>> आज अर्जांची छाननी; सोमवारी अर्ज माघारीचा दिवस
राज्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याच्या मुदतीत एकूण 33 अर्ज दाखल झाले.
उत्तर गोवा मतदारसंघातून 10 उमेदवारांनी 16 उमेदवारी अर्ज आणि दक्षिण गोवा मतदारसंघातून 10 उमेदवारांनी 17 उमेदवारी अर्ज सादर केले. शनिवार दि. 20 एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार असून, 22 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेतले जाऊ शकतात.
राज्यातील दोन्ही मतदारसंघांत 12 ते 19 एप्रिल या काळात उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले. उत्तर गोवा मतदारसंघातून भाजपचे श्रीपाद नाईक, प्रेमेंद्र शेट (डमी) काँग्रेसचे रमाकांत खलप, आश्विन खलप (डमी), आरजीपीचे तुकाराम परब, अखिल भारतीय परिवार पक्षाचे सखाराम नाईक, अपक्ष विशाल नाईक, अपक्ष थॉमस फर्नांडिस, बहुजन समाज पक्षाच्या मिलन वायंगणकर, अपक्ष शकील जमाल शेख यांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत.
दक्षिण गोवा मतदारसंघातून भाजपच्या सौ. पल्लवी श्रीनिवास धेंपो, डॉ. गणेश गावकर (डमी), काँग्रेसचे विरियातो फर्नांडिस, अनिता फर्नांडिस (डमी), आरजीपीचे रुबर्ट परेरा, अपक्ष डॉ. कालिदास वायंगणकर, अपक्ष आलेक्सी फर्नांडिस, बहुजन समाज पार्टीच्या डॉ. स्वेता गावकर, भ्रष्टाचार निर्मूलन पक्षाचे हरिश्चंद्र सुधाकर नाईक, अपक्ष दीपकुमार डी. मापारी यांनी उमेदवारी अर्ज सादर केले.
दक्षिण गोव्यातून आणखी तीन अर्ज
काल दक्षिण गोवा लोकसभा निवडणुकीत तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यात 1 अपक्ष उमेदवार आणि भ्रष्टाचार निर्मूलन पक्षाचा 1 आणि बहुजन समाजवादी पक्षाच्या एका उमेदवाराचा समावेश आहे. बहुजन समाजवादी पक्षाच्या स्वेता गावकर (रा. बेतोडा, फोंडा), भ्रष्टाचार निर्मूलन पक्षातर्फे हरिश्चंद्र नाईक आणि दीपककुमार दशरथ मापारी यांनी अपक्ष म्हणून दक्षिण गोवा निर्वाचन अधिकारी आश्विन चंद्रू यांच्याकडे अर्ज सादर केले. आतापर्यंत भाजप, काँग्रेस, आरजीपी, बहुजन समाज पक्ष, भ्रष्टाचार निर्मूलन पक्ष आणि अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.