लोकसभा उपसभापतीपदी थंबीदुराई अविरोध निश्‍चित

0
227

अभाअद्रमुकचे खासदार एम. थंबीदुराई यांची लोकसभेच्या उपसभापतीपदी अविरोध वर्णी लागण्याचे आता निश्‍चित झाले आहे. कॉंग्रेससह सर्व प्रमुख पक्षांनी या पदासाठी त्यांच्या नावाला पाठिंबा दर्शविला आहे. त्यांनी काल आपली उमेदवारी दाखल केली असून आज निवडणूक होणार आहे.
उपसभापतीपदासाठी उमेदवारी दाखल करतेवेळी पहिल्या अर्जात सर्वप्रथम गृहमंत्री राजनाथसिंग यांनी त्यांचे नाव सुचविले असून विदेश व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी त्यांना अनुमोदन दिले आहे. त्यानंतर कॉंग्रेसनेही थंबीदुराई यांना आपला पाठिंबा जाहीर केला व त्यांच्या उमेदवारीच्या दुसर्‍या संचावर मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांचे नाव सुचविले व ज्योतीरादित्य शिंदे यांनी त्याला अनुमोदन दिले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तेलगू देसम, शिवसेना, लोक जनशक्ती पार्टी या एनडीए युतीतील पक्षांसह बीजू जनता दल, तेलंगण राष्ट्र समिती, वायएसआर कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस व समाजवादी या बिगर एनडीए पक्षांचे मिळून थंबीदुराई यांच्यासाठी आणखी आठ उमेदवारी संच दाखल केले जाणार आहेत.
त्याआधी अभाअद्रमुक खासदारांसह थंबीदुराई यांनी संसदीय व्यवहार मंत्री व्यंकय्या नायडू यांनी भेट घेतली. ३७ खासदार असलेला अभाअद्रमुक पक्ष भाजपा व कॉंग्रेस यांच्यानंतर लोकसभेतील तिसर्‍या क्रमांकाचा पक्ष आहे.