‘नियोजित आक्रमकता’ असल्याचा भाजपचा आरोप
राहुल गांधींच्या बाबतीत दुर्मीळ अशी घटना काल लोकसभेत घडली. देशातील वाढत्या धार्मिक हिंसाचारावर प्रश्नोत्तराचा तास रद्द करून चर्चा करावी या मागणीसाठी कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अन्य कॉंग्रेस खासदारांसोबत लोकसभेच्या हौद्यात (सभापतीसमोरील जागेत) उतरून गदारोळ केला. राहुल यांनी यावेळी सभापती सुमित्रा महाजन यांच्यावर आरोप करताना त्या सरकारचीच बाजू घेत असल्याचा आरोपही केला.
राहुल गांधी अशा तरेने आक्रमक दिसण्याची ही गेल्या दहा वर्षांतील पहिलीच वेळ असावी. भाजपने हा प्रकार म्हणजे ‘नियोजित आक्रमकता’ असल्याचा आरोप केला. विशेष म्हणजे हे सर्व घडताना कॉंग्रेस अध्यक्ष व राहुलच्या मातोश्री सोनिया गांधी समोरच्या बाकावर शांतपणे बसून होत्या. काल सभागृह भरले तेव्हा कॉंग्रेसने प्रश्नोत्तराचा तास रद्द करून धार्मिक हिंसाचारावर चर्चेची मागणी सुरू केली. संसदीय व्यवहार मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी या ठरावाला विरोध करताना देशात कसलाच तणाव नसल्याचे सांगितले. त्यावर खवळलेल्या कॉंग्रेस खासदारांनी सरकारविरुद्ध घोषणाबाजी सुरू केली. यावेळी राहुल गांधीही त्यांच्यात सामील झाले व घोषणा देत हौद्यात उतरले. दरम्यान, या प्रकारानंतरही छोट्याशा स्थगितीनंतर प्रश्नोत्तराचा तास सुरळीत झाला. मात्र राहुल गांधी यांनी लगेच सभागृहाबाहेर जाऊन पत्रकारांशी बोलताना सांगितले की, संसदेत विरोधकांना बोलू दिले जात नसून एकतर्फी व्यवहार चालू आहे. हे सरकार चर्चेच्या मनस्थितीचे नसल्याचे ते म्हणाले. सभापतीची निपक्षपाती नसून त्यांच्याचबाजूच्या आहेत, असे ते म्हणाले. सभापती महाजन यांनी आरोप फेटाळून लावताना सर्व पक्षांना व सदस्यांना समान संधी दिली जात असल्याचे सांगितले. पत्र कोणी आरोपच करायचे ठरवले असेल तर त्याला इलाज नसल्याचे त्या म्हणाल्या. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, ही सर्व आक्रमकता दाखवण्यासाठी व नियोजित होती. नेतृत्वासाठी असमर्थपणाचा आरोप होऊ लागल्यामुळे हे असे करावे लागल्याचे ते म्हणाले. कॉंग्रेस पक्षात घराण्याचे बंड चालू असल्याचा टोमणा त्यांनी मारला. कॉंग्रेसचे काही नेते बोलतच नाहीत व असेही म्हणतात की त्यांना बोलू दिले जात नाही.