लोकसभा निवडणुकांचे पडघम आणि गोवा

0
32
  • बबन भगत

सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. सत्ताधारी भाजप, तसेच प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेससह देशभरातील सगळेच पक्ष आता निवडणुकीच्या तयारीला लागले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. एकदा निवडणुकांसाठीची अधिसूचना आली आणि विविध पक्षांच्या उमेदवारांची नावे जाहीर झाली की खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या प्रचाराचे वारे जोर धरणार आहे. त्यादृष्टीने गोव्यातही हालचालींना वेग आला आहे.

येत्या पंधरा दिवसांत लोकसभा निवडणुकांसाठीची अधिसूचना येण्याची अपेक्षा असून या पार्श्वभूमीवर सध्या देशभरात या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. सत्ताधारी भाजप, तसेच प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेससह देशभरातील सगळेच पक्ष आता निवडणुकीच्या तयारीला लागले असल्याचे चित्र देशभरात पाहावयास मिळत आहे.

डबल इंजिनचे सरकार असलेल्या गोव्यातील भाजपने तर आपले काम जोमाने सुरू केले आहे. निवडणुकांची अधिसूचना येण्यापूर्वीच गेल्या जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मडगाव येथे ‘विकसित भारत, विकसित गोवा’ असे नामकरण केलेली जाहीर सभा संपन्न झाल्याने गोव्यातील भाजप गोटात उत्साहाचे वातावरण आहे. शिवाय भाजपने अयोध्या येथील राम मंदिरात गेल्या 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा समारोहाचे आयोजन करून एकप्रकारे निवडणूक प्रचाराचा षटकारच मारलेला आहे.
गोव्यातील भाजप सरकारने सतत मतदारांच्या गाठीभेटी घेणे चालूच ठेवले असून त्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा जणू धडाकाच लावलेला आहे. भाजपचे ‘गाव चलो अभियान’ संपन्न झाले असून त्यानंतर 27 फेब्रुवारी ते 1 मार्च या दरम्यान त्यांचे ‘पंचायत चलो अभियान’ही संपन्न झाले. या अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व त्यांच्या मंत्रिगणांनी पंचायती व नगरपालिका क्षेत्रांना भेट देऊन तेथील लोकांशी संवाद साधला. येथील कार्यकर्त्यांच्या घरी सकाळचा नाश्ता तसेच दुपारचे व रात्रीचे जेवण घेतले.
याशिवाय गोवा सरकारने ‘सरकार तुमच्या दारी’ या योजनेंतर्गतही लोकांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न बऱ्याच पूर्वी केलेला आहे.

आता लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील भाजप सरकारने उत्तर व दक्षिण अशा दोन्ही लोकसभा मतदारसंघांत आपली निवडणूक कार्यालये थाटली असून निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकण्यासाठी सर्व ती तयारी सुरू केली आहे. त्याशिवाय दोन्ही मतदारसंघांसाठी उमेदवार निवडण्यासाठीची प्रक्रियाही हाती घेतली आहे. उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी पक्षाचे केंद्रीय नेते श्रीपाद नाईक यांनाच मिळेल हे जवळजवळ निश्चित आहे. पण तसे असले तरी पक्षाने आपल्या आणखी तीन नेत्यांची निवड करून श्रीपाद नाईक यांच्यासह चार नावे पक्षाच्या संसदीय मंडळाकडे पाठविली आहेत.
दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने मडगावचे आमदार दिगंबर कामत, काणकोणचे आमदार आणि सभापती रमेश तवडकर, केपे मतदारसंघाचे माजी आमदार आणि माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, दक्षिण गोव्याचे माजी खासदार नरेंद्र सावईकर, फातोर्डा मतदारसंघाचे माजी आमदार दामू नाईक यांची नावे पक्षाच्या संसदीय मंडळाकडे पाठवून दिली असून त्यातील एका नेत्याची दक्षिण गोवा मतदारसंघासाठीचा उमेदवार म्हणून निवड होणार आहे. दिगंबर कामत व रमेश तवडकर यांनी आपणाला लोकसभा निवडणूक लढवण्यास रस नसल्याचे स्पष्ट केले आहे, तर बाबू कवळेकर, दामू नाईक व नरेंद्र सावईकर हे तिघेही निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. या त्रयींपैकी बाबू कवळेकर यांनी तर दक्षिण गोव्यासाठीची उमेदवारीची माळ आपल्याच गळ्यात पडावी यासाठी मागचे सुमारे दोन-तीन महिने मोठ्या प्रमाणात आपले शक्तिप्रदर्शन घडवून आणले होते. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने ते आता केंद्रीय राजकारणात जाऊन आपले अस्तित्व टिकवून ठेवू पाहत आहेत. नरेंद्र सावईकर हे माजी खासदार व उच्चशिक्षित असे नेते असून त्यांना केंद्रीय राजकारणात रस आहे, आणि आपणाला ही उमेदवारी मिळावी यासाठी ते प्रयत्नरत आहेत. दामू नाईक यांचेही नाव संभाव्य उमेदवारांच्या यादीत असले तरी त्यांना ही उमेदवारी मिळण्याची शक्यता सध्या कमीच दिसत आहे, आणि त्यांनाही याची जाणीव आहे.
भाजपने दक्षिण गोव्यात आता आपली पाळेमुळे रुजवली असली तरी दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. दक्षिणेत केवळ दोनच वेळा भाजपला विजय मिळवता आला आहे. 1999 साली भाजपचे उमेदवार रमाकांत आंगले व 2014 साली भाजपचे उमेदवार नरेंद्र सावईकर हे दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. या दोन निवडणुका सोडल्यास भाजपला दक्षिण गोव्यात विजय मिळवता आलेला नाही. पण 2009 सालीही नरेंद्र सावईकर यांनी दक्षिण गोव्यातून काँग्रेसचे उमेदवार फ्रान्सिस सार्दिन यांना चांगली टक्कर दिली होती. त्या निवडणुकीत भाजपचा अवघ्या साडेबारा हजार मतांनी पराभव झाला होता. आणि त्यापुढील निवडणुकीत म्हणजेच 2014 साली नरेंद्र सावईकर यांनी काँग्रेसचे उमेदवार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांचा 32 हजारांवर मतांनी आघाडी घेऊन पराभव केला होता. मात्र, पुढील म्हणजेच 2019 सालच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार फ्रान्सिस सार्दिन यांनी सावईकर यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत मगो पक्षाने भाजपची साथ सोडून काँग्रेसला आपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे काँग्रेस पक्षाचा विजय सुकर झाला होता, ही बाब लक्षात घ्यावी लागेल. यावेळी परत मगो पक्षाने भाजपशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे ही जागा- मतांच्या कमी आघाडीने का होईना- जिंकण्यासाठी काँग्रेसला जीवाचे रान करावे लागणार आहे. मात्र, तसे असले तरी काँग्रेससाठीही यावेळी एक जमेची बाजू आहे. मागच्या निवडणुकीत आम आदमी पार्टी काँग्रेसबरोबर नव्हती, आणि त्यावेळी स्वतंत्रपणे निवडणूक लढवलेल्या आम आदमी पार्टीला दक्षिण गोव्यात 20,891 मते मिळाली होती. एल्विस गोम्स हे तेव्हा आम आदमी पार्टीचे उमेदवार होते. आता आम आदमी पार्टी केंद्रातील काँग्रेस नेतृत्वाखालील ‘इंडिया अलायन्स’ आघाडीमध्ये सामील झाली असल्याने आणि गोव्यातील दोन्ही जागा काँग्रेसला मिळालेल्या असल्याने आम आदमी पार्टी काँग्रेसच्या पाठीशी राहणार असून त्यांची सगळे मते ही काँग्रेसला मिळणार आहेत. एका बाजूने भाजपच्या पाठीशी मगो व काँग्रेसच्या पाठीशी आम आदमी पार्टी असे समीकरण झालेले असल्याने दक्षिण गोव्यातील लोकसभा निवडणूक ही खूपच रंगतदार व अटीतटीची होईल असे दिसत आहे. फोंडा, मडकई व शिरोडा या फोंडा तालुक्यातील तीन मतदारसंघांत मगोचा बऱ्यापैकी प्रभाव असल्याने त्याचा फायदा यावेळी भाजपला मिळणार आहे. यंदा दक्षिण गोव्यात भाजपचा उमेदवार कोण असेल त्यानुसारही समीकरणे बदलणार आहेत, असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.
उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघ असो अथवा दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ असो- सत्ताधारी भाजपच्या तुलनेत प्रचाराच्या बाबतीत या दोन्ही मतदारसंघांत काँग्रेस पक्षाची खूप पीछेहाट झालेली आहे हे कुणीही मान्य करील. गोव्यात काँग्रेस पक्षामध्ये असलेली गटबाजी ही पक्षासाठी धोक्याची ठरू लागली आहे. अशातच गेल्या दोन-तीन वर्षांत फुटीर आमदारांनी काँग्रेस पक्षाला भगदाड पाडले आहे ते वेगळेच. विधानसभेत तर काँग्रेस पक्षाचे सध्या इन मीन तीन आमदारच असून परिणामी विरोधक म्हणून त्यांचा आवाज क्षीण झालेला आहे. या परिस्थितीत या निवडणुकीत काँग्रेस पक्ष आपली रणनीती कशी ठरवतो व प्रचाराच्या बाबतीत भाजपला तोडीस तोड कसे उत्तर देतो ते पाहावे लागेल.

उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघाविषयी बोलायचे झाल्यास हा मतदारसंघ भाजपचा एक मोठा बालेकिल्ला आहे, आणि सतत चार लोकसभा निवडणुकांत या मतदारसंघातून भाजपचे एक प्रबळ असे नेते श्रीपाद नाईक हे विजयी झालेले आहेत. उत्तर गोव्यात भाजपच्या कार्यकर्त्यांची एक मोठी फौज आहे. शिवाय त्या मतदारसंघातून निवडून येणारे त्यांचे नेते श्रीपाद नाईक हे एक अत्यंत लोकप्रिय असे नेते आहेत. चारित्र्यवान राजकीय नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. मृदुभाषी श्रीपाद नाईक हे तेथील जनमानसात ‘भाऊ’ म्हणून ओळखले जातात. भंडारी समाजातील नेते असलेल्या भाऊंचा स्वतःचा असा एक मोठा चाहतावर्गही त्यांच्या मतदारसंघात आहे. त्यामुळे यंदाही उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात भाजपची उमेदवारी ही भाऊंनाच मिळेल असे दिसते. पक्ष त्यांना उमेदवारी न देण्याची चूक करणार नाही असे दबल्या आवाजात का होईना, भाजपचे नेते बोलताना दिसत आहेत. भाऊंना उमेदवारी मिळू नये असे जर कुणाला वाटत असेल तर ते काँग्रेस नेत्यांना. कारण श्रीपाद भाऊंना भाजपची उमेदवारी मिळाल्यास त्यांचा पराभव करणे हे काँग्रेस पक्षासाठी एक मोठे आव्हान ठरणार आहे याची काँग्रेसजनांना जाणीव आहे. भाऊंच्या तुलनेत उत्तर गोवा मतदारसंघात भाजपचे अन्य संभाव्य उमेदवार असलेले दिलीप परुळेकर, दयानंद सोपटे व दयानंद मांद्रेकर हे अगदीच कमजोर असे उमेदवार आहेत याची भाजपला जाणीव आहे.
काँग्रेसमधून उत्तर गोव्यासाठी माजी केंद्रीय मंत्री ॲड्. रमाकांत खलप, विजय भिके, राजन घाटे व महेश महांबरे आदी नावे उमेदवारीसाठी पाठवण्यात आलेली असली तरी दिल्लीत रमाकांत खलप व विजय भिके ही दोन नावे ‘शॉर्टलिस्ट’ करण्यात आली असल्याचे काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले. खलप हे माजी खासदार व ज्येष्ठ काँग्रेस नेते असल्याने त्यांना ही उमेदवारी मिळण्याची शक्यता जास्त आहे. शिवाय श्रीपाद नाईक यांच्याविरुद्ध उत्तरेतून निवडणूक लढवण्यास खलप यांच्यापेक्षा प्रबळ असा दुसरा उमेदवार काँग्रेस पक्षाकडे नाही. त्यामुळे यंदा उत्तरेत भाजपचे श्रीपाद नाईक व काँग्रेसचे रमाकांत खलप यांच्यातच ही लढत होण्याची शक्यता आहे.
दक्षिण गोव्याविषयी बोलायचे झाल्यास काँग्रेस पक्षाचा गेल्या कित्येक वर्षांपासूनचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात भाजप आता काँग्रेसपुढे आव्हान निर्माण करू लागला आहे. शिवाय दोन वेळा काँग्रेसचा पराभव करण्यातही भाजपला यश आलेले आहे. यंदाही आम्ही दक्षिण गोव्यात काँग्रेसला धूळ चारू असे भाजपचे नेते बोलू लागले आहेत.

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला देशभरातील 100 मतदारसंघांत विरोधकांकडून अत्यंत कमी मतांनी हार पत्करावी लागली होती. यंदाच्या निवडणुकीत या मतदारसंघांवर खास लक्ष देऊन या मतदारसंघांत भरपूर काम करण्याचा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाला दिलेला आहे. दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाचा या 100 मतदारसंघांमध्ये समावेश आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार नरेंद्र सावईकर यांचा अवघ्या 10 हजार मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे यंदा भाजपने या मतदारसंघावर खास लक्ष केंद्रित केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पक्षाने यापूर्वीच या मतदारसंघात जाहीर सभा घडवून आणली आहे. यंदा या मतदारसंघात भाजप व काँग्रेस हे पक्ष कुणाला उमेदवारी देतात ते पाहावे लागणार आहे. काँग्रेस पक्ष परत एकदा फ्रान्सिस सार्दिन व भाजप परत एकदा नरेंद्र सावईकरांना उमेदवारी देते की दोन्ही पक्ष यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी देतील हे पाहावे लागणार आहे.

काँग्रेस पक्षाने दक्षिण गोव्यातून आपले विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन, गिरीश चोडणकर व विरियातो फर्नांडिस यांची नावे दिल्ली दरबारी पाठवून दिलेली आहेत. फ्रान्सिस सार्दिन हे दक्षिण गोव्यातील काँग्रेसचे एक प्रबळ असे नेते आहेत. मात्र, आता त्यांनी वयाची 77 वर्षे पार केलेली असल्याने त्यांना विश्रांती देऊन पक्षाने नव्या दमाच्या नेत्यांपैकी एखाद्याची उमेदवारीसाठी निवड करावी अशी मागणी पक्षातीलच एका गटाकडून होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर पक्ष कोणती भूमिका घेतो ते पाहावे लागणार आहे. राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक असलेले गिरीश चोडणकर हेही निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. विरियातो फर्नांडिस हेही पक्षाचे दक्षिण गोव्यातील एक सक्रिय असे नव्या दमाचे नेते आहेत. या संभाव्य उमेदवारांपैकी पक्ष कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालेल हे लवकरच कळणार आहे.

निवडणुका आता तोंडावर आलेल्या असल्याने सगळ्याच पक्षांना आता प्रचारावर भर द्यायचा असल्याने भाजप व काँग्रेस हे लवकरच आपापले उमेदवार जाहीर करतील अशी अपेक्षा आहे. दरम्यान, गोव्यातील एक प्रादेशिक पक्ष असलेल्या रेव्ह्युलेशनरी गोवन्स पार्टीने मात्र यापूर्वीच आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत. या पक्षाचे अध्यक्ष मनोज ऊर्फ तुकाराम परब यांना पक्षाने उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघासाठीची उमेदवारी दिलेली आहे, तर दक्षिण गोव्यातून रुबर्ट परेरा यांना उमेदवारी दिलेली आहे. उत्तर व दक्षिण या गोव्यातील दोन्ही मतदारसंघांत आरजीला किती मते मिळतात, हा पक्ष किती मते फोडतो त्यावरून समीकरणे बदलू शकतात. मात्र, आरजीने जास्त मते मिळवली तर त्याचा फायदा भाजपला मिळू शकतो असे राजकीय अभ्यासकांचे म्हणणे आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत आरजीने 9.8 टक्के मते मिळवली होती. त्यामुळे मते फुटल्याने काँग्रेस, मगो व गोवा फॉरवर्ड आदी पक्षांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत आरजीला परत एकदा जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळेल की काय हे पाहावे लागेल. त्यांचे उमेदवार या निवडणुकीत विजयी होणार नाहीत हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिषाची गरज नसली तरी ते दुसऱ्या पक्षांचे नुकसान करण्याची शक्यता असल्याने राजकीय निरीक्षकांचे त्यांच्यावर लक्ष असेल. विशेषकरून आरजीवाले काँग्रेस पक्षाचे नुकसान करू शकतात असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.

विजय सरदेसाई यांच्या गोवा फॉरवर्ड पार्टीने आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. यासंबंधी बोलताना विजय सरदेसाई यांनी आपला पक्ष हा लोकसभा निवडणुका जिंकू शकणार नाही याची आपणाला जाणीव आहे, आणि मते फोडण्यासाठी निवडणूक लढवण्यात आपणाला रस नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
लोकसभा निवडणुकांचे वारे आता सर्वत्र वाहू लागले असले तरी निवडणुकांसाठीची अधिसूचना अद्याप आलेली नसल्याने निवडणूक प्रचाराला अद्याप गती आलेली नाही. एकदा निवडणुकांसाठीची अधिसूचना आली आणि विविध पक्षांच्या उमेदवारांची नावे जाहीर झाली की खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या प्रचाराचे वारे जोर धरणार आहे.