लोकसभा उमेदवारीवरून सोपटे – नाईक यांच्यात जुंपली

0
24

भाजपचे नेते व माजी आमदार दिलीप परुळेकर यांच्यानंतर आता मांद्रेचे माजी आमदार दयानंद सोपटे यांनी आपण आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर गोव्यातून भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचा मनोदय व्यक्त केला आहे. त्यामुळे विद्यमान खासदार श्रीपाद नाईक यांच्यासमोर उमेदवारी मिळवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. श्रीपादभाऊंनी आता विश्रांती घ्यावी, असे वक्तव्य काल दयानंद सोपटे यांनी केले. त्यानंतर लगेचच श्रीपाद नाईक यांनी प्रतिक्रिया देताना, तुळशी विवाह नुकताच झाला. त्यामुळे बरेच ‘नवरे’ बाशिंग बांधून तयार होत आहेत, अशा शेलक्या शब्दांत टीका केली.

लोकसभेची निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे उमेदवारी मिळवण्यासाठी राजकीय मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. भाजपचे नेते आणि साळगावचे माजी आमदार दिलीप परुळेकर यांच्यानंतर आता मांद्रेचे माजी आमदार दयानंद सोपटे यांनी लोकसभेच्या उत्तर गोवा उमेदवारीवर दावा केला आहे. भाजपने जबाबदारी दिल्यास 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर गोव्यातून लढण्यास आपण इच्छुक आहे, असे मत दयानंद सोपटे यांनी व्यक्त केले.

श्रीपाद नाईक यांनी 40 वर्षे देश, राज्य आणि पक्षासाठी उत्तम सेवा दिली. आता वयाचा विचार करून त्यांनी राजकारणातून थांबण्याची गरज आहे. उत्तर गोव्यातील मांद्रेतील कार्यकर्त्यांकडून नव्या उमेदवाराची मागणी केली जात आहे, असे सोपटे म्हणाले.
श्रीपादभाऊंना भाजपमध्ये मोठा मान आहे. त्यांना मी काही बोलू शकत नाही; पण त्यांनी स्वतः वयाचा विचार करून थांबण्याची गरज आहे. त्यांनी आम्हांला आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावे, असेही सोपटे यांनी नमूद केले.

श्रीपादभाऊंनी आता विश्रांती घ्यावी : दयानंद सोपटे
केंद्रीय राज्यमंत्री आणि उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांचे वय वाढले आहे. त्यांनी गेली 40 वर्षे भाजप पक्ष, राज्य आणि देशासाठी काम केले आहे. त्यांनी आता विश्रांती घेऊन नवीन दमाच्या उमेदवाराला संधी देण्याची गरज आहे, असे मत दयानंद सोपटे यांनी काल एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केले.

तुळशी विवाह झाला; बरेच नवरे बाशिंग बांधून तयार : नाईक
तुळशी विवाह नुकताच झाला आहे. त्यामुळे बरेच नवरे बाशिंग बांधून तयार होत आहेत.लोकसभेच्या उत्तर गोव्यातील उमेदवारीवर कोणीही दावा केला, तरी आपणाला काही फरक पडत नाही. शेवटी केंद्रीय पातळीवर निवडणुकीसाठी उमेदवार ठरविला जाणार आहे. माझे वय झाले किंवा माझ्याकडून काम होत नाही, या गोष्टी लोकांना माहीत आहेत, अशी प्रतिक्रिया उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांनी दिली.