>> उद्या छाननी, अर्ज मागे घेण्याची तारीख ८ एप्रिल
लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या तीन पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी गुरुवार ४ एप्रिल ही अंतिम तारीख आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी ४ रोजी जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी नारायण सावंत यांनी काल दिली.
गेल्या २८ मार्चपासून लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ करण्यात आला होता. निवडणूक अधिकार्यांकडून ५ रोजी उमेदवारी अर्जाची छाननी केली जाणार आहे. तसेच ८ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेतले जाऊ शकतात, असेही सावंत यांनी सांगितले.
निरीक्षकांची नियुक्ती
लोकसभेच्या उत्तर आणि दक्षिण या दोन्ही मतदारसंघातील निवडणूक कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी चार निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच निवडणूक खर्चाची तपासणीसाठी दोन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीच्या काळातील कायदा व सुव्यवस्थेवर देखरेख ठेवण्यासाठी आयपीएस दर्जाच्या पोलीस अधिकार्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती सावंत यांनी दिली.
गोवा विधानसभेच्या मांद्रे, म्हापसा आणि शिरोडा या तीन मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी प्रत्येकी एका निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर देखरेख ठेवण्यासाठी एका निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयोगाने देखरेख निरीक्षकपदी आयएएस दर्जाच्या अधिकार्यांची नियुक्ती केली आहे, असेही सावंत यांनी सांगितले.
येत्या २३ एप्रिल रोजी होणार्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी आज गुरुवार दि. ४ एप्रिल रोजी जाहीर केली जाणार आहे. यापूर्वी जानेवारी २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी नवीन मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. या मतदार यादीत नवीन नावांचा समावेश करून अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारूची दुकाने रात्री ११ वाजता बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे.