>> पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक, तर बिहारमध्ये सर्वात कमी मतदान
लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्याा टप्प्यातील मतदान काल पार पडले. पहिल्या टप्प्यात 60 टक्के मतदानाची नोंद झाली. या टप्प्यात 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 जागांवर मतदान झाले. यापैकी पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक, तर बिहारमध्ये सर्वात कमी मतदान नोंदविले गेले. 102 मतदारसंघांमध्ये सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. काही घटना वगळता मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत पार पडली. तसेच काल अरुणाचल प्रदेशच्या 60 आणि सिक्किमच्या 32 विधानसभा मतदारसंघातही मतदान पार पडले.
18 व्या लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यात 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 जागांसाठी मतदान पूर्ण झाले. 7 पैकी पहिल्या टप्प्यातच सर्वाधिक जागा आहेत. जागांच्या दृष्टीने हा सर्वात मोठा टप्पा होता.
सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये झाले असून 77.57 टक्के मतदान झाले आहे. दुसरा क्रमांक त्रिपुरा राज्याचा असून 76.10 टक्के मतदान झाले आहे. बिहारमध्ये सर्वात कमी 47.49 टक्के मतदान झाले.
2019 मध्ये लोकसभेच्या या 102 जागांपैकी भाजपने 40, द्रमुकने 24 आणि काँग्रेसने 15 जागा जिंकल्या होत्या. इतरांना 23 जागा मिळाल्या होत्या. या टप्प्यात बहुतांश जागांसाठी या तीन पक्षांमध्ये लढत आहे.
पहिल्या टप्प्यात 1,625 उमेदवार निवडणूक रिंगणात होते, त्यामध्ये 1,491 पुरुष आणि 134 महिला उमेदवारांचा समावेश होता. त्यात 8 केंद्रीय मंत्री, 2 माजी मुख्यमंत्री आणि एका माजी राज्यपालांचाही समावेश होता.
मतदानाला सुरुवात झाल्यानंतर सायंकाळी 5 वाजेपर्यंत पश्चिम बंगाल, त्रिपुरा ते मेघालयपर्यंत चांगले मतदान झाले. त्याचवेळी उत्तरप्रदेश आणि मध्य प्रदेशातील मतदारांमध्येही उत्साह दिसून आला.
पहिल्या टप्प्यात अरुणाचल प्रदेशमधील 2, आसाम5, बिहार4, छत्तीसगड1, मध्यप्रदेश 6, महाराष्ट्र 5, मणिपूर2, मेघालय 2, मिझोराम1, नागालँड 1, राजस्थान 12, सिक्कीम1, तामिळनाडू 39, उत्तरप्रदेश 8, उत्तराखंड 5, पश्चिम बंगाल 3, अंदमान-निकोबार 1, जम्मू-काश्मीर 1, लक्षद्वीप 1, पुदुचेरी 1 या जागांवर मतदान झाले.
दुसऱ्या टप्प्यातील
मतदान 26 एप्रिलला
दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिल रोजी होणार आहे. एकूण 7 टप्प्यांत 543 जागांसाठी मतदान प्रक्रिया संपन्न होणार आहे. सर्व जागांचे निकाल 4 जूनला जाहीर होणार आहेत.