत्रणेप्रती विश्वासाची गरज आहे. व्हीआयपींचे प्राण मोलाचे आहेतच, परंतु आम गोमंतकीयांचे प्राणही स्वस्त नाहीत!